‘मानाचा मुजरा’ कार्यक्रमातून बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा
कलर्स मराठी प्रस्तुत ‘मानाचा मुजरा‘ कार्यक्रमातून राजकारण, क्रिकेट, संगीत, अभिनय अशा निरनिराळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना सुप्रिमो उद्धव ठाकरे, युवा शिवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे, क्रिकेटपटू सुनील गावस्कर, विनोद कांबळी, राजू कुलकर्णी, गायक सुरेश वाडकर अभिनेता सुबोध भावे यांसारख्या विविध क्षेत्रातील रथी-महारथींना एकाच वेळी एकाच स्टेज वर स्तुत्यभाव रेखाटताना पाहण्याचा विलक्षण योग अद्वितीय आहे. बाळासाहेब ठाकरे यांना ‘मानाचा मुजरा’ या कर्यक्रमानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शरद पवार, संपूर्ण ठाकरे कुटुंबिय एकत्र उपस्थित असणं ह्या कार्यक्रमाचे विशेष औचित्य दर्शवते. सुधीर गाडगीळ, द्वारकानाथ संझगिरी, अवधूत गुप्ते यांसारख्या अवलियांच्या प्रश्नांनी कधी भावनिक करून तर कधी नर्मविनोदांनी कार्यक्रमास रंगत आणली.
बाळासाहेबांच्या आठवणीत रममाण होताना महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युती चर्चेत येणाऱ्या अडचणींवर बाळासाहेब मोठ्या मनाने निर्णय घेत व त्यामुळे युती टिकून राहिल्याचे सांगितले. बाळासाहेबांचे जीवश्च कंठश्च मित्र व राजकारणातील पारंगत व्यक्तिमत्त्व शरद पवार बाळासाहेबांना ‘दिलदार शत्रू’ची पदवी देत लहानातील लहान माणसाचे कर्तृत्व ओळखून त्याला मोठं करायच्या बाळासाहेबांच्या वृत्तीची ओळख करून दिली. एरव्ही महाराष्ट्रातील झंझावतं वादळ म्हणून ओळखले जाणाऱ्या हिंदुहृदयसम्राटांमधील एक वडील व आज्या उलगडताना उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे भावुक झाले.
बाळासाहेबांचे क्रिकेट वरील प्रेम कधीच कोणापासून लपून राहिले नाही. वेळोवेळी बाळासाहेबांनी दिलेले धिराचे शब्द आजही हृदयात कोरले असल्याचे सांगत षटकारांचा बादशाह सुनील गावस्कर बाळासाहेबांच्या आठवणींत विलीन झाला. सुप्रसिद्ध अभिनेता संजय दत्त पित्यासमान बाळासाहेबांच्या असीम प्रेमाचे दाखले देताना सांगतो की,”मी जेल मध्ये असताना जेव्हा सर्वांनी माझी साथ सोडलेली तेव्हा, ‘काळजी नसावी, मी आहे इथे’ बोलणारे साहेब एकचं होते.”
संजय राऊत प्रस्तुत, वायकॉम १८ मोशन पिक्चर्स, कार्निवल मोशन पिक्चर्स आणि राऊटर्स एंटरटेनमेंट एलएलपी निर्मित ‘ठाकरे‘ येत्या २५ जानेवारी ला संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे.