रेश्मा कारखानीस यांचा शब्दांचा सुरेल काव्य प्रवास
कविता ही फक्त आपल्या स्वत:पुरतीच असते तर कधी तिचा सामूहिक आविष्कार होत असतो. व्यवसायाने इव्हेंट मॅनेजर असलेल्या रेश्मा कारखानीस यांच्या मनातील अलवार भावनांना शब्दरूप लाभले आणि त्यातून साकार झाला ‘मी शून्य‘ या शब्दांचा सुरेल प्रवास.
साहित्याची कोणतीही पार्श्वभूमी नसणाऱ्या रेश्मा यांना कविता स्फुरायला लागल्या आणि त्यातून साकार झाला विविध कवितांचा अनुभव देणारा ‘मी शून्य’ हा कविता संग्रह. कवितेला सुरांची साथ मिळाली तर तिचे सौंदर्य आणखी झळाळून येते. रेश्मा यांना गायक केतन पटवर्धन यांची चांगली साथ लाभली असून कवितांची सुरेल मैफल साकारणारा हा प्रवास सहजसुंदर आणि आनंददायी झाला.
प्रत्येक गोष्टीचं असणं अथांग अश्या नसण्यात आहे. असणंच काढून घेतलं तर उरतं नसणं या नसण्याचा प्रवास म्हणजेच ‘मी शून्य‘. या काव्यसंग्रहाला मधु मंगेश कर्णिक व संगीतकार कौशल इमानदार यांची प्रस्तावना लाभली असून सुलेखनकार अच्युत पालव यांची सजावटीने या संग्रहाचे मुखपृष्ठ सजले आहे.