ज्येष्ठ दिग्दर्शक कांचन नायक यांच निधन
‘कळत नकळत’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक ह्यांचे आज पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कौटुंबिक, भावनात्मक कथा हळुवार पद्धतीने हाताळणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. कांचन नायक हे यांनी गेली साडेचार ते पाच दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील अश्या मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं-मोठी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबतही त्यांनी काम केलं होतं. चित्रपटांसोबतच त्यांनी अनेक उत्तमोत्तम मालिका व माहितीपटांचंही दिग्दर्शन केलं आहे.
भावनाप्रधान चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणारे कांचन नायक यांनी भोजपुरी भाषेतला ‘पिंजडेवाली मुनिया’ व ‘दणक्यावर दणका’ असे विनोदी विषयही चित्रपटाचे दिग्दर्शन करताना लीलया हाताळले. शं.ना. नवरे यांच्या कथेवर केलेली टेलिफिल्म ‘त्या तिथे पलीकडे’ हा नर्मविनोदाचा एक उत्तम नमुना आहे. कांचन नायक ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘राजू’ या संगीतमय चित्रपटाने रौप्यमहोत्सवाबरोबर राज्य शासनाच्या सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या तिसऱ्या पारितोषिकासह एकूण सात पारितोषिके पटकावली होती.