‘वेगळी वाट’ चित्रपटात दिसणार वडील-मुलीच्या नात्याची मनःस्पर्शी कथा
चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून विशेषतः मराठी चित्रपट बऱ्याचदा मनोरंजनातून समाजप्रबोधनही घडवतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही . मराठी चित्रपटांचे आशय-विषय हे नेहमीच प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. जयश्री शाह आणि तुषार शाह प्रस्तुत ‘वेगळी वाट’ या चित्रपटकाचे लेखन-दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे तर अलीकडेच त्यांनी आपल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित केली आहे.

अच्युत नारायण आणि आशिष राखुंडे यांनी लिहिलेली ‘वेगळी वाट’ची मनःस्पर्शी पटकथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली आहे. एका सुखी चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास रेखाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल यात काहीच शंका नाही. या चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात असून ‘वेगळी वाट’च्या पहिल्या-वाहिल्या झलकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. या चित्रपटाचे छायांकन शकील खान यांचे आहे तर मंसूर आजमी यांचे संकलन, विजया शंकर, डॉ. दिनेश अर्जुना यांचे संगीत आणि सुनील सिंह यांचे पार्श्वसंगीत असून ‘वेगळी वाट’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला आपल्या भेटीस येणार आहे.