‘माझे पती सौभाग्यवती’ मालिकेमधून वैभव मांगलेचा वेगळा प्रयोग
बाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं. बाईच्या मनातील हेच दुखणं समजून घेण्याची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून. वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
या मालिकेची कथा आहे एका स्ट्रगलर अभिनेत्याची. अभिनयाची आवड ज्याच्या मनातच नाही तर रक्तात भिनली आहे असा हा अभिनेता. अनेक वर्षे संघर्ष करूनही मनासारखं काम तर मिळालच नाही उलट वाट्याला आली ती अपमानास्पद वागणूकच. त्याच्या संघर्षामध्ये त्याच्या प्रत्येक पावलावर त्याची मनोभावे साथ देतेय ती त्याची पत्नी. आपल्या पतीने खूप नाव कमावावं आणि मोठा अभिनेता व्हावं हे तिचंही स्वप्न. याच दरम्यान वैभवच्या आयुष्यात एक अशी घटना घडते ज्याद्वारे अभिनयाच्या संधीचं एक मोठं दार उघडतं. हाडाचा अभिनेता असलेल्या या नटाला जी मोठी भूमिका मिळते ती असते एका स्त्री पात्राची. अभिनेता म्हणून ओळख कमवायला आलेल्या नट पहिल्यांदाच एक मोठी भूमिका मिळते पण तीही स्वतःची ओळखच मिटवून टाकणारी. पण हे आव्हान स्वीकारून स्वतःच्या अभिनेता या ओळखीबरोबरच या पात्राची नवी ओळख निर्माण करतो का ? आपल्या दैनंदिन आयुष्यात बाईचं अस्तित्वदुर्लक्षित करू पाहणाऱ्या त्याच्या आयुष्याला या कामामुळे कलाटणी मिळते का? त्याच्या स्वप्नांची पूर्तता होते का ? या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून.
झी मराठी वर दाखल होणाऱ्या या मालिकेची निर्मिती मंदार देवस्थळी ह्यांनी केली आहे. ज्यामध्ये वैभव मांगले बरोबर नंदिता धुरी, अशोक शिंदे, रमेश भाटकर, उदय सबनिस, स्नेहा माजगावकर, अद्वैत दादरकर हि कलाकारही या मालिकेत असणार आहेत.