गुढी पाडव्याच्या निमित्तावर सुरु होणार ‘गणपती बाप्पा मोरया’ या मालिकेचे दुसरे पर्व
कलर्स मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया‘ ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आता हि मालिका एक वेगळं वळण घेते आहे. ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे. कारण गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेचे दुसरं पर्व सुरु होणार आहे. मालिकेमध्ये गणपती बाप्पा मोठा झाला असून, त्याच्याबरोबर रिद्धी – सिद्धीचे आगमन देखील या मालिकेत होणार आहे. मोठ्या गणेशाची भूमिका आदिश वैद्य साकारणार आहे.
गणपती बाप्पा म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. कोणाला त्याच्या देवत्वाची प्रचिती येते तर कोणाला दिव्यत्वाची, दुष्टांच्या अहंकारचं निर्दालन देखील करतो. गणेशाची अशी कित्येक रूपं आपल्याला ह्या मालिकेत वेगवेगळ्या कथानकांच्या माध्यमातून पहायला मिळाली. आता लवकरच मोठ्या गणेशाचं कैलासावर आगमन होणार आहे. आगमनानंतर प्रेक्षकांना गणेशाच्या आयुष्यातील आणखी एक वेगळी बाजू बघायला मिळणार आहे, आणि ती म्हणजे गणेशाचं प्रापंचिक जीवन.
गणपतीच्या आयुष्यात रिद्धी आणि सिद्धीचं आगमन कसं होतं त्या दोघींचे स्वभाव कसे आहेत ? त्याचे गणपतीच्या आयुष्यावर कसे पडसाद उमटतील ? अन्नपूर्णा, आदिमाता म्हणजे पार्वती.. आता सासूबाईच्या नव्या भूमिकेत कशी वावरेल ? हे सगळे बघणे रंजक ठरणार आहे.
तेंव्हा बघायला विसरू नका ‘गणपती बाप्पा मोरया‘ २८ मार्च सोम ते शनि रात्री ८.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.
‘तुमचं आमचं सेम नसतं’ विनोदी नाटक १५ मार्चला रंगभूमीवर
‘यश क्रिएशन’ आणि ‘परीस प्रॉडक्शन’ निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नव्याकोऱ्या विनोदी नाटकाची निर्मिती सौ. अर्चना निलेश चव्हाण आणि के.प्रतिमा करीत असून दिग्दर्शन नितीन कांबळे करताहेत. प्रेक्षकांचे दिलखुलास मनोरंजन करण्याच्या उद्देशाने निर्मित ‘तुमचं आमचं सेम नसतं’ या नाटकातून हरहुन्नरी विनोदी अभिनेते विजय चव्हाण यांचा मुलगा वरद चव्हाण हा रंगभूमीवर पदार्पण करतोय.
प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आमचं सेम असतं.. अस कितीही म्हटलं तरी बऱ्याचदा ते तसं कधीच नसतं.. हे सांगणारं ‘तुमचं आमचं सेम नसतं’ ह्याचे लेखन सुद्धा नितीन कांबळे यांचेच आहे, संगीत व पार्श्वसंगीताची साथ तृप्ती चव्हाण यांनी दिली असून गायक साईराम अय्यर, तृप्ती चव्हाण, करण यांनी ती गायली आहेत.
वरद चव्हाण बरोबर सिद्धार्थ पगारे, गौरी जोगळेकर, नितीन कुर्लेकर, कविता मगरे, आदित्य भालेराव, अभिजीत दुलगज आदि कलाकारांचा हयात समावेश आहे.
या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग बुधवार १५ मार्चला सायं. ४:३० वा. विष्णुदास भावे नाट्यगृहात रंगणार आहे.
पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्रियंका चोप्राची फिल्म ‘व्हेंटिलेटर’ला मिळाला ‘सर्वोत्कृष्ठ पटकथा’चा पुरस्कार!
प्रियांका चोप्राच्या पर्पल पेबल पिक्चर्स ह्या निर्मिती संस्थेची पहिली मराठी फिल्म ‘व्हेंटिलेटर‘ गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज झाली होती. डॉ.मधु चोप्रा निर्मित ह्या चित्रपटाला यंदाच्या पंधराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (PIFF) सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
‘व्हेंटिलेटर‘ सिनेमाचे दिग्दर्शक राजेश मापुस्कर ह्यांनीच ह्या सिनेमाच्या पटकथेवरही काम केलं होतं. ह्या कौटुंबिक मनोरंजक चित्रपटात मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतल्या अनेक मान्यवरांनी काम केलं आहे. आशुतोष गोवारीकर आणि बमन इराणी ह्यांच्याही सिनेमात मुख्य भुमिका आहेत.
