‘आम्ही सारे खवय्ये’त विविध तज्ञांचे मार्गदर्शन

Aamhi Saare Khavvayye, Prashant Damle

दर बारा कोसावर भाषा बदलते तशी दर कोसावर खाद्यसंस्कृतीही बदलते. महाराष्ट्राची ही वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती केवळ देशभरातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रीयन खाद्यसंस्कृती जगभरात आपला ठसा उमटवते ती त्याच्या साधेपणामुळे आणि वैविध्यपूर्ण लज्जतीमुळे. महाराष्ट्रात खाद्यसंस्कृतीचा समृद्ध वारसा असूनही आज एकूण धकाधकीच्या जीवनात रोजच्या आहारात जागा घेतलीय ती फास्टफूड किंवा डाएटफूडने.

अनेक व्याधींपासून मुक्तता मिळवण्यासाठी लोकांचा कल आहारसुद्धा संतुलित आणि योग्य पद्धतीचा घेण्याकडे वाढतोय.  मात्र  संतुलित आणि योग्य आहार म्हणजे नेमकं काय हे माहित नसल्यानं आहार संतुलनापेक्षा चुकीचा आहार घेतला जातो आणि आरोग्याची समस्या अधिक बिकट होते.  झी मराठीवर ‘आम्ही सारे खवय्ये’ कार्यक्रमात येत्या काही भागांमध्ये विशेष तज्ञमंडळींना पाचारण करण्यात येत आहे.

आरोग्याबाबत काही खास सूचना देताना किंवा विविध विषयावर मार्गदर्शन करताना काही विशेष पाककृतींची ओळखही ही तज्ञमंडळी करून देणार आहेत.  ६ जुलैला कान-नाक-घसा तज्ञ डॉ. ज्योत्सना जगताप तर ७ जुलैला ज्येष्ठ सौंदर्यतज्ञ माया परांजपे नोकरदार स्रियांनी कमीत कमी वेळेत पोषक आणि संतुलित तसेच सौंदर्य टिकवण्यसाठी काय आहार घ्यावा यासाठी मार्गदर्शन करतील. तसेच ८ जुलैला स्त्रीरोगतज्ञ डॉ. ललिता मायदेव आणि ९ जुलैला मार्गदर्शक सुचित्रा सुर्वे दहावी – बारावी झालेल्या मुलांना व पालकांना मार्गदर्शन करतील.