१७ कलावंतांचा ‘चित्रकर्मी पुरस्कार’ देवून सन्मान
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदिपक ‘चित्रकर्मी‘ पुरस्कार नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरविण्यात आले.
यावेळी एकूण १७ ‘चित्रकर्मी‘ पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. यात निर्माता- सुभाष परदेशी, दिग्दर्शक – कांचन नायक, लेखक – श्रीनिवास भणगे, छायाचित्रण – चारुदत्त दुखंडे, संगीत – प्रभाकर जोग, कला – शाम भूतकर, रंगभूषा – विक्रम गायकवाड, अभिनेता – राहुल सोलापूरकर, अभिनेत्री – ललिता देसाई, नृत्य – नंदकिशोर कपोते, संकलन – गिरीष ओक, चित्रपटगृह – अरविंद चाफळकर, चित्रपट समिक्षा – अरुणा अंतरकर या सन्माननियांना सन्मानचिन्ह, १० हजार रुपयांचा धनादेश, एक पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, सुमित्रा भावे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांचा विशेष सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार, तेजस्विनी लोणारी, गिरीजा प्रभू, सुवर्णा काळे, अमित कल्याणकर अशा अनेक कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फुटाणे, ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले महामंडळाचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.