डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित कलर्स मराठीवर ‘जलसा महाराष्ट्राचा’
भारतात दरवर्षी १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याच दिनाचे औचित्य साधून कलर्स मराठीवरून ‘जलसा महाराष्ट्राचा‘ हा कार्यक्रम येत्या रविवारी १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठीवरून प्रसारित होणार आहे. वैचारिक जागर जलसा महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून बघायला मिळणार आहे. या जलश्यामध्ये आनंद शिंदे, लोकशाहीर संभाजी भगत, विदर्भातील नामवंत गायक अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे, गायक प्रसेनजीत कोसंबी, कडूबाई खरात, कव्वालीचा सामना रंगवणाऱ्या सुषमा देवी, आपल्या गीतांच्या माध्यमातून महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीची गोष्ट सांगणारे सचिन माळी, शीतल साठे, भीमस्पंदन बँड, धम्मरक्षक बँड, शिंदेशाहीचा आजच्या पिढीचा वारसा जपणारे डॉ. उत्कर्ष शिंदे आदी कलाकारांच्या गायनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.
याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या आविष्कारच्या ‘संगीत बया दार उघड‘ चे काही प्रवेशही सादर होणार आहेत. डॉ. सुषमा देशपांडे यांचं ‘व्हय मी सावित्री‘ आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने या दोघींनी सादर केलेली या नव्या रूपाची झलकसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. ‘जलसा महाराष्ट्राचा‘ या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे संवेदनशील कवी आणि सामाजिक भान जपणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशी याने.