हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘नागरिक’ या चित्रपटात आजची पत्रकारिता कुठल्या थरापर्यंत जाउ शकते आणि त्यामध्ये एका कर्तव्यनिष्ठ पत्रकाराची काय अवस्था होते, हे पाहिले. पण खूप वर्षांपूर्वी लेखक ह.मो. मराठे यांनी त्यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेत त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते.
संतोष काणेकर आणि जितेंद्र जोशी निर्मित आणि क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित नवीन मराठी नाटक ‘दोन स्पेशल’ याच कथेवर आधारित आहे. पंचवीस वर्षापूर्वीची पुणे शहरातील पत्रकारिता, नाट्यरूपात त्यांनी प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभी केली आहे. एका वर्तमानपत्राच्या कर्तव्यनिष्ठ उपसंपादकाच्या आयुष्यात एका रात्रीत घडणाऱ्या दोन घटनांवर हे नाटक आधारित आहे. त्यातून, लेखकाने रात्रपाळीला असणाऱ्या मिलिंद भागवत( जितेंद्र जोशी) या उप संपादकावर, एका विशेष अपघाताच्या बातमीत एका बड्या बांधकाम कंपनीचे व कंपनीच्या मालकाचे नाव छापून न येण्याकरिता, वर्तमानपत्राच्या विश्वस्तांकडून आणि राजकारण्यांकडून येत असलेला दबाव दाखवून दिला आहे. मात्र, नायक खंबीरपणे आपल्या तत्वांना जपून, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांना न्याय मिळवून देण्यासाठी, कोसळलेल्या इमारतीच्या खराब बांधकामाबाबत पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करतो.
एवढेच नव्हे तर, मिलिंदची पूर्वीची प्रेयसी स्वाती( गिरीजा ओक ), जी आठ वर्षांपूर्वी त्याच ऑफिसात काम करत होती, तिचे त्याच रात्री तिथे अचानक येणे आणि तिचा त्या व्यावसायिकाशी सध्या असलेला संबंध, हे सर्व चांगल्या रीतीने जुळवून आणले आहे. त्याच रात्री, मिलिंदकडे आदर्श पत्रकार म्हणून पाहणारा आणि पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण करून, त्याच्या वर्तमानपत्रात नोकरी साठी आलेला तरुण (रोहित हळदीकर ) याचा वापर मिलिंद कसा करून घेतो, हा प्रसंगही चांगला खुलविला आहे. एकंदरीत, रात्री ९ ते १२.१५ या वेळामध्ये एका वर्तमानपत्राच्या कचेरीत काय घडले, याचे हुबेहूब चित्र या नाटकात उभे केले आहे. नाटक जरी सव्वा तीन तासांपेक्षा कमी वेळेचे असले तरी, काहीप्रसंग घड्याळाच्या काट्यासोबतच पुढे सरकतात आणि त्या भयाण रात्रीची जाणीव करून देतात.
नाटकाचा पूर्वार्ध थोडा रखडला आहे, पण उत्तरार्धात मात्र नाटकाने चांगलाच जोर पकडला आहे. आपले वडील हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा, रात्री ड्युटीवर येऊन, आपले कर्तव्य पार पाडणारा हाडाचा पत्रकार जितेंद्र जोशी याने उत्तमरीत्या साकारला आहे. त्याला उत्तम साथ लाभली आहे ती गिरीजा ओक गोडबोले हिची. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या, एका स्त्रीची व्यक्तिरेखा तिने उत्कृष्टरीत्या साकारली आहे. लेखक दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी नेपथ्यकार प्रदीप मुळे याच्या सहाय्याने २५ वर्षांपूर्वीचे वर्तमानपत्राचे ऑफिस हुबेहूब उभे केले आहे. त्यात टेलीप्रिंटर चा वापर, त्याचा होणारा आवाज, जुन्या प्रकारच्या टेलिफोनचा वापर आणि अनमोल भावे याच्या सहाय्याने केलेले ध्वनी संयोजन विशेष आहे. नाटकाचा क्लायम्याक्स ही उत्तमरीत्या सादर केला आहे.
नाटकामधील एक प्रसंग मात्र खटकतो. तो म्हणजे, रात्रपाळीला आलेल्या कर्तव्यानिष्ठ मिलिंदचे, वर्तमानपत्राची पहिली कोपी निघण्याआधी, ड्युटीवर असताना, आपल्या पूर्व प्रेयसी सोबत बाहेर होटेलमध्ये जावून बेजबाबदारपणे सिगारेट व बियर पिणे व तेथे तिच्यासमोर जगातील सर्व बहिणींना उद्धेशून शिवी हासडणे. त्यापेक्षा, दोघांनी मधल्या ब्रेक मध्ये होटेल मध्ये जावून दोन स्पेशल चहा मागवणे, जास्त योग्य वाटले असते. वास्तविक, बियर आणि सिगरेट पिऊन असा अपशब्द उच्चारणे, पंचवीस वर्षांपूर्वीच्या पुण्यातील एका सुसंकृत पत्रकाराच्या तोंडी शोभत नाही. याचा प्रत्यय प्रबोधनकार ठाकरे सभागृहात प्रयोगाच्या वेळी पाठच्या रांगेत झालेल्या चूक.. चूक.. आणि कुजबूजीवरून आला . तसेही आजकालचे मराठी नाटककार( उदा. ‘मि आणि मिसेस’) , प्रेक्षकांना गृहीत धरून चालले आहेत, असे वाटते. हाच अपशब्द मराठी किंवा हिंदी चित्रपटात सेन्सोर च्या कात्रीत सापडतो, मग नाटकांच्या संवादांना सेन्सोर नाही का? खर म्हणजे, असा शब्द एवढ्या चांगल्या विषयाच्या नाटकात वापरण्याची गरजच नव्हती. पुढील प्रयोगात हा शब्दप्रयोग आवर्जून टाळावा. त्यामुळे नाटकाचा दर्जाही उंचावेल.
नाटकातील याच प्रसंगानंतर घडणाऱ्या सीन मध्ये दिग्दर्शकाने जरूर लक्ष्य घालावे. मिलिंद आणि स्वाती हॉटेलात जातात तेंव्हा स्वाती च्या हातात पर्स असते. पण बाहेर आल्यावर जेंव्हा मिलिंद स्वातीला रिक्षा मिळेपर्यंत त्याच्या कचेरीखाली रिक्षा मिळेपर्यंत थांबतो, तेंव्हा ती त्याचे ज्याकेट परत करते आणि रिक्षात बसून घरी जाते. मात्र त्यावेळेस तिच्याकडे पर्स नसते. उलट ती परत येते, तेंव्हा घराची चावी विसरल्याचे सांगते.
असो, हे दोन प्रसंग सोडले तर, नाटकाचे धारदार संवाद विषयाला धरून आहेत आणि सादरीकरणही अति उत्तम झाले आहे. सर्व नाट्यरसिकांनी आणि खास करून सर्व पत्रकारांनी आवर्जून पाहावे असे हे नाटक.