अहमदनगर महाकरंडक’च्या अंतिम फेरीत २७ एकांकिकांचे सादरीकरण
श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट प्रायोजित अहमदनगर महाकरंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेची अंतिम फेरी २१ ते २४ जानेवारी या दरम्यान रंगणार आहे. अंतिम फेरीत नगरच्या ४, पुणे आणि मुंबईतील प्रत्येकी ८, औरंगाबादच्या ४, नाशिक, जळगाव आणि सांगली येथील प्रत्येकी १ एकांकिका सादर होणार असून, त्यांच्यात महाकरंडक मिळवण्यासाठी चांगलीच चुरस होणार आहे.
यंदा या स्पर्धेचे चौथे वर्ष आहे. नगरच्या माऊली सभागृहात ही अंतिम फेरी रंगणार आहे. अंतिम फेरीचे उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. अंतिम फेरीदरम्यान २४ जानेवारी रोजी नाट्य-चित्रपट-टीव्ही मालिका लेखन कार्यशाळाही आयोजित करण्यात आली असून, स्पर्धेचे ब्रँड अॅम्बेसिडर भरत जाधव यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.
‘भुलभुलैय्या‘, ‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असत ‘ असतं अशा दर्जेदार चित्रपटांच्या पटकथा लेखिका मनीषा कोरडे पारितोषिक वितरण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
स्पर्धेसाठी एकूण तीन लाखांची पारितोषिके असून, सर्वोत्कृष्ट एकांकिकेला ६१ हजार १११ रुपये आणि महाकरंडक प्रदान करण्यात येणार आहे. त्यात सर्वोत्कृष्ट एकांकिकेची चार सांघिक पारितोषिके, उत्तेजनार्थ पारितोषिक, सर्वोत्कृष्ट विनोदी एकांकिका आणि अहमदनरमधील सर्वोत्कृष्ट एकांकिकेलाही गौरवण्यात येणार आहे. तसेच अभिनय, दिग्दर्शन, तांत्रिक, रंगभूषा-वेशभूषा, लेखनासाठी वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहेत.