‘संघर्षयोद्धा’ चित्रपट २६ एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला!!
मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनपटाचा वेध “संघर्षयोद्धा – मनोज जरांगे पाटील” (Sangharshyodha Manoj Jarange Patil) या चित्रपटातून घेतला जाणार आहे. घोषणा झाल्यापासूनच या चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता आहे. चित्रपटाच्या टीजर ला ही अफाट प्रतिसाद मिळाला आहे. गायक अजय गोगावले यांच्या आवाजात “उधळीन जीव…” हे हृदयस्पर्शी गाणं या चित्रपटाचं आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. २६ एप्रिल रोजी “संघर्षयोद्धा” मनोज जरांगे पाटील हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
शिवाजी दोलताडे यांनी दिग्दर्शनाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे. या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका अभिनेता रोहन पाटील यांनी साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
“उधळीन जीव….” या गाण्याचं लेखन वैभव देशमुख यांनी केलं असून, संगीतकार विजय नारायण गवंडे यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे. तर गायक अजय गोगावले यांनी त्यांच्या भावोत्कट आवाजात हे गाणं गायलं आहे. मनोज जरांगे यांच्या व्यक्तिमत्त्वातला साधेपणा आणि समाजासाठी काही करण्याची धडपड या गाण्यात मांडण्यात आली आहे. वैभव देशमुख यांचे भावगर्भ शब्द, विजय गवंडे यांचं अंतर्मुख करणारं संगीत आणि अजय गोगावले यांचा काळजाला हात घालणारा आवाज यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही. चित्रपटाविषयी आधीच उत्सुकता ताणली गेली असताना आता या गाण्यानं त्यात आणखी भर पडणार आहे.