कोरोनायोध्द्या डॉक्टरांमधल्या ‘दैवी’रूपाला तेजस्विनी पंडितने दिला ट्रिब्यूट

Tribut to corona warriors poster by actress Tejaswini Pandit
Tribute to corona warriors poster by actress Tejaswini Pandit

अभिनेत्री तेजस्विनी पंडितचे नवरात्री स्पेशल फोटोशूट तिच्या चाहत्यांमध्ये आणि सिनेसृष्टीमध्ये चर्चेचा विषय असतो.  २०१७ पासून तेजस्विनी पंडित दरवर्षी एका नव्याविषयासह नवरात्रीचे फोटोशूट करत असते.  दरवर्षी वैविध्यपूर्ण कल्पनांव्दारे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तेजस्विनी आपले फोटोशूट घेऊन येते. यात कधी स्त्रीशक्तीला सलाम असतो, तर कधी अदिशक्तीला आदरांजली असते तर कधी सद्यस्थितीवर केलेले भाष्य असते.

यंदा तेजस्विनी आपल्या फोटोशूटमधून कोरोनायोध्द्यांना सलाम करत आहे.नवरात्रीच्या पहिल्या दिवशी डॉक्टर बनून पीपीई किट घातलेली रूग्णांना जीवनदान देणारी देवी तेजस्विनीने साकारलेली आहे. आपल्या ह्या फोटोशूटविषयी तेजस्विनी पंडित म्हणते, “ रूग्णांचे प्राण वाचवणं ही विज्ञानाने डॉक्टरांना दिलेली ‘दैवी’ देणगी आहे. कोणत्याही संकटकाळी आपण देवाचा धावा करतो. आणि पहा ना. कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स आणि आरोग्यसेवेशी निगडीत कर्मचारी कसे देवासारखे धावून आले. आपली वैयक्तिक सुखदु:ख विसरून अहोरात्र रूग्णसेवा करणा-या डॉक्टरांमधल्या दैवी कर्माला ह्या फोटोव्दारे वाहिलेली ही आदरांजली आहे.”