‘मौनांतर २०१६’ या मूकनाट्य स्पर्धेत ‘घनदाट’ प्रथम

Maunantar Competition 2016 Play
‘मौनांतर २०१६‘ मूकनाट्य स्पर्धा

मौनांतर २०१६‘ या मूकनाट्य स्पर्धेत ‘व्यक्ती पुणे‘ या संस्थेच्या ‘घनदाट‘ मूकनाट्याने प्रथम क्रमांक मिळविला . पीव्हीजी सीओईटी, पुणेच्या ‘खिचीक्’ला द्वीतीय क्रमांक तर ‘संवर्धन संस्थे‘च्या ‘संगत‘ने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक मिळविले.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ काल , १८ जुलै रोजी सायंकाळी भरत नाट्य मंदिर येथे क्षितीज पटवर्धन, समीर विद्वांस, अनीश जोग यांच्या हस्ते झाला. कुशल खोत ,सुनील चांदोरकर ,प्रदीप वैद्य ,डॉ दीपक मांडे ,श्री भैरव ,तसेच ‘वाय झेड ‘ मराठी सिनेमाची टीम या पारितोषिक वितरण समारंभाला उपस्थित होती

भरत नाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ‘ड्रीम्स टू रिअ‍ॅलिटी‘ आणि ‘रंगीत तालिम‘, ‘ऐलान ‘ या पुण्यातील संस्थांच्या वतीने या मूकनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २० संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते . स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. अभिनेत्री देविका दफ्तरदार, अभिनेता गिरीश परदेशी हे या स्पर्धेचे परीक्षक होते . ढेपे वाडा , कैलास जीवन यांच्या सहकार्याने ही स्पर्धा पार पडली.

शहरी जीवनातील शौचालयाची समस्या, कुचंबणा ‘व्यक्ती पुणे‘ च्या या ‘घनदाट‘ मूकनाट्यात मांडलेली आहे. मिथुनचंद्र चौधरी लिखित या मूकनाट्याचे दिग्दर्शन सुयश झुंजूरके यांनी केले आहे. आदीत्य बिडकर, महेंद्र मारणे, साहिल जाधव, वैभव पांडव, तेजश्री शिलेदार, अथर्व कानगुडे यांच्यासह २० जणांचा समावेश ‘घनदाट‘ मूकनाट्यात आहे. घनदाटमध्ये प्रकाश योजना सुयश झुंजूरके यांची असून, किरण ढमाले आणि विराज देशपांडे यांनी संगीत दिले आहे.

यावेळी बोलताना परीक्षक गिरीश परदेशी म्हणाले , “मराठी साहित्य समृद्ध असून मूक नाटकातून कविता ,हायकू ,कथा असे मराठी साहित्य दिसण्याची गरज आहे . त्यासाठी नव्या पिढीने वाचनावर भर द्यावा ‘असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक गिरीश परदेशी यांनी केले . मूक नाट्य सादर करताना ‘शांतता ‘-सायलेन्स ‘ चा वापर अधिक व्हावा ‘. लाईट्स चे वैविध्य ,रंगांचे वैविध्य उपयोगात आणले जावे . संगीताचा प्रभावी वापर हेही मूक नाट्याचे बल स्थान ठरते “असा सल्लाही त्यांनी दिला.

Leave a Reply