लहानग्यांचा आयुष्याचा प्रवास उलगडणार ‘फिरकी’
स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी‘ या आगामी मराठी चित्रपटातून ‘पतंगा’ च्या चित्रचौकटीतून लहानग्याच्या भावविश्वाचा आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरेखरीत्या उलगडण्यात आला आहे. येत्या ९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे.
फिरकीच्या मदतीने पतंगाचा प्रवास कधी उंच भरारीचा तर कधी हेलकावण्याचा असतो. आयुष्याचे ही असेच असते. प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. ‘फिरकी‘ या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या गोविंदला (पार्थ भालेराव) व त्यांच्या मित्रांना पतंग उडवण्याचा खूप नाद आहे.
अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या ‘फिरकी‘ चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर, अभिषेक भाराटे, अथर्व उपासनी, अथर्व शाळीग्राम या बालकलाकारांसोबत हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी, किशोर चौघुले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत. पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत. छायांकन धवल गणबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.