‘तू तिथे असावे’ चित्रपटात भूषण प्रधान आणि पल्लवी पाटीलची हळवी प्रेमकथा
अभिनेता भूषण प्रधान स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. ‘तू तिथे असावे‘ या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या‘ असे बोल असलेले मधुर प्रेमगीत नुकतेच चित्रित करण्यात आले.
नयनरम्य लोकेशन्सवर शूट करण्यात आलेले हे गीत करताना एक वेगळाच मूड जमून आला. तसेच अनाहुतपणे ओठांवर सजणारं हे गीत तरल प्रेमाची अनुभूती देईल असा विश्वास भूषण व पल्लवीने व्यक्त केला. श्रीकृष्ण राऊत यांच्या लेखणीतून साकारलेल्या या गीताला बेला शेंडे व स्वप्नील बांदोडकर यांचा स्वरसाज लाभला आहे. दिनेश निंबाळकर यांनी संगीत दिले आहे तर जीतसिंग यांनी गीताचे नृत्यदिग्दर्शन केले आहे. जी कुमार पाटील एंटरटेण्मेंटची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे‘ या चित्रपटाचे निर्माते गणेश पाटील व दिग्दर्शक संतोष गायकवाड आहेत.
भूषण प्रधान, पल्लवी पाटील यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय पाटकर, जयवंत वाडकर, समीर धर्माधिकारी, मास्टर तेजस पाटील हे कलाकार या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा आशिष-दिपक यांची आहे. संगीत दिनेश अर्जुना तर छायांकन बाशालाल सय्यद यांचं आहे.