“मला फिटनेसची आवड आहे” – देवदत्त नागे

‘जय मल्हार’ ह्या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारा, पिळदार शरीरयष्टी, भारदस्त आवाज आणि तितकाच दमदार अभिनय करणारा अभिनेता म्हणजे देवदत्त नागे. मुळचा अलिबाग, पेण चा. लहानपणापासूनच अभिनय आणि जिमची आवड असलेल्या देवदत्तने आपल्या करिअरच्या सुरवातीच्या काळात ‘फॅशन शोज’ मध्ये मोडेलिंग ने सुरवात केली. खरतर आपले पदवी शिक्षण पूर्ण करून जवळ पास १०-१२ वर्ष त्याने एका मोठ्या संस्थेत मोठ्या पदावर नोकरी केली. पण अभिनय, मोडेलिंगचे स्टेज त्याला सतत खुणावत होते आणि एक दिवस राजीनामा देऊन तो पूर्णवेळ ह्या क्षेत्राकडे वळला. ‘बाजीराव मस्तानी’, ‘कालाय तस्मै नमः’, ‘देवयानी’ , ‘लागी तुझसे लगन’, ‘वीर शिवाजी’, ‘महादेव’ अश्या विविध मालीकांबरोबर ‘पॉवर, ‘वन्स अपॉन अ टाइम’ आणि ‘संघर्ष’ ह्या चित्रपटांतून त्याने आपल्या अभिनयाची छाप पाडली.
Devdatta Nage, Actor, jay malhar Fameसध्या गाजत असलेल्या ‘जय मल्हार’ ह्या मालिकेतील त्याच्या प्रमुख भूमिकेबद्दल आणि अभिनयाच्या प्रवासाबद्दल, मराठीमुव्हीवर्ड डॉट कॉमने त्याच्याशी मारलेल्या गप्पा.

तुझी अभिनयाची सुरुवात कशी झाली?
खरतर मी केमस्ट्री ग्रॅजुयेट आहे. सुरवातीला मी ‘फॅशन शोज’ मध्ये सहभागी व्हायचो, माझे गुरु ‘प्रसाद पंडित’ ह्यांनी मला एक दिवस सांगितले कि, फक्त ‘फॅशन शोज’ पर्यंत मर्यादित राहु नकोस, अभिनयाकडे वळ. ‘हिमालयाची सावली’ ह्या व्यावसायिक नाटकाद्वारे मी रंगभूमीवर पदार्पण केले. त्या नंतर ‘मृत्युंजय’ ह्या मराठी मालिकेतून मला छोट्या पडद्यावर काम करायची संधी मिळाली.

फिटनेस कसा सांभाळतोस?
फिटनेस च्या बाबतीत मला अस वाटत की, ते संस्कार – वातावरण घरातच असाव लागत. मी एक-पाऊण तास नियमित व्यायाम आवडीने करतो. चांगली शरीरयष्टी हे परमेश्वराने दिलेली एक देण आहे. त्याची काळजी आपण घेतलीच पाहिजे. वेळेवर जेवण, पुरेसा आराम आणि व्यायामाची वेळ मी पाळतो. रात्री मला कितीही उशीर झाला तरी मी वर्क आउट करायला विसरत नाही.

अभिनयाव्यतिरिक काय आवडते?
अभिनयाबरोबर मी विविध छंद जोपासलेत. मला बॉडी बिल्डिंग/फिटनेस ची आवड आहे. मी गिटार उत्कृष्ट वाजवतो. मला स्केचिंग करायला आवडते शिवाय ट्रेकिंगला जायला खूप आवडत.

तू अलीकडे ‘संघर्ष’ ह्या चित्रपटात दिसलास. मोठ्या पडद्यावरचा अनुभव कसा होता, अजून कुठल्या चित्रपटात आम्हाला दिसणार आहेस ?
खरतर अनेक सिनेमांसाठी मला बोलावले जातंय पण, सध्यातरी मी जय मल्हार मध्ये पूर्णपणे व्यस्त आहे. मराठी चित्रपटात काम करण्याचा अनुभव खुप छान होता. अतिशय लॅविश आणि हिंदी किंवा इंग्रजी सिनेमाच्या तोडीचा चित्रपट बनवण्याचा प्रयत्न ‘संघर्ष’च्या माध्यमातून केला गेला. विशेष करून त्यातील अॅक्शन सिक्वेन्सस आम्ही खूप मेहेनत घेऊन शूट केलेत.

पौराणिक, ऐतिहासिक भूमिका करायला जास्त आवडते का?
अगदीच तसं काहीनाही, मला प्रत्येक प्रकारची, विविध पैलू असलेल्या भूमिका साकारायला आवडेल. माझ्या शरीरयष्टीमुळे आत्तापर्यंत पौराणिक आणि ऐतिहासिकच भूमिका जास्त मिळाल्यात आणि प्रेक्षकांना त्या आवडल्या देखील.

Devdatta Nage In Jai Malhar Serial

‘जय मल्हार’ मधील मल्हारी मार्तंड / खंडोरायाची भूमिका साकारण्याचा अनुभव.
मी ‘झी मराठी’ आणि महेश कोठारेजी ह्याचे धन्यवाद मानेन कि, त्यांनी मला हि संधी दिली. ह्या भूमिकेसाठी मी वय्यक्तिक खूप मेहनत घेतली, मल्हारी मार्तंड / खंडेराय ह्यांच्यावर आधारित काही पुस्तके वाचून, भूमिका निट समजून घेतली. कारण, संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेले -खंडोरायाची भूमिका साकारून, सर्व प्रेक्षेकांचा विश्वासास पात्र उतरण्याची खूप मोठी जबाबदारी माझ्यावर होती. हि भूमिका साकारतांना स्वतःला चांगले अनुभव आलेत.

‘जय मल्हार’ सारख्या मोठ्या मालिकेतून मुख्य भूमिका साकारल्यावर आता सिनेमा ,मालिकांची निवड काटेकोरपणे करणार का ? आता कॅरेक्टर रोल करणार कि नाही?
असे काही ठरवले नाहीये आणि एखादा कॅरेक्टर रोल केल्याचा एक फायदा असा होतो कि, तुम्हाला वेगवेगळ्या भूमिका साकारायला मिळतात. त्यामुळे आव्हानात्मक काही असले तर नक्कीच करायला आवडेल.

‘अभिनय’ क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या नवीन मुलांना काय सांगशील ?
मेहनत करा ,क्षणिक यशाची अपेक्षा ठेऊ नका. जे काम मिळेल ते प्रामाणिकपणे करा. आपल्या इंडस्ट्रीमध्ये स्पून फीडिंग हा प्रकार नाही. इथ तुम्हाला स्वतःला सिद्ध कराव लागत. तुमच्या कामाचा तुम्हाला विश्वास हवा