चित्रपटाच्या निर्मात्या मधू चोप्रा म्हणतात, ” ‘व्हेंटिलेटर‘ सिनेमाशी निगडीत प्रत्येकाचा हा सन्मान आहे. ह्या सिनेमाचा विषय माझ्या हृदयाला भिडला. सिनेमाचा विषय प्रियंका, राजेश आणि आम्हां सगंळ्यानाच खुप भावला होता. ह्या चित्रपटाची निवड न्युयॉर्क चित्रपट महोत्सवासाठीही झालीय.”
राजेश मापुस्कर ह्या पुरस्काराविषयी प्रतिक्रिय़ा देताना म्हणाले, “पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मिळालेल्या सर्वोत्कृष्ठ पटकथेचा हा पुरस्कार माझा पहिला पुरस्कार आहे. मला अतिशय अभिमान वाटतो, की आमच्या पटकथेला हा पुरस्कार मिळाला. माझ्या लेखनाचं कौतुक झाल्याचा हा अभिमान आहे. ‘व्हेंटिलेटर ‘चित्रपटाची टिम आणि पर्पल पेबल पिक्चर्सचा हा सन्मान आहे.”
‘हृदयांतर’ साठी शामक दावरने केले नृत्यदिग्दर्शन
विक्रम फडणीस प्रॉडक्शन, यंग बेरी एन्टरटेन्मेट ह्यांच्या ‘हृदयांतर‘ ह्या चित्रपटात मुक्ता बर्वे आणि सुबोध भावे ह्यांच्या मुख्य भुमिका आहेत. ‘हृदयांतर‘ हा एक भावनिक चित्रपट आहे. गेली तीन दशकं सिनेसृष्टीत कोरिओग्राफर-गायक म्हणून नावारूपाला आल्यावर शामक दावर आता मराठी चित्रपटासाठी पहिल्यांदाच नृत्यदिग्दर्शन करताना दिसणार आहेत.
‘हृदयांतर‘ ह्या चित्रपटात शामक दावर एक कॉन्सर्ट गाणं कोरिओग्राफ करतोय. शामक दावर आणि विक्रम फडणीस ह्यांचा अनेक वर्षांचा ऋणानुबंध असल्याकारणाने विक्रमच्या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन करणे, शामकसाठी चांगला अनुभव आहे. नुकतंच ह्य़ा गाण्याचे चित्रीकरण सुंदररित्या पूर्ण झाले आहे. चित्रीकरणानंतर सेटवर शामक ने विक्रम ला नटराजाची मूर्ती भेट म्हणून दिली.
सिनेमाचे दुसरे शेड्युल सुद्धा नुकतेच मुंबईत पूर्ण झाले असून, चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे .
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’ची विनोदीनटांना मानवंदना
कलर्स मराठीवरील महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो ज्या कार्यक्रमाने महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या मनावर बरीच वर्षे राज्य केले आणि प्रेक्षकांना हसवले ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ या कार्यक्रमाचे ३२५ एपिसोड येत्या १९ जानेवारीला पूर्ण होणार आहेत. या कार्यक्रमाच्या ३२५ एपिसोडनिमित्त या कलाकारांनी प्रख्यात विनोदीनटांना मानवंदना दिली आहे. भारतामधील आणि भारताबाहेरील प्रख्यात विनोदवीर म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके ज्यांच्या विनोदशैलीचे संपूर्ण जगभरात चाहते आहेत असे चार्ली चाप्लीन, तसेच संपूर्ण भारताला आपल्या विनोदाने वेड लावले असे दादा कोंडके, महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु.ल.देशपांडे, आपल्या अनोख्या विनोदशैलीसाठी आणि आपल्या मालवणी बोलीसाठी सुप्रसिध्द असलेले मच्छीद्र कांबळी तसेच वगनाट्यासाठी प्रसिद्ध असलेले काळू बाळू या भावांची जोडी यांना ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ मधील कलाकार मानवंदना देणार आहेत.
