‘युद्ध’ मध्ये दिसणार समाजात घडणाऱ्या कलंकित घटनांचं प्रतिबिंब
‘माय फ्रेंड गणेशा’ ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रुईया ह्यांचे ‘युद्ध’ ह्या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण होत आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरूनच आपल्याला कळालेच असेल कि, हा एक अॅक्शन चित्रपट आहे म्हणून. समाजातील प्रतिष्ठीत लोकांचे बुरखे फाडून त्यांना समाजासमोर आणण्याची धाडस करणारी ही कथा आहे. पत्रकार रागिणी, या तरुणीची अन्यायामुळे झालेली होरपळ व तिला भोगाव्या लागलेल्या यातनाया व तिने दिलेला त्या अन्यायाविरुद्धचा लढा हा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.
शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्धएक अस्तित्वाची लढाई’ या चित्रपटातून स्त्रीच्या आत्मसन्मानाची गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपटाची कथा शेखर गिजरे यांची आहे. अभिजीत गाडगीळ यांनी या सिनेमाचे लेखन केलं आहे, तर छायांकन सुरेश बिसावेनी व कला दिग्दर्शन सुरेश पिल्लई याचं आहे.
राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर ह्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका असून सोबतीला पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री हि कलाकार मंडळी आहेत. श्रद्धा एंटरटेण्मेंटची निर्मिती, राजीव रुईया दिग्दर्शित हा सिनेमा १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.