मातृदिनाच्या निमित्ताने सोनाली खरेने केली ‘मायलेक’ची घोषणा
जवळपास प्रत्येक कलाप्रेमी, कलाकराचे स्वप्न असते की आपणही निर्माता/निर्माती होऊन उत्तोमोत्ताम कलाकृति निर्माण करावी. गेल्या काही महिन्यात आपण बघितलेय की अनेक मराठी कलाकारनी चित्रपट निर्मितीमधे आपले पदार्पण केले आहे. ह्या मध्ये अजुन एक अभिनेत्रीचा, निर्माती म्हणून समावेश झाले आहे. मातृदिनाचे खास निमित्त साधत अभिनेत्री सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे.
नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे. लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार असून चित्रपटाची वेगळी कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा तिचा विश्वास आहे.