पूर्वा गोखले दिसणार ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमात

पूर्वा गोखले हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रीनं मराठी रसिकांसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हिच पूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून, ‘भयभीत’ या आगामी  सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.

Actress Poorva Gokhale
Actress Poorva Gokhale

पूर्वा गोखलेची ‘कुलवधू’ हि  मालिकेतील खूप गाजली होती. तसेच पूर्वाने ‘कहानी घर घर की’, ‘कोई दिल में है’ या हिंदी मालिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिची ‘तुझसे है राबता’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. ‘कुलवधू’ या मालिकेतील नायक सुबोध भावे आगामी ‘भयभीत’ या सिनेमातही पूर्वा सोबत काम करीत आहे.  रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.

‘भयभीत’ या सिनेमात पूर्वा गोखले आणि सुबोध भावे बरोबर मधू शर्मा, गिरीजा जोशी, मृणाल जाधव आणि यतीन कार्येकर हे कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची असून अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

‘अक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स‘ ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू केलं आहे. २८ फेब्रुवारीला हा  चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.