‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केला, कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र आपल्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्स, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला.
यावेळी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम हे तीन निर्माते तसेच माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसले, सिटी प्राइड चित्रपटगृह समूहाचे व्यवस्थापक सुगत थोरात, क्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशी यांच्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे या शहरातील चित्रपटगृहांचे व्यवस्थापक, डोअर किपर्स, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्स आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत असलेल्या या भव्य चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. अंदाजे ह्या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे .