स्त्रीकर्तृत्वाचा सन्मान ‘उंच माझा झोका’ पुरस्काराने
सन्मान स्त्रीच्या लढण्याचा, गौरव तिच्या भिडण्याचा हे ब्रीद घेऊन यावर्षीचा ‘उंच माझा झोका ‘ पुरस्कार दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी अतिशय प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. यंदाच्या पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आणि यावर्षी आपल्या कार्याने समाजाला सुदृढ आणि वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गौरव करण्यात आला. तथा आपल्या भरीव योगदानाबद्दल सुनंदाताई पटवर्धन यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर अनुताई वाघ यांच्या ‘ग्राममंगल’ या शैक्षणिक संस्थेच्या कार्यालाही विशेष गौरवण्यात आलं. येत्या २७ ऑगस्टला हा सोहळा सायंकाळी ७ वा. झी मराठीसह झी मराठी एचडी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.
महाराष्ट्राला स्त्री समाजसुधारकांची आणि समाजधुरीण स्त्रियांची मोठी परंपरा आहे. यावर्षी आदिवासींची घरठाणाची चळवळ चालवणा-या डॉ. वैशाली पाटील, दृष्टीहिन तथा गतीमंद मुलामुलींची शाळा चालवणा-या प्रमिला कोकड, रिओ ऑलिम्पिकमध्ये स्टिपलचेस शर्यतीची अंतिम फेरी गाठणारी ललिता बाबर, आपल्या अभिजात साहित्याने मराठी साहित्यक्षेत्राला वेगळ्या उंचीवर नेणा-या अरुणा ढेरे, न्युरोसायन्ससारख्या विषयात आपल्या संशोधनाची पताका फडकविणा-या डॉ. विदिता वैद्य यांच्या कार्याचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक आणि उमेश कामत यांनी तर कार्यक्रमाचं लेखन आणि दिग्दर्शन क्षितिज पटवर्धनने केलं. ‘उंच माझा झोका‘ पुरस्कारांच्या निवड समितीची जबाबदारी ज्येष्ठ संपादक गिरीश कुबेर आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरु डॉ.स्नेहलता देशमुख यांनी पार पाडली.