‘जय जय महाराष्ट्र माझा’ मधून महाराष्ट्राच्या शिलेदारांना मानवंदना
विविध कलागुणांनी संपन्न अशा महाराष्ट्राचे हे कलागुण अंगी जपत जगभरात महाराष्ट्राचा झेंडा उंच फडकवणाऱ्या शिलेदारांना समर्पित आहे, या आठवड्यातील ‘जय जय महाराष्ट्र माझा’चा विशेष भाग. या भागात आपल्यातील कलागुणांना खतपाणी घालून महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार्या कलाकारांना सलाम केला जाणार आहे. याशिलेदारांमध्ये दादा कोंडके, आशा भोसले, भालजी पेंढारकर, स्मिता पाटील, अरूण दाते, लक्ष्मण देशपांडे, व्ही शांताराम आणि सुरेश वाडकरांसारख्या दिग्गजांच्या कलाकृतींचं सादरीकरण होणार आहे.
मराठी सिनेमांमध्ये या सगळ्यांचं योगदान अपार आहे. या सिनेमांमधील नभ उतरू आलं, आला आला वारा, झुंजुर मुंजुर, भातुकली, या जन्मावर, आधा है चंद्रमा सारख्या गाण्यांतून यांच्या कारकीर्दीला सलाम केला जाईल. त्यांशिवाय दादा कोंडकेंच्या विच्छा माझी पुरी करा तर नाट्यकर्मी लक्ष्मण देशपांडेच्या वऱ्हाड निघाले लंडनलाचं सादरीकरण या भागात होईल. मराठी सिनेसृष्टीला भरभरून दिलेल्या या मंडळींच्या कलाकृतींनी नटलेला असेल, ‘जय जय महारष्ट्र माझा’चा हा भाग येत्या २३ आणि २४ मार्च ला सोनी मराठीवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे