‘सिलसिला अमिताभ का’ ने केला विक्रम
‘बिग बी’ म्हणजेच सर्वांचे आवडते महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असलेला ‘सिलसिला अमिताभ का’ हा कार्यक्रम नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन बाल कलाकार पार्थ भालेराव ह्याच्या हस्ते झाले.
पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, सकाळी ६ ते रात्री १२ अशा १८ तासात १५१ गाण्यांचे सादरीकरण ह्या कार्यक्रमात करण्यात आले. ‘ऑटीझम’ या दुर्मिळ आजाराच्या जागरुकतेसाठी हा विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन संदीप पाटील ह्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सादरीकरण सुरु असताना लाईव्ह पेंटिंग काढण्यात आली होती ; त्यास १५,५१५ रुपये किमत मिळाली . ती संपूर्ण रक्कम ऑटिझमच्या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘प्रसन्न ऑटिझम’ शाळेला देण्यात आली.
सदर कार्यक्रमा दरम्यान आमदार गिरीश बापट यांनी सदिच्छा भेट दिली. ह्याच बरोबर अनेक मान्यवर आणि सेलीब्रीटीजने देखील आपली हजेरी लावली ; त्यात अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांच्या आपल्या नृत्याचे विशेष सादरीकरण केले. सुमारे ४० पेक्षा अधिक गायक, वादक आणि कलाकार सहभागी असलेल्या, १५ तासात १५१ गाण्यांचे सादरीकरणाच्या ह्या कार्यक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे.