‘वाजे पाऊल आपुले’ आणि ‘टिळक आणि आगरकर’ नाटकांचे पुन्हा रंगमंचावर आगमन

Marathi natak 'Waje Paul Apule'
Abhijeet Chavan and Purnima Talwalkar, Marathi natak ‘Waje Paul apule’

१९६७ मध्ये रंगमंचावर सादर झालेले प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित, दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी यांच्या अभिनयाने पावन झालेल्या ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं ‘टिळक आणि आगरकर‘ या नाटकांच्या पुनरुज्जीवन होत असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार, व उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी जाहीर केले.
अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी ‘वाजे पाऊल आपुले‘ या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या २४ नोव्हेंबर पासून सर्वत्र सुरु होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे. जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यात त्यांनी तेव्हा केलेलीच भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करीत असून त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशिलाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोबत अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे गुणी कलावंत आहेत.

टिळक आणि आगरकर‘ हे नाटक आज २०१८ मध्ये पुनश्च रंगभूमीवर येत आहे मात्र थोडं वेगळ्या स्वरुपात. त्याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत, त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केले जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं हे नाटक दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य पेललं आहे ‘लोकमान्य एक युगपुरुष‘ या चित्रपटाचे संवादकार कौस्तुभ सावरकर यांनी. ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाच्या अभिवाचनात सहभाग घेणाऱ्या कलावंतामध्ये गोपाळराव जोशी(उन्मन बाणकर), गोपाळराव आगरकर(अंगद म्हसकर), यशोदा आगरकर(मिथिला मुरकुटे), बळवंतराव टिळक(कौस्तुभ सावरकर) तसेच ‘श्री. नाट्यरंग कर्जत’च्या नवोदित गुणी कलावंतांचाही सहभाग आहे.