‘सन मराठी’ घेऊन येत आहे नवीन मालिका कथा ‘सावली होईन सुखाची (Savali Hoin Sukhachi)’
येत्या १४ ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता एक नवीन प्रेमाची कथा ‘सावली होईन सुखाची’ घेऊन येत आहे. ज्यामध्ये कुटुंबाची गोष्ट तर आहेच पण त्यासोबत मोलकरीण आणि अनाथ मुलीची देखील गोष्ट दाखवण्यात आली आहे.
नुकताच, ‘सावली होईन सुखाची (Savali Hoin Sukhachi)’ या मालिकेचा ग्रँड प्रिमिअर सोहळा, मालिकेचे प्रमुख कलाकार रोनक शिंदे आणि सीमा कुलकर्णी यांच्या उपस्थितीत ठाणे येथे पार पडला. मालिकेला मोठं करणारे हे मायबाप रसिक प्रेक्षकच असतात म्हणून खास त्यांच्यासाठी मालिकेच्या टीमने मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या उपस्थितीत पाहिला आणि प्रेक्षकांनी देखील त्याचा आनंद लुटला आणि मालिकेच्या यशस्वी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा दिल्या.
रोनक शिंदे, सीमा कुलकर्णी यांच्यासह आरंभी उबाळे, रुतविज कुलकर्णी, धनंजय वाबळे, सुप्रिया विनोद, एकनाथ गिते, नैना सामंत, यश पेडणेकर, ज्ञानेश्वरी देशपांडे, अवनिश आस्तेकर, श्वेता मांडे, निशा कथावते, निलेश गावरे, पूनम चव्हाण, सलमान तांबोळी आणि आशिष चौधरी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत.
रतिश तगडे, पदमनाभ राणे आणि महेश बेंडे निर्मित, निशांत सुर्वे दिग्दर्शित ‘सावली होईन सुखाची’ या मालिकेची कथा-पटकथा महाबळेश्वर नार्वेकर यांनी लिहिले असून विशाल कदम यांनी संवाद लिहिले आहेत.
क्षेत्रपाल श्री देव वेतोबाची भूमिका साकारणार प्रथितयश अभिनेता उमाकांत पाटील
आपल्या प्रत्येक नव्या मालिकेतून एका वेगळ्या विषयाला हात घालणारी, सन मराठी ही वाहिनी आता श्री देव वेतोबाची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ (Kshetrapal Shree Dev Vetoba) ही नवी कोरी मालिका १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत.
कोकणातील परंपरा, प्रथा, रुढींशिवाय तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘वेतोबा’. भक्तांचा रक्षणकर्ता, कोकणचा क्षेत्रपाल, संकट निवारक आणि सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. खरं तर वेतोबा म्हणजे भूतनाथ. पण कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धाऊन जाणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे. संकटसमयी वेगवेगळ्या रूपांत हाकेला धावून येणाऱ्या वेतोबाची प्रचिती कित्येक गावकऱ्यांना आलेली आहे. हातात काठी घेऊन भव्य-दिव्य देहरूप असलेला वेतोबा गावांच्या वेशींवर गस्त घालतो. कुणी भक्त संकटात असेल तर त्याचे रक्षण करतो. एवढंच नव्हे तर कोणतेही मोठे काम सुरु करण्यापूर्वी किंवा मोठा निर्णय घेण्यापूर्वी कोकणवासी आपल्या लाडक्या वेतोबाचा कौल घेतात. तशी प्रथाच आहे कोकणात.
श्री देव वेतोबा’चे मंदिर कोकणातील आरवली या ठिकाणी वसलेले असून हे अत्यंत जागृत असे देवस्थान मानले जाते.
आता वेतोबाच्या भूमिकेत दिसणार कोण, हे जाणून घेण्यासाठी अनेकजण उत्सुक असणार. तर रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’, ‘सूर्यवंशी’, ‘सिंबा’, संजय लीला भंसाळी दिग्दर्शित ‘गंगुबाई काठीयावाडी’ इत्यादी हिंदी तसेच तामिळ सिनेमा ‘काला’ आणि ‘एक्सट्रॅक्शन’ या हॉलिवूडपटात अभिनय करुन प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता उमाकांत पाटील वेतोबाची भूमिका साकारणार आहे. या मालिकेचा विचार केला असता त्याची शरीर रचना, बांधा, रूप पाहून वेतोबा ह्या भूमिकेला उमाकांत योग्य न्याय देईल याची खात्री वाटते.
सन मराठी सादर करीत आहे नवी मालिका ‘माझी माणसं’
अल्पावधीतच आपल्या उत्तम मालिकांच्या द्वारे मराठी प्रेक्षकांचे मन जिंकून लोकप्रियता मिळत असलेल्या सन मराठी ही मराठी वाहिनी प्रेक्षकांसाठी अजुन एक नवी मलिका घेऊन आलिये.
आजपासून (३० मे) ‘माझी माणसं’ (Maajhi Maanasa) ही स्वकर्तृत्वावर घर सांभाळणाऱ्या गिरीजाची गोष्ट आपल्याला सन मराठीवर दिसणार आहे. आपल्या वडिलांच्या पश्चात आपल्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सांभाळणाऱ्या ‘गिरीजा’ची ही गोष्ट असून एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स असलेली गिरिजा तिच्या ८ जणांच्या कुटुंबातील एकमेव कमवणारी व्यक्ती आहे.
घरातील सर्वांची काळजी घेत असताना, स्वतःकडे; स्वतःच्या सुखाकडे मात्र ती नेहमीच दुर्लक्ष करते. कुटुंबाचा एकटाच कमवता आधार असल्यामुळे आपल्या भावंडांच्या शिक्षणापासून ते घरखर्च भागवण्याची जबाबदारी सर्वस्वी गिरीजाच पार पाडते. अर्थात या सगळ्या प्रवासात अनेक अडथळे येतात. त्यातून मार्ग काढताना ज्या आपल्या माणसांचा तिला आधार वाटतो, अशी तिला आपली वाटणारी माणसं खरंच तिची आपली आहेत का? ह्या प्रश्नाभोवती मालिका गुंफलेली आहे.
र्तव्यदक्ष आणि जबाबदार गिरीजाची भूमिका या मालिकेत जानकी पाठक (Janaki Pathak) साकारत आहे. झोंबिवली या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या जानकीची ही पहिलीच मालिका आहे. स्मिता सरवदे या मालिकेत गिरीजाच्या आईची भूमिका साकारत असून, दिगंबर नाईक मालिकेत गिरीजाचे काका ही नकारात्मक भूमिका साकारत आहेत. याशिवाय साईंकित कामत, आरती मोरे, भूमिजा पाटील, विजय पाटील, साक्षी महाजन, रोहन पेडणेकर, सोनम म्हसवेकर हे कलाकार सुद्धा या मालिकेत ठळक भूमिकेत दिसणार आहेत. कोठारे व्हिजन यांची निर्मिती असलेली ही मालिका सन मराठीवर ३० तारखेपासून सोमवार ते शनिवार रोज रात्री ८ वाजता महाराष्ट्राच्या प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
सन मराठी ही फ्री वाहिनी सर्व प्रमुख डिटीएच प्लॅटफॉर्म्स आणि केबल नेटवर्क्सवर मोफत उपलब्ध आहे. तसेच ही वाहिनी डीडी फ्री डिश वर देखील चॅनेल नंबर ६ वर उपलब्ध आहे.