‘टॉकीज लाईट हाऊस’ मध्ये उलगडणार लघुपट कथेचा प्रवास
लघुपट हे सर्जनशील अभिव्यक्ती व प्रयोगाचे माध्यम मानले जाते. आजही बऱ्याचश्या चांगल्या लघुपट हे रसिकांपर्यंत पोहचत नाहीत. एका मराठी वाहिनीने काही महिन्यांपूर्वी लघुपटांच्या प्रेक्षेपनासाठी एक उपक्रम राबवला होता. ज्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. लवकरच ‘झी टॉकीज’ ह्या वाहिनीवर ‘टॉकीज लाईट हाऊस’ या नवीन कार्यक्रम प्रसारित होणार आहे. या आगामी कार्यक्रमात आपणास अनेक उत्कृष्ठ लघुपट पाहायला मिळणार आहेत.
‘झी टॉकीज’ वाहिनीवरील ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे, लघुपटाचा विषय निवडताना त्या विषय निवडीमागचं कारण तसेच तो बनवताना आलेली आव्हानं हे जाणून घ्यायचा प्रयत्न ललित प्रभाकर आणि नेहा महाजन करणार आहेत. लघुपटाच्या विषयानुरूप त्याच धर्तीच्या लोकेशनवर जाऊन या गप्पा रंगणार आहेत.दर रविवारी लघुपट कथेचा हा प्रवास जाणून घ्यायला मिळणार आहे. रविवार १० जानेवारी सायंकाळी ४.३० वाजता याचा पहिला भाग प्रसारित होणार असून पुनःप्रसारणाचा आस्वाद रसिकांना दर शनिवारी सकाळी १० वाजता घेता येईल.