‘वर खाली दोन पाय’ या दीर्घांकाचे नाट्यवाचन
मराठी रंगभूमीवर नाटकाचा पुढचा भाग लिहण्याची मोठी परंपरा आहे, पण त्या दरम्यान काय घडले असेल याचा स्वतंत्र नाट्यकृती म्हणून विचार करण्याचा प्रयत्न अपवादाने झाला आहे. हा वेगळा प्रयत्न ठरवून घडावा आणि नवे काही हाती लागावे म्हणून ‘अस्तित्व ‘ या प्रयोगशील नाट्यसंस्थेने ‘त्या दरम्यान ‘ हा उपक्रम हाती घेतला आहे. या नव्या लेखन प्रयोगातली पहिली संहिता लिहली आहे, ती युवा नाट्यलेखक हृषीकेश कोळी याने. त्याने जयवंत दळवी यांच्या ‘पुरुष ‘ नाटकावर आधारित त्या दरम्यान ‘वर खाली दोन पाय ‘ या दीर्घांकाच्या रूपाने शब्दबद्ध केले आहे. गुलाबराव, अंबिका, सिद्धार्थ या अजरामर झालेल्या पुरुष मधल्या पात्रांच्या व्यक्त होण्याच्या त्या दरम्यान लेखक नेमके काय मांडणार याबद्दल नाट्य वर्तुळात विशेष उत्सुकता आहे.
उद्या रविवारी २८ फेब्रुवारीला संध्याकाळी सहा वाजता कुकुज क्लब,पाली हिल,कँडीज कॅफे जवळ,वांद्रे (पश्चिम). इथे या दीर्घांकाचे नाट्यवाचन होणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामुल्य आहे. येत्या वर्षभरात दर महिन्यास एक या प्रमाणे किमान बारा नव्या संहितांचे सादरीकरण खारदांडा इथल्या ‘हाईव्ह ‘ सांस्कृतिक केंद्राच्या सहयोगा करण्यात येणार आहेत.