श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते ‘अ.ब.क’ चित्रपटातील स्फुर्ती गीताचे लोकार्पण
आगामी मराठी चित्रपट ‘अ.ब.क’ च्या स्फुर्ती गीताचा सोहळा संपन्न नुकताच ‘आर्ट ऑफ लिविंग’चे सर्वेसर्वा गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते त्यांच्या आश्रमातील प्रचंड जनसमुदायाच्या समवेत पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल मा. किरण बेदी व मा. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या.
ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ. ब. क’ या चित्रपटाद्वारे ‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ चा संदेश देण्यात आला आहे . यावेळी चित्रपटातील नायक लायन फेम सनी पवार, साहिल जोशी, आर्या घारे, दीपाली बोरकर या कलावंतास निर्माते मिहीर सुधीर कुलकर्णी, दिग्दर्शक – रामकुमार गोरखनाथ शेडगे, लेखक – आबा गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
अश्विनी शेंडे शामराज दत्ता लिहलेल्या गीतांना संगीतकार बापी – टूटूल ह्यांनी संगीतबद्ध केले असून त्यासाठी अमृता देवेंद्र फडणवीस ह्यांनी पार्श्वगायन केले आहे . लवकरच हा चित्रपट प्रेक्षांच्या भेटीस येणार आहे .
झी युवावर ‘संगीत सम्राट’ची महा अंतिम फेरी
झी युवा वरील संगीत सम्राट च्या पहिल्या पर्वातील अंतिम भेरी उद्या रविवार, ०६ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘संगीत सम्राट‘ या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे याने सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे परीक्षण केले तर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका क्रांती रेडकर वानखडे कलाकारांच्या परफॉर्मन्स किती मनोरंजनात्मक आहेत हे पहिले. त्याच प्रमाणे तरुणाईचा लाडका गायक रोहित राऊत आणि अभिनेत्री उर्मिला निंबाळकर यांनी निवेदनाची भूमिका उत्तम सांभाळली.
आता ‘संगीत सम्राट‘ कार्यक्रम त्याच्या अंतिम चरणावर पोहचला आहे. सर्व स्पर्धकांमधून सर्वप्रथम १५० स्पर्धक निवडले गेले , त्यांनतर ६० , २४ , १२ असे उत्तमोत्तम स्पर्धकी निवडले गेले आणि आता या सर्वांमधून नंदिनी अंजली , इशिता विश्वकर्मा , मानस गोसावी , संगीत फॅक्टरी , इमोशन्स बँड , प्रथमेश मोरे , रवींद्र खोमणे आणि दंगल गर्ल्स हे ८ फायनलिस्ट निवडले गेले आहेत . या ८ उत्कृष्ट स्पर्धकांतून महाराष्ट्राचा पहिला संगीत सम्राट निवडला जाणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची वाट बघत आहेत तो अंतिम महा सोहळा दिनांक ६ ऑगस्ट ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पाहायला मिळेल .
१७ कलावंतांचा ‘चित्रकर्मी पुरस्कार’ देवून सन्मान
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने नेत्रदिपक ‘चित्रकर्मी‘ पुरस्कार नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. या सोहळ्यात पुण्यातील चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या कलाकार व तंत्रज्ञांना हा पुरस्कार देवून त्यांनी दिलेल्या चित्रपटसृष्टीच्या योगदानाबद्दल त्यांना सन्मानित करून गौरविण्यात आले.
यावेळी एकूण १७ ‘चित्रकर्मी‘ पुरस्कार या वेळी प्रदान करण्यात आले. यात निर्माता- सुभाष परदेशी, दिग्दर्शक – कांचन नायक, लेखक – श्रीनिवास भणगे, छायाचित्रण – चारुदत्त दुखंडे, संगीत – प्रभाकर जोग, कला – शाम भूतकर, रंगभूषा – विक्रम गायकवाड, अभिनेता – राहुल सोलापूरकर, अभिनेत्री – ललिता देसाई, नृत्य – नंदकिशोर कपोते, संकलन – गिरीष ओक, चित्रपटगृह – अरविंद चाफळकर, चित्रपट समिक्षा – अरुणा अंतरकर या सन्माननियांना सन्मानचिन्ह, १० हजार रुपयांचा धनादेश, एक पुस्तक असे पुरस्काराचे स्वरूप होते. अभिनेते मनोज जोशी, दिग्दर्शक राजेश मापुस्कर, सुमित्रा भावे या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणाऱ्या कलावंत व तंत्रज्ञांचा विशेष सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला.
यावेळी अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार, तेजस्विनी लोणारी, गिरीजा प्रभू, सुवर्णा काळे, अमित कल्याणकर अशा अनेक कलाकारांनी बहारदार नृत्य सादर केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रामदास फुटाणे, ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले महामंडळाचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
सुप्रिया विनोद यांना आली आशा काळेंची आठवण
एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला. जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशाकाळे हे भारदस्त नाव. त्यांचा अभिनय आजहीप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या ‘गोठ‘ या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली.
सुप्रिया म्हणतात, ‘तुळशीला हात जोडण्याचा सीन केला ‘गोठ‘मध्ये. आशाताई काळेंचीआठवण आली. अशा प्रसंगात पूर्णकन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम. तसं जमेलच असं नाही. पण एक प्रामाणिकप्रयत्न… त्यांना सलाम!‘
स्टार प्रवाहवरील ‘गोठ‘ या मालिकेत ‘कांचन’ याभूमिकेचं वर्णन सुप्रिया करतात, “मालिकेत भूमिका करण्याचा एक मोठा फायदा असतो. खूप वेगवेगळ्या छटा साकार करायला मिळतात. चित्रपट किंवा नाटक आपल्याला जास्तीत जास्त तीन तास एक भूमिका रंगवायची संधी देतात. ‘गोठ ‘ मलिकेने मला कांचन म्हणून जगायची सुंदर संधी दिली आहे. खूपअन्तर्मुख, दबलेली,साध्या साध्या आनंदांपासूनही वंचित, मानसिकदृष्टया दुर्बल…एक वेगळी सुंदर भूमिका …खूप छटा असलेली“. त्यांची भूमिका आणि आशा काळेयांच्या गाजलेल्या भूमिकांमध्ये हेच साम्य आहे.
सोनूच्या गाण्याचं मालवणी व्हर्जन
सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रुपाची पण यात भरवश्याचा प्रश्न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे. आणि हे गाववाले आहेत ‘गाव गाता गाजली‘ या झी मराठीवरील आगामी मालिकेतील गावकरी.
मालवणातील गजलीची धम्माल या मालिकेतून बघायला मिळणार आहे. याच मालिकेच्या प्रमोशनचा भाग म्हणून हा खास व्हिडीओ तयार करण्यात आला आहे. ज्यात मालिकेत एक महत्त्वाचं पात्र साकारणारा प्रल्हाद कुडतरकर हा भरवश्याचा प्रश्न विचारतोय ‘गाववाल्यानू तुमचा आमच्यावर भरवसो नाय काय?‘ या गाण्यातून आणि बाकी गावकरी त्याला साथ देतायत. प्रल्हादला आपण यापूर्वी ‘रात्रीस खेळ चाले‘ या मालिकेत पांडू्च्या भूमिकेत बघितलं होतं. याही मालिकेत तो एका खास भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. याशिवाय या व्हिडीयोमध्ये प्रसिद्ध विनोदी अभिनेता दिगंबर नाईक, भरत सावले, किशोर रावराणे आणि इतर कलाकार हे प्रल्हादला साथ देतायत. सध्या सोशल मीडियावर या व्हिडीयोने धुमाकुळ घातला असून गाववाल्यांसाठीची ही मालवणी विनंती चाहत्यांना आवडत आहे.
‘गाव गाता गाजली‘ ही मालिका येत्या २ ऑगस्टपासून बुधवार ते शनिवार रात्री ९.३० वा. प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल
‘चाहूल‘ मालिकेमध्ये भोसलेंनी वाडा सोडल्यानंतर आता सगळेच निश्चिंतच आहेत. वाड्यामध्ये असलेल्या भूतापासून आता कुठलाही त्रास होणार नाही, कुठ्लीच भीती नाही या घरामध्ये आता आपण निवांत राहू शकतो असा विचार करून आलेल्या भोसल्यांना खरोखरच शांतता लाभणार आहे कि नाही? निर्मला त्या वाड्यामधून कशी बाहेर पडणार? हे सगळे बघणे रंजक असणार आहे. शांभवी आता भोसले परिवाराला सोडून गेली असली तरी तिला सर्जाची आठवण येते आहे. ती प्रत्येक क्षणी त्याला आठवत आहे. शांभवी आणि सर्जामधील हा दुरावा दाखविण्यासाठी ‘चाहूल‘ मालिकेमध्ये खास गाण्याचे शूट केले आहे.
परंतु शांभवीला ही सतत येणारी आठवण म्हणजे पुन्हा एकदा कुठल्या अघटीताची चाहूल तर नाहीना ? या सर्जाला भोसले वाडा सोडून जाणे मान्य नसताना देखील तो नवीन घरी रहायला जातो. पण, या वाड्यामध्ये देखील काहीना काही अघटीत घडतेच आहे. त्यामध्ये भर म्हणजे आता जुन्या भोसले वाड्यामधून निर्मलाने स्वत:ची मुक्तता केली आहे. ती वाड्यामधून बाहेर पडली आहे. वाड्यामधून बाहेर म्हणजेच ती एका बाहुलीच्या मदतीने नव्या भोसले वाड्यात आली आहे. निर्मला आता कुणाकुणाला त्रास देणार आहे? निर्मलाने स्वत:ची सुटका जुन्या भोसले वाड्यामधून केल्याचे शांभवीला कळणार का? शांभवी पुढे काय करणार ? या सगळ्यामध्ये शांभवीला सर्जाच्या प्रेमाची चाहूल लागणे आणि वाड्यामध्ये निर्मला परतणे, काय करेल शांभवी कसा मार्ग काढेल या गुंत्यातून हे बघणे रंजक असणार आहे.
जोनिता गांधी, अॅश किंग यांनी ‘ड्राय डे’ चित्रपटासाठी गायलं ड्युएट गाणं
गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांततली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचं सातत्यानं दिसू लागलं आहे. हा ट्रेंड आता वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वेगळ्या नावामुळे अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ‘ड्राय डे‘ या चित्रपटासाठी जोनिता गांधी आणि अॅश किंग या मातब्बर गायकांनी ड्युएट गायलं आहे. या चित्रपटातून या दोघांनी मराठीत पदार्पण केलं आहे.
आनंद सागर प्रॉडक्शन्सच्या संजय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर, ऑस्कर विजेत्या ए. आर. रेहमान यांचे सहकारी असलेल्या अश्विन श्रीनिवासन यांनी चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाद्वारे अश्विन यांचाही मराठी चित्रपट संगीतातला प्रवास सुरू झाला आहे. जोनिता आणि अॅश यांनी जय अत्रे लिखित ‘गार गार कोळशात उठावी ही आग कशी‘ हे ड्युएट गाणं गायलं आहे. पांडुरंग जाधव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून येत्या ८ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.
हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये जोनिता गांधी हे मोठं नाव आहे. जोतिनानं ओके कन्मनी चित्रपटातलं मेंटल मनधिल, दंगल चित्रपटातलं ‘गिलहारियाँ‘, हायवे चित्रपटातलं ‘कहाँ हुँ मैं‘ अशी गाजलेली गाणी गायली आहेत. तर अॅश किंगनं ‘आएशा सुनो आएशा‘, हाफ गर्लफ्रेंड चित्रपटातलं ‘बारिश‘, ऐ दिल है मुश्किल चित्रपटातलं ‘अलीझेह‘ अशी गाणी गायली आहेत.
ठाई ठाई माझी विठाई…
‘आली आषाढी एकादशी…चला करू पंढरीची वारी…माझी विठ्ठल रखुमाई!‘ असं म्हणत विठ्ठलाच्या दर्शनासाठी आसुसलेल्या भाविकांसाठी ही वारी म्हणजे आत्मानंदाचा अनुभव असतो. हाच अनुभव ‘विठ्ठला शप्पथ‘ या आगामी मराठी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना घ्यायची संधी मिळणार आहे. गुरुदर्शन फिल्म्स आणि पहेल प्रोडक्शन एल.एल.पी यांची निर्मिती असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन चंद्रकांत पवार यांनी केले आहे.
‘विठ्ठला शप्पथ‘ या चित्रपटाची कथा, पटकथा चंद्रकांत पवार यांची असून संवादलेखन चंद्रकांत पवार, कौस्तुभ सावरकर, भानुदास पानमंद यांचे आहेत. पंढरीच्या विठ्ठलाची महती सांगणारे, गायक राहुल देशपांडे यांच्या आवाजातील भक्तीगीत नुकतंच ध्वनीमुद्रित करण्यात आलं आहे.
झळही नसे मज तापल्या उन्हाची… घरकुल सावरी सावली कुणाची
म्हणे तुका नामा जनाई… ठाई ठाई माझी विठाई…
माळ तुळशीची टिळा चंदनाचा भाळी… शिणला हा देह जरी थकली ना टाळी
सोडवून सारी अंधाळाची जाळी… दिस नवा येई तुझी ऐकण्या भूपाळी
आभाळाला देई निळाई… ठाई ठाई माझी विठाई…
मंगेश कांगणे यांच्या लेखणीतून साकारलेल्या ‘ठाई ठाई माझी विठाई‘ गीताला चिनार-महेश यांचा संगीतसाज लाभला आहे. ‘व्हिडिओ पॅलेस’ ही म्युझिक कंपनी या चित्रपटातील गाणी प्रकाशित करणार आहे. अशा अतिशय समर्पक शब्दात विठ्ठल भक्तीचं यथार्थ वर्णन करणारे हे गीत सगळ्यांनाच समाधानाची अनुभूती देईल.
‘तू माझा सांगाती’ मालिकेमधील चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांच्या भेटीला
संसार आणि अध्यात्म यांचा सुयोग्य मेळ साधत मनामनाला भक्तीचा संदेश देणारे संत म्हणजे विठुरायाचे भक्तश्रेष्ठ संत तुकाराम. तुकारामांच्या अंभगवाणीने प्रत्येक मराठी माणसाच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केले आहे. याच संतश्रेष्ठाचा जीवनप्रवास कलर्स मराठीवरील ‘तू माझा सांगती ‘ या मालिकेतून प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. याच मालिकेमध्ये संत तुकारामांची व्यक्तिरेखा साकारणार महाराष्ट्राचा लाडका अभिनेता चिन्मय मांडलेकर वारकऱ्यांना भेटायला वारकऱ्यांच्या रुपात जाणार आहे. तसेच ‘तू माझा सांगाती‘ मालिकेचे १००० भागांचा पल्ला गाठला असून प्रेक्षकांना आता लवकरच तुकारामांच्या मुखी विठ्ठल रखुमाईची संसारगाथा बघायला मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका ‘तू माझा सांगाती – पर्व दुसरे‘ लवकरच कलर्स मराठीवर.
विठुरायाचे भक्त पंधरा ते वीस दिवस पायी प्रवास करून विठ्ठलाच्या दर्शनास येतात. संत तुकाराम महाराज यांच्या दिंड्यांसह असंख्य दिंड्या महाराष्ट्रातील तसेच इतर राज्यातील कानाकोपर्यारतुन पंढरीकडे श्रीविठ्ठल दर्शनासाठी येतात. याचनिमित्ताने चिन्मय मांडलेकर या वारकऱ्यांना भेटायला जाणार असून या वारीमध्ये चिन्मय अभंग देखील म्हणार आहे ज्यामुळे वारीचे वातावरण अधिकच भक्तीमय होणार आहे. तसेच वारीमध्ये येणाऱ्या दिंडीमधून सर्वात उत्तम दिंडीला कलर्स मराठी तर्फे चिन्मय मांडलेकरच्या हस्ते भेटवस्तू देण्यात येणार आहे.
तेंव्हा तुम्ही सुध्दा पंढरपुरच्या वारीचा हा अनोखा भक्तिमय सोहळा चुकवु नका चिन्मय मांडलेकर सोबत कलर्स मराठी आयोजित ‘रंग सावळ्या विठुरायाचा गंध मराठी संस्कृतीचा‘ ४ जुलै रोजी संध्या. ६.०० वा. जुना सोलापूर नाका इथे.
‘ती सध्या काय करते’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर
पहिल्या प्रेमाची बातच काही तरी वेगळी असते कारण त्याची आठवण आपण कायम मनात जपतो. पहिलं प्रेम अनेकदा पूर्णत्वास जातंच असं नाही आणि हे अधुरं राहणं यातच त्याची खरी गंमत असते. अशाच एका प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘ती सध्या काय करते ‘ हा चित्रपट झी मराठीच्या प्रेक्षकांच्या भेटीस येतोय वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमीयरच्या माध्यमातून. येत्यारविवारी २५ जूनला सायंकाळी ७ वा. झी मराठीवरुन‘ती सध्या काय करते‘ प्रसारित होणार आहे.
‘ती सध्या काय करते ‘ ची कथा आहे तन्वी आणि अनुरागची. लहानपणी एकाच कॉलनीत वाढलेले, एकाच वर्गात शिकणारे आणि एकाच कॉलेजमध्ये जाणारे आणि एकमेकांशी घट्ट मैत्री असलेले हे दोघे. दोघांच्याही मनात एकमेकांविषयी मैत्रीपलिकडची भावना आहे जी दोघांनाही उमगलेली नाहीये आणि जेव्हा ती उलगडते तेव्हा नेमका दुरावा येतो. एकमेकांपासून दूर गेले तरी अनुरागच्या मनात एक प्रश्न कायमच येत राहतो ..‘ती सध्या काय करते ‘ आणि याच प्रश्नाभोवती या चित्रपटाची कथा फिरते.
झी स्टुडिओजच्या माध्यमातून यावर्षी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सतिश राजवाडे यांनी केलं होतं तर अंकुश चौधरी आणि तेजश्री प्रधान या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. याशिवाय लक्ष्मीकांत बेर्डे यांचा मुलगा अभिनयचंही या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले होते. त्याच्या सोबतीला असलेल्या आर्या आंबेकरच्या अभिनयाचं कौतुकही झालं होतं.