‘प्रेम कहानी’ मराठी कि हिंदी … हीच लपलेली गोष्ट
रेटिंग: ★★ ½
स्टुडीओ: एस. एन मुव्हीज निर्माता: लालचंद शर्मा दिग्दर्शक: सतीश रणदिवे कथा: सतीश रणदिवे छायांकन: विजय देशमुख संकलन: विजय खोचीकर संगीतकार: प्रविण कुवर गीते: योगेश, राजेश बामुगडे, प्रवीण कुवर संवाद: राज काजी, अभिजीत पेंढारकर कलाकार: काजल शर्मा, फैजल खान, उदय टिकेकर, किशोरी शहाणे-वीज, मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, डॉ. विलास उजवणे समीक्षा: उल्हास शिर्के |
सध्या मराठी चित्रपटांची ओळख उत्तम दर्जेदार चित्रपट म्हणून जगभर होत आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये, मराठी चित्रपटांकडे सकारात्मक दृष्टीने पहिले जाते. त्यामुळे, हल्ली मराठी चित्रपटांच्या निर्मिती मध्ये बरेच नवीन निर्माते पुढे येत आहेत. मग त्यांना मराठी भाषा समजत असो वा नसो. कारण, सिनेमाला कोणतीही भाषा नसते. आणि याच कारणामुळे, काही अमराठी कलाकार देखील मराठी चित्रपटांकडे ओढले जाउ लागले आहेत. त्यापैकी काही जण मराठी भाषा शिकतात, तर काहीजणांना असे रोल दिले जातात,की त्यांनी तोडके- मोडके मराठी किंवा हिंदी किंवा इंग्रजी भाषेत बोलले, तरी चालते. कारण मराठी चित्रपट रसिकांचे मन खूप मोठे आहे. त्यांचा, फक्त चांगल्या कथेशी संबंध असतो.
तसेही, मराठी मध्ये प्रेम आणि त्याच्याशी निगडीत पुनर्जन्माशी निगडीत कथा, फारच कमी. त्यामुळे, लालचंद शर्मा नामक निर्माते अनुभवी सतीश रणदिवे या दिग्दर्शकांना सोबत घेऊन, अश्या विषयावरील ‘प्रेम कहानी.. एक लपलेली गोष्ट’ हा मराठी चित्रपट घेऊन आले आहेत. म्हणायला, हा मराठी चित्रपट म्हणून प्रदर्शित होत असला तरी, या चित्रपटाचा उत्तरार्ध जवळ जवळ ९०% हिंदी भाषेत आहे. त्यामुळे, हा चित्रपट, द्विभाषिक असणे, हीच ‘प्रेम कहानी’ ची लपलेली गोष्ट असल्याचे जाणवते.
एकंदरीत, हा चित्रपट तांत्रिक दृष्ट्या उत्तम जमला आहे आणि त्यात राजस्थानात व इतर लोकेशन्स वर चित्रित केलेली विजय देशमुख यांची सुंदर फोटोग्राफी, प्रवीण कुंवर याचे चित्रपटाच्या कथेला साजेसे संगीत, या चित्रपटाच्या जमेच्या बाजू म्हणाव्या लागतील.
हा चित्रपट पुनर्जन्माशी संबंधित असल्यामुळे, चित्रपटाची कथा सांगणे योग्य ठरणार नाही. पण, एका श्रीमंत घरात लाडाने वाढलेली एक कॉंलेज तरुणी सोनल ( काजल शर्मा) , राजस्थानशी निगडीत कुठल्याही चित्राकडे किंवा हस्तकलेकडे पाहून, हरवून जाते. आणि तिचे आई वडील (उदय टिकेकर व किशोरी शहाणे विज) यांना काळजी वाटते. म्हणून ते त्यांच्या खास ओळखीच्या डॉक्टरांना( डॉ.विलास उजवणे) तिची तपासणी करण्यास सांगतात. जरी स्कॅन मध्ये काही आढळले नसले, तरी डॉक्टर आपल्या मुलाच्या (कौस्तुभ दिवाण) मदतीने, सोनल ला इतर मित्र मंडळीं सोबत राजस्थान येथे सहलीला जाण्यास सांगतात .
तेथे गेल्यावार राजस्थान येथील पर्यटनाचा आनंद घेत असता, सोनल ला जैसलमेर येथे एके ठिकाणी, आपल्या पूर्वीच्या जन्मातील सर्व घटना आठवतात. आणि रहस्याचा उलगडा होतो. चित्रपटातील बऱ्याच घटना अपेक्षित वाटतात. त्यामुळे हा चित्रपट हिंदीमधील अश्या विषयावरील ‘कर्ज’, कुदरत’ यांच्यासारखा चांगला सूडपट किंवा उत्कंठावर्धक चित्रपट वाटत नाही.
या चित्रपटातील मुख्य जोडी काजल शर्मा आणि फैसल खान अशी आहे. काजल ने जरी मराठी बोलण्याचा चांगला प्रयत्न केला असला, तरी तिने उच्चारलेले काही शब्द, ती अमराठी असल्याची जाणीव करून देतात. पण, तिने आपला अभिनय उत्तम साकारला आहे. चित्रपटाच्या उत्तरार्धात चित्रपट जवळ जवळ हिंदीत असल्यामुळे, फैसल खान याची एन्ट्री तेंव्हाच आहे. पण त्याने प्रियकराचे आपले काम उत्तमरीत्या केले आहे. उदय टिकेकर, किशोरी शहाणे विज, डॉ.विलास उजवणे, कौस्तुभ दिवाण आणि काजल च्या काही मित्र मंडळींच्या व्यक्तिरेखा सोडल्या, तर फैसल खान, काजल शर्मा( पूर्व जन्मीच्या रुपात) , मिलिंद गुणाजी, निशिगंधा वाड, समीरा गुजर, वैष्णवी रणदिवे पूर्णपणे हिंदी भाषेतच आपले संवाद बोलतात.
ज्यांना पुनर्जन्मावर आधारित प्रेम कथा आवडतात, त्यांनी जास्त अपेक्षा न ठेवता, हा चित्रपट पाहण्यास हरकत नाही. पण मराठी भाषा प्रेमी चित्रपट रसिकांना, हा चित्रपट कितपत आवडेल, हे सांगणे कठीण आहे.