अतुल गोगावले दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत

आपल्या संगीतातून संपूर्ण संगीतप्रेमींना वेड लावणाऱ्या ‘अजय-अतुल’ या प्रख्यात संगीतकार जोडीतील अतुल गोगावले आता एका नव्या भूमिकेत दिसणार आहेत.अतुल आता छोट्या पडद्यावर सूत्रसंचालकाच्या भूमिकेतून महाराष्ट्रातील भारतरत्नांची यशोगाथा उलगडणार आहेत.   ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनी वर  प्रजासत्ताक दिनापासून ‘आपले भारतरत्न’ हा कार्यक्रम प्रसारित होणार आहे.  या कार्यक्रमातून महाराष्ट्र जन्मभूमी किंवा कर्मभूमी असलेल्या ९ भारतरत्नांची यशोगाथा महाराष्ट्रातील जनतेसमोर घेऊन येणार आहे.

Atul Gogavale, Singer, Music Composer
Atul Gogavale, Singer, Music Composer

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, आचार्य विनोबा भावे, महर्षी धोंडो केशव कर्वे, जेआरडी टाटा, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी, गानकोकिळा लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर,  नानाजी देशमुख, पांडुरंग काणे या सर्वांची नावं माहित असली तरी त्यांच्या कार्याची संपूर्ण माहिती अनेकांना नाही, ती देण्याचा प्रयत्न ‘आपले भारतरत्न’ या मालिकेतून करण्यात आला आहे. “भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानीत झालेल्या अभिवंदनीय व्यक्तीमत्त्वात महाराष्ट्रातील व्यक्तींची संख्या सर्वाधिक आहे, त्यांची माहिती संपूर्ण महाराष्ट्राला देणाऱ्या कार्यक्रमाचा भाग मला होता आले याचा खूप आनंद वाटतो” असे अतुल गोगावले यांनी सांगितले.