‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी पहिल्यांदाच एकत्र
पर्यावरण अभ्यासक आणि लेखक संतोष शिंत्रे यांच्या कथेवर बेतलेला ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी (Institute of Pavtology)’ या मराठी चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे. ह्या चित्रपटाच्या हटके नावामुळे तर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहेच शिवाय या चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी ह्या अभिनेत्यांना पडद्यावर एकाचवेळी पहायला मिळणार आहे हे विशेष.
प्रसाद नामजोशी यांनी चित्रपटाचं पटकथा आणि संवादलेखन केलं असून चित्रपटाची निर्मिति ब्लिंक मोशन पिक्चर्स आणि अभिषिक्ता एन्फोटेन्मेंटची आहे. प्रसाद नामजोशी आणि सागर वंजारी यांनी दिग्दर्शन केलं आहे. या दोन्ही दिग्दर्शकांचे या पूर्वीचे चित्रपट राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरवले गेले असल्यानं ‘इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी’ या चित्रपटाविषयी चित्रपटसृष्टीत चर्चा आहे.
चित्रपटात सयाजी शिंदे आणि गिरीश कुलकर्णी ह्यांच्यासह दिलीप प्रभावळकर, शशांक शेंडे, दीप्ती देवी, संदीप पाठक, पार्थ भालेराव, देवेंद्र गायकवाड, सुयश झुंजुरके, विजय निकम, शिवराज वाळवेकर अशी दमदार स्टारकास्ट आहे. सागर वंजारी यांनी संकलन, विजय नारायण गवंडे यांनी संगीत दिग्दर्शन, गिरीश जांभळीकर यांनी छायांकनाची जबाबदारी निभावली आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच हा चित्रपट दाखवला गेला. महोत्सवात चित्रपटाला भरभरून दाद मिळाली होती. नावा प्रमाणे चित्रपट नक्की काय हटके पहायला मिळणार ह्याची उत्सुकता असणार आहे