Tag Archives: मराठी

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये आत्याबाईंमुळे येणार शिवा–सिध्दीच्या नात्यात दुरावा?

जीव झाला येडापिसा मालिकेमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे… शिवा आणि सिध्दीचे आयुष्य खूप सुंदर वळणावर येऊन पोहचले आहे… या दोघांच्या आयुष्यात प्रेमाचा नवा रंग आल्याने त्यांच्या सुखी संसाराची नवी सुरुवात झाली आहे असे वाटत असतानाच आता आत्याबाईंमुळे एका नव्या वादाची ठिणगी यांच्या नात्यात पडली आहे. शिवा आणि सिध्दीच्या गोड नात्याला आत्याबाईंची नजर लागणार असे दिसून येत आहे.

Vidula Choughule and Ashok Phal Dessai in Jiv jhala Yeda Pisa
Vidula Choughule and Ashok Phal Dessai in Jiv jhala Yeda Pisa

नुकतच आत्याबाईंनी सोनी आणि सरकारच्या लग्नाचा प्रस्ताव पुन्हाएकदा लष्करे कुटुंबासमोर मांडला आहे… सोनी – सरकारच्या लग्नाला सिद्धीचा पहिल्यापासून विरोध आहेच, आणि तिने तो सगळ्यांसमोर व्यक्त देखील करून दाखवला होता… पण यामुळे आता शिवा – सिद्धीमध्ये कडाक्याचे भांडण झाले आहे… सिद्धीने आत्याबाईंना देखील हे ठणाकवून सांगितले आहे की हे लग्न ती कुठल्याही परिस्थितीत नाही होऊ देणार. या सगळ्यावर शिवाचे काय मत असेल ? शिवा आत्याबाईंना काय सांगेल ? हे बघणे रंजक असणार आहे.

द्वेष, राग, भांडण या भावनांना आता सिध्दी शिवाच्या आयुष्यात जागा उरलेली नाही… आणि हेच बघून कुठेतरी मंगल आणि आत्याबाई नाराज आहेत… हे सगळं घडत असताना आता कुठे सिद्धी – शिवाच्या नात्यात आलेला गोडवा आत्याबाईंमुळे हिरावून तर जाणार नाही ना ? सिध्दीचे म्हणणे शिवाला कळेल का ? आत्याबाईंमुळे या दोघांमध्ये दुरावा येईल ? जाणून घेण्यासाठी बघा जीव झाला येडापिसा सोम ते शनि रात्री ८.०० वा. आपल्या कलर्स मराठीवर.

युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदेचा बोल्ड अंदाज

आगामी मराठी चित्रपट इमेल फिमेल’ह्यात  युवा अभिनेत्री प्राजक्ता शिंदे  अत्यंत बोल्ड अंदाजात दिसणार असून या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिचा अंदाज कुणालाही घायाळ करेल असाच आहे. प्राजक्ता शिंदे सध्या चित्रपटसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पहात आहे.  ‘इमेल फिमेल’  ह्या चित्रपटाच्या पोस्टरवरील तिच्या या बोल्ड फोटोची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. एस.एम.बालाजी फिल्म प्रोडक्शन’ प्रस्तुत चित्रपटाची निर्मिती शैलेश कोते आणि मनीष पटेल यांनी केली असून कथा आणि दिग्दर्शन योगेश जाधव यांचे आहे.

Prajakta Shinde actress
Prajakta Shinde actress

‘इमेल फिमेल’  ह्या चित्रपटाच्या  प्राजक्ता एका   मॉडर्न मुलीच्या भूमिकेत दिसणार आहे, जी बिनधास्त आणि बोल्ड आहे. चुकीच्या मार्गाने एखाद्याला जाळ्यात ओढलंही जाऊ शकतं आणि त्याचे काय दुष्परिणाम होऊ शकतात हे दाखवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. प्राजक्ताला बोल्ड, ग्लॅमरस अंदाजात रुपेरी पडद्यावर पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

प्राजक्ता सोबत ‘इमेल फिमेल’ चित्रपटात निखिल रत्नपारखी,विक्रम गोखले, विजय पाटकर, दिप्ती भागवत, कांचन पगारे, प्रतीक्षा जाधव, श्वेता परदेशी व बालकलाकार मैथिली पटवर्धन या कलाकारांच्या भूमिका आहेत.

येत्या २० मार्चला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे .

