“प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असते” – भारत गणेशपुरे
आपल्या विशिष्ठ अश्या वऱ्हाडी अंदाजात प्रेक्षकांना लोटपोट हसवतात हसवता, मर्मावर आघात करून त्यांच्या डोळ्यातून पाणी सुद्धा काढणारा, महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनात घर करणारा अभिनेता म्हणजे भारत गणेशपुरे. ‘एक डाव धोबीपछाड’, ‘निशाणी डावा अंगठा’ या मराठी चित्रपटांसह अनेक हिंदी चित्रपट,मालिका, नाटके, जाहिराती, या माध्यमांद्वारे त्यांच्या अभिनयाची चुणूक बघायला मिळालीय. आता पर्यंत जवळपास २५ हून अधिक मराठी चित्रपटांमध्येत्यांनी काम केले आहे. नुकताच प्रदर्शित झालेला ‘बरड’ ह्या सिनेमात त्यांनी महत्वाची भूमिका केली आहे त्या निमित्ते त्यांच्याशी केलेल्या गप्पा:
प्र: आज दूरदर्शनद्वारा तुम्ही महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात पोहोचलात. तुमचे काम लोकांना आवडतेय. तुमच्या आज पर्यंतच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा.
उ: माझा प्रवास अतिशय ग्राउंड लेव्हल वरून झालाय. अमरावतीला मी थिएटर करायचो. १९९८ ला मी मुंबईत आलो. नाटक, मालिका, चित्रपटांशी निगडीत,मिळेल ते काम केले. मग ते मेक-अप असेल किंवा आर्ट डिपार्टमेंटचे असो, ते मी करायचो. काम करता करता, मी त्यांच्याकडे रोल मागायचो. पहिला ब्रेकमिळवायला खूप कष्ट घ्यावे लागले. पण नंतर काम मिळाल्यावर, लोकांना वाटलं कि मी चांगला ऍक्टर आहे. हळू हळू काम मिळणे सोपे होत गेले आणि एक एक करता करता, मी दूरदर्शनच्या मालिकांमधून पण झळकलो. मग माझं काम लोकांना आवडत गेलं. आणि मला दिग्दर्शकाचे फोन यायला सुरवात झाली. शेवटी एवढच की, काम छोटे असो की मोठे. तुम्ही ते काम इमानदारीत करणे महत्वाचे आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश नक्की मिळते.
प्र: ‘बरड’ चित्रपटातील तुमच्या भुमिकेबद्दल थोडक्यात सांगा ?
उ : ‘बरड’ म्हणजे अशी जमीन, जिथे काहीच पिकत नाही. फक्त दगड असलेली जमीन. फारफार तर पाऊस पडला तर गवत उगवतं . अश्या जमिनीला काही भाव नसतो. ह्याची जमीन त्याला आणि त्याची जमीन ह्याला, असा जमिनीचा व्यवहार करणाऱ्या दलालाची व्यक्तिरेखा मी ह्या सिनेमात साकारलीय.
प्र: प्रेक्षकांनी हा सिनेमा का बघावा? सिनेमा बद्दल थोडं सांगा.
उ: मुळात जमिनीतील व्यवहारांबद्दलची जागरूकता आहे. चित्रपट दाखवलेली जमीन विक्रीची फसवणून हि जी समस्या आहे ती शहर आणि ग्रामीण अशा दोन्ही ठिकाणी पाहायला मिळते. अफवांवर विश्वास ठेऊन कशी फसवणूक होते आणि मग संपूर्ण कुंटुंब कसे उध्वस्त होऊ शकते, ह्यावर हा सिनेमा आहे. फसवणुकीच वातावरण सगळीकडे निर्माण झालय, त्यासाठीच हा चित्रपट लोकांनी बघावा. आणि एखादी अफवा माणसाच्या आयुष्यात किती वाईट नुकसान करू शकते. ह्याचे चित्रण ह्या सिनेमात केलय.
प्र: हल्ली संपूर्णपणे केवळ मनोरंजन, धांगडधिंगाणा असलेले सिनेमे, हे जास्त प्रमाणात प्रेक्षकांच्या आवडीस उतरत आहेत. ‘बरड’ सारखा वास्तववादी सिनेमा पाहणारा प्रेक्षक कमी होताना दिसतो, तुम्हाला काय वाटतं ?
उ: हा सिनेमा वास्तववादी आहे. पण त्याची हाताळणी वेगळ्या प्रकारे केली गेली आहे . चित्रपटाची पटकथा प्रभावी आणि फास्ट आहे. चित्रपट रेंगाळत नाही. शिवाय, फिल्म मध्ये मनोरंजनाचा भाग माझ्या वाटेला आहे. लोक हल्ली कॉंमेडी फिल्म जास्त बघतात. पण त्या बरोबरीस असं अंतर्मुख करणारे सिनेमे सुद्धा पाहायला हवे.
प्र: तुम्हाला नाही वाटत, की तुम्हाला उशिरा यश मिळाले ?
उ: तसं नाही म्हणता येणार. आल्या आल्या यश नको मिळायला. कारण, अनुभव हा कामांतूनच येतो. प्रत्येक गोष्टीची ठराविक वेळ असते. तसं खूप प्रोसेस मधुम काम केल्यानंतर, मिळालेल्या प्रसिद्धीची ही एक वेगळी मज्जा असते. त्यामुळे असे नाही म्हणता येणार की खूप उशिरा यश मिळाले.
प्र: यशाचे श्रेय कोणाला देणार ?
उ: अर्थातच प्रेक्षकांना, खरं सांगायचे तर मी शाळा, कॉलेज किंवा इतर कुठूनही अभिनय शिकून आलेलो नाहीये पण जनतेला, प्रेक्षकांना माझा अभिनय, माझी विनोदाची शैली आवडली आणि त्यांनी मला मोठं केलेय. त्यामुळे त्यांचेच आभार.
प्र: ‘बरड’ व्यतिरिक्त इतर कुठले सिनेमे आगामी काळात प्रदर्शित होणार आहेत?
उ: येत्या ऑगस्ट महिन्यात ‘वाघेर्या’ नावाचा एक वेगळा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. समीर आशा पाटील ने त्यांचे दिग्दर्शन केले आहे. कॉमेडी फिल्म आहे. पण, त्यातील माझी व्यक्तिरेखा नक्कीच प्रेक्षकांच्या लक्षात राहील अशी आहे. ऋषिकेश जोशी, सुहास पळशीकर, किशोर चौघुले, किशोर कदम ह्यांच्या बरोबर अभिनयाची भट्टी चांगलीच जमलीये. शिवाय काही चित्रपटांवर काम चालु आहे. जे कदाचित वर्षा अखेर आपल्याला पाहायला मिळतील.