व्हेलेंटाईन वीक निमित्त ‘हरवले मन माझे’ म्युझिक अल्बम रसिकांच्या भेटीला

व्हेलेंटाईन वीक नुकताच सर्वांनी साजरा केला. या निमित्तानेच प्रेमावर आधारित स्वराज्य फिल्म प्रोडक्शन निर्मित “हरवले मन माझे” हे गाणे रसिकांच्या नुकतेच भेटीला आले असून प्रेक्षकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. इंडियन आयडॉल उपविजेता सुप्रसिद्ध गायक रोहित राऊत यांनी हे गाणं गायलं असून गाण्याचं  संगीत कुणाल आणि करण यांचे आहे, तर अर्जुन गोरेगावकर, शिल्पा ठाकरे, शिल्पा तुळसकर, सविता हांडे, स्नेहल भुजबळ, श्याम दंडवते यांच्यावर ते चित्रित झालं आहे.

Haravale Mann Maze Marathi Song
Haravale Mann Maze Marathi Song

निसर्गरम्य लोकेशन्सवर खुलणाऱ्या या ही प्रेम गीताचे दिग्दर्शन धनंजय साबळे यांनी केलं असून, सिनेमॅटोग्राफी मिलिंद कोठावळे यांनी केलेली आहे. विशेष म्हणजे या गाण्यासाठी ड्रोनचा अतिशय सुंदर वापर करण्यात आला आहे. रसिकांचा गाण्याला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून आनंद आनंद वाटत असल्याची भावना यावेळी गीताचे निर्माते उमेश माने,अर्जुन गोरेगावकर, गणेश शिंदे यांनी व्यक्त केली

‘एबी आणि सीडी’चा टीझर पाहून वाढली प्रेक्षकांची उत्सुकता

आजी-आजोबा आणि नातवंड यांच्यामधील नातं हे फारच हलकंफुलकं असतं. आपल्या हक्काची आणि तितकीच आपल्याला कोणत्याही परिस्थितीत समजून घेणा-या व्यक्ती म्हणजे आजी-आजोबा असं प्रत्येक नातवाला वाटत असतं आणि ते तितकंच खरंही असतं. जसजसं म्हातारपण येतं तसतसं घरातल्यांना म्हातारे व्यक्ती या अडचण वाटू लागतात किंवा त्यांच्याकडे फार लक्ष द्यावसं नाही वाटत आणि याचवेळी त्यांचा खंबीर आधार बनतात त्यांची नातवंड. अशीच विक्रम गोखले, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश यांची आजोबा-नातवंडांची जोडी ‘एबी आणि सीडी’ मध्ये पाहायला मिळणार आहे.  अमिताभजींनी गेली अनेक वर्षे सिनेसृष्टीतील प्रत्येक कलाकाराच्या आणि सिनेरसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे आणि त्यामुळेच ‘अमिताभ बच्चन’ म्हटलं की सर्वप्रथम कुतुहल वाटतं आणि जर अमिताभजी तुमच्या आजोबांचे वर्गमित्र असतील तर बातच निराळी होऊन जाते.

AB aani CD Movie, Amitabh Bachchan, Vikram Golkhale
AB aani CD Movie, Amitabh Bachchan, Vikram Golkhale

अक्षय विलास बर्दापूरकर, प्लॅनेट मराठी, गोल्डन रेशो फिल्म्स निर्मित आणि पीव्हीआर प्रदर्शित आणि मिलिंद लेले दिग्दर्शित ‘एबी आणि सीडी’ मध्ये अमिताभजी बच्चन, विक्रम गोखले यांच्यासह सुबोध भावेसायली संजीव, अक्षय टंकसाळे, साक्षी सतिश, शर्वरी लोहोकरे, नीना कुळकर्णी, लोकेश गुप्ते, सीमा देशमुख, सागर तळाशीकर यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.

अमिताभ बच्चन आणि चंद्रकांत देशपांडे उर्फ ‘एबी आणि सीडी’ चा याराना बघेल सारा जमाना, १३ मार्चला तुमच्या जवळच्या सिनेमागृहात.

‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासीक चित्रपटाचे नवे टिझर पोस्टर

“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा विजय असो!” अशा गगनभेदी घोषणा, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर फेटा अश्या मावळ्यांच्या वेशातील कलाकार या उल्हासीत वातावरणात ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी भव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या सेटवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पाचगणी येथील टेबल लँड येथे संपन्न झालेल्या या अनोख्या शिवजयंती सोहळ्याला विठ्ठल तरडे, महेश लिमये, संदीप मोहिते पाटील, सौजन्य निकम, धर्मेंद्र बोरा यांच्यासह चित्रपटातील कलाकार, तंत्रज्ञ अशी संपूर्ण टीम उपस्थित होती.

Sarsenapati Hambirrao Movie Posters
Sarsenapati Hambirrao Movie Posters

याप्रसंगी बोलताना सरसेनापती हंबीरराव’ चे लेखक – दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे म्हणाले, “महाराष्ट्रासाठी, भारतदेशासाठी सर्वात मोठा सण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. कोणत्याही माणसाने त्याच्या आयुष्यातील शुभकार्य शिवजयंतीच्या दिवशी सुरू केले तर ते नक्कीच पूर्णत्वास जाईल, कारण महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. या दैवी माणसाने आपल्यासाठी जे जे पाऊल उचलले ते यशस्वीच झाले आहे. सेटवर पावणे चारशेहून अधिक लोकांच्या युनिटने शिवरायांना मानाचा मुजरा केलेला आहे.”

Shiv Jayanti, Pravin Tarde, Mahesh Limye, 'Sarsenapati Hambirrao' Movie
Shiv Jayanti, Pravin Tarde, Mahesh Limye, ‘Sarsenapati Hambirrao’ Movie

उर्विता प्रॉडक्शन्स निर्मित ‘सरसेनापती हंबीरराव’ हा चित्रपट जून २०२० मध्ये प्रदर्शित होणार असून निर्मात्यांनी पुण्यात या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले त्याप्रसंगी हजारो लोक उपस्थित होते.

‘जीव झाला येडापिसा': शिवादादा आणि सिद्धीमध्ये लवकरच फुलणार प्रेम!

कलर्स मराठीवरील ‘जीव झाला येडापिसा’ या लोकप्रिय  मालिकेमध्ये गौरवच्या परत येण्याने सिद्धी आणि शिवामध्ये दुरावा आला, भांडण झाली… दोघांमध्ये बरेच गैरसमज देखील झाले पण, प्रेमात खूप ताकद असते ते अगदी खरे आहे… याच प्रेमामुळे गौरवचं सत्य शिवासमोर आला आणि आता लवकरच शिवा गौरवचा खरा चेहरा सिध्दीसमोर आणणार आहे. शिवाला हे सत्य कसे कळाले ? तो सिध्दीसमोर ते कसे आणणार ? हे प्रेक्षकांना लवकरच मालिकेमध्ये बघायला मिळणार आहे.

Vidula Chougule, Ashok Phal Dessai in 'Jeev Jhala Yeda Pisa'
Vidula Chougule, Ashok Phal Dessai in ‘Jeev Jhala Yeda Pisa’

शिवाने सिद्धीसमोर गौरवचे पितळ उघडे करताच आणि त्याचा अश्या वागण्यामागचा हेतु कळताच सिध्दीला राग अनावर झाला… आणि ती गौरवच्या सणसणीत कानाखाली मारते. सिद्धी गौरवला त्यांच्या आयुष्यातून निघून जाण्यास सांगते इतकेच नसून तुझ्यावर प्रेम केले याची मला लाज वाटते, माझ्या मनामध्ये फक्त शिवा आहे आणि शेवटपर्यंत तोच राहील असे देखील त्याला बाजावून सांगते… सिद्धीचे मन शिवाने कधीच जिंकले आहे, आणि तिचे त्याच्यावर प्रेमदेखील आहे याची कबुली तिने दिली आहे…

येत्या आठवड्यामध्ये ‘जीव झाला येडापिसा’ या मालिकेत  शिवादादा आणि सिद्धीमध्ये प्रेम फुलताना पहायला  मिळणार आहे

आलोक राजवाडे घेऊन येतोय ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’

अभिनेता आलोक राजवाडेने प्रायोगिक रंगभूमीवर अभिनय, दिग्दर्शन अशा वैविध्यपूर्ण भूमिकांमधून आपली ओळख निर्माण केली आहे. ‘नाटक कंपनी’ या संस्थेच्या माध्यमातून प्रायोगिक रंगभूमीवर सातत्याने तो वेगवेगळे प्रयोग करत असतो. याशिवाय ‘बोक्या सातबंडे’, ‘विहीर’, ‘रमा माधव’, ‘कासव’, ‘राजवाडे अँड सन्स’, ‘फॅमिली कट्टा’, ‘पिंपळ’ आदी मराठी चित्रपटातील त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत.

Actor Alok Rajwade
Actor Alok Rajwade

आलोक आता नवी इनिंग खेळण्यास सज्ज झाला असून तो लवकरच चित्रपट दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. अश्लील उद्योग मित्र मंडळ’ असे आलोकच्या पहिल्या मराठी चित्रपटाचे नाव असून या बद्दल बोलताना आलोक राजवाडे म्हणाला, ‘‘एका टीनएजर मुलाच्या वयात येण्याची गोष्ट या चित्रपटात आहे. सेक्शुअल फँटसी ते खऱ्या प्रेमाचा अर्थ म्हणजे नक्की काय? याचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला आहे.’’. या चित्रपटामध्ये युथफुल स्टारकास्ट असून हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘दाह’ चित्रपटात किशोर चौघुले बनला ‘मामा’

अनेक नाटकातील आणि चित्रपटातील अभिनयामुळे किशोर चौघुले यांनी महाराष्ट्रातील जनतेला स्वत:शी आणि स्वत:च्या अभिनयाशी जोडून ठेवले आहे.  जबरदस्त आवाजामुळे सर्वांचं लक्ष स्वत:कडे वेधून घेणारे किशोर चौघुले आता ‘दाह मर्मस्पर्शी कथा’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Actor kishore Chougule

Actor kishore Chougule

मल्हार गणेश दिग्दर्शित आणि डॉ. सतिश (अतुल) सोनोने लिखित ‘दाह’ चित्रपटात किशोर यांनी कॉलेजचे शिपाई ‘मामा’ यांची भूमिका साकारली आहे. कॉलेजचे शिपाई मामा हे प्रत्येक विद्यार्थांचे खास असतात. पेशाने जरी ते शिपाई असले तरी एक वडीलधारी व्यक्ती आणि मित्र या नात्याने ते विद्यार्थांशी अगदी मनमोकळेपणाने संवाद साधतात.  ‘दाह-एक मर्मस्पर्शी कथा’ हा मराठी चित्रपट १४ फेब्रुवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

राजमाता जिजाबाईंची यशोगाथा ‘जिऊ’च्या स्वरूपात मोठ्या पडद्यावर

Jiu Marathi Movie, Jijau

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची माता ‘जिजाबाई’… इतक्या जुजबी ओळखीत सीमित न होणारा प्रचंड इतिहास राजमाता ‘जिजाऊ’ या शब्दांत सामावलेला आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरू नये. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या
माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या ‘जिजाऊ’ कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे म्हणा ना. स्त्री अबला नसून सबला
आहे हे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत फायरफ्लाईज एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित ‘जिऊ’ हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे.

अनुजा देशपांडे यांचा ‘जिऊ’ हा पहिलाच चित्रपट असून ह्या चित्रपटासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. तब्ब्ल चार वर्ष केवळ राजमाता जिजाऊ यांचा जीवनप्रवास अभ्यासत ‘जिऊ’ची निर्मिती करण्याचं शिवधनुष्य त्यांनी पेललं आहे. तर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ या दोन चित्रपटांच्या दिग्दर्शनानंतर तिसरा ‘जिऊ’ या आपल्या आगामी चित्रपटासाठी दिग्दर्शक प्रितम
एस.के.पाटील उत्सुक आहेत.

लवकरच ‘जिऊ’ हा चित्रपट आपल्या भेटीस येईल तत्पूर्वी चित्रपटाच्या पोस्टरचे
अनावरण करण्यात आले आहे. स्वराज्य पर्वाची चाहूल देणाऱ्या फडकणाऱ्या भगव्याने सारा आसमंत सोनेरी प्रकाशात उजळणारे ‘जिऊ’चं हे पोस्टर ही एका भव्य-दिव्य ऐतिहासिक मराठी चित्रपटाची नांदीच आहे.

रुपेरी पडद्यावर दिसणार शिवरायांचा ‘शिवप्रताप’

नाटक व मालिकांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडल्यानंतर अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील तेजोमय घटनांचे महान पर्व ‘शिवप्रताप’ या तीन चित्रपटांच्या मालिकेतून रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘जगदंब क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे तीन मराठी चित्रपटांची घोषणा नुकतीच करण्यात आली. रुपेरी पडद्यावर यानिमित्ताने शिवशाही अनुभवायला मिळणार आहे.

Dr Amol Kolhe
Dr Amol Kolhe

यातील ‘वाघनखं’ हा पहिला चित्रपट ६ नोव्हेंबर २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  लेखन प्रताप गंगावणे ह्यांनी ह्या चित्रपटाची कथा लिहली असून, कार्तिक केंढे हे या चित्रपटाचे  दिग्दर्शन करणार आहेत. डॉ. अमोल कोल्हे, डॉ. घनश्याम राव, विलास सावंत या चित्रपटांचे निर्माते आहेत. डॉ. अमोल कोल्हे या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी बुद्धीच्या आणि शौर्याच्या जोरावर अफझलखानाचा वध कसा केला?  हे ‘वाघनखं’ चित्रपटातून दिसणार आहे.

अफझलखानाच्या वधानंतर महाराजांच्या बंदोबस्तासाठी औरंगजेबाने पाठवलेल्या शाहिस्ताखानाला पळवून लावल्यानंतर रयतेची झालेली नुकसान भरपाई भरून काढण्यासाठी सुरतेची मोहिम आखली. आणि शाहिस्ताखानाने केलेल्या नुकसानीचा ‘वचपा’ काढला.

शिवरायांचे हे प्रेरणादायी जीवनकार्य देशभरात आणि देशाबाहेर पोहचविण्याच्या उद्देशाने या तीनही चित्रपटांची निर्मिती मराठीसोबत हिंदी भाषेतही होणार आहे.