‘कॉमेडीची बुलेट ट्रेन‘ गेल्या वर्षी एका नव्या ढंगात, स्वरूपात आणि नवीन परीक्षकांना घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि त्या बदलालाही प्रेक्षकांनी अगदी मोकळ्या मनाने स्वीकारले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मृण्मयी देशपांडे करत आहे तसेच सोनाली कुलकर्णी आणि महेश कोठारे तुम्हाला परीक्षण करतात. अरुण कदम, समीर चौगुले, पंढरीनाथ कांबळे, अंशुमन विचारे,विशाखा सुभेदार, योगेश शिरसाट, नम्रता आवटे, श्याम राजपूत, पूजा नायक, प्रभाकर मोरे, भक्ती रत्नपारखी, संदीप गायकवाड, प्रसाद, अनुपमा ताकमोघे या कलाकारांच्या विनोदांनी महाराष्ट्राला हसण्याचे आरक्षण दिले आणि आता याच कार्यक्रमाचा ३२५ विशेष भाग बघायला विसरू नका कलर्स मराठीवर १९ आणि २० जानेवारीला रात्री ९.३० वाजता.
कलर्स मराठी वरील ‘सख्या रे’ मालिकेत सुयशचे दोन वेगळे लुक
‘सख्या रे‘ हि कलर्स मराठी वरील एक रहस्यमय मालिका आहे. प्रेम आणि विश्वासाभोवती निर्माण होणारं संशयाचं वलय आणि त्यातून रंगत जाणा-या नात्यांच्या संघर्षाचा प्रवास म्हणजे ‘सख्या रे‘ हि मालिका. या मालिकेमध्ये प्रेक्षकांचा लाडका आणि ज्याला प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळाले सुयश टिळक मुख्य भूमिकेत प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.
‘सख्या रे‘ या मालिकेतील प्रोमोमध्ये सुयश दोन वेगवेगळ्या पोशाखा मध्ये दिसत आहे. एका पोशाखमध्ये म्हणजेच मालिकेमधील समीरचा ड्रेस कोड अगदीच आजच्या तरुण पिढीशी साधर्म्य साधणारा आहे. त्याने टीशर्ट, जीन्स,शर्ट आणि शूज असे घातले आहे. सुयशचा हा लुक सध्या ट्रेंड मध्ये देखील आहे. गंमत त्याच्या दुसऱ्या पोशाखात आहे. म्हणजेच मालिकेतील रणविजय हा राजघराण्यातील आहे असे समजते त्यामुळे त्याने शेरवानी, मोजडी, चष्मा असा पोशाख घातला आहे. सुयशच्या या दोन वेगळ्या लुक्समुळे प्रेक्षकांना संभ्रमात टाकले आहे हे नक्की.
या लुकवर बोलताना सुयश टिळक म्हणाला, “ह्या मालिकेत पहील्यांदाच मला दोन पात्र करायची संधी मिळाली आहे आणि दोन्ही भूमिका करताना फारंच मज्जा आणि शिकायला मिळतंय. समीर हा बॉय नेक्स्ट डोअर तरूणाई पैकी कोणालाही रिलेट होईल असा पाहीजे. इंजिनिअर असला तरी कॅस्यूअल कपडे जिन्स घालणारा. पण त्या उलट रणविजय आहे. व्यवस्थित टापटीप कपडे, शिस्त असलेला व राजघराण्याचा असल्याने त्याच्या दिसण्यात सुद्घा एक आदब आहे“.
सुयश टिळकला एका वेगळ्या लुक मध्ये बघायला नक्कीच प्रेक्षकांना आवडेल.
‘शौर्य – गाथा अभिमानाची’ कथा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेची
पोलिसांची शौर्य गाथा हि कायम त्यांच्या धाडसाची प्रचिती देणारीच असते. कधी शक्ती श्रेष्ठ असते तर कधी शक्ती पेक्षा युक्ती. या आठवड्यात येणारे दोन्हीही भाग, हे महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि युक्तीचे प्रदर्शन करेल. येत्या आठवड्यात येणारी पहिली कथा आहे उपविभागिय पोलीस अधिकारी सुरेश खोपडे यांची, त्यांनी निर्भयतेने राम आणि शाम या रायगड पट्ट्यातील अट्टल खुनी आणि दरोडेखोरांना कसे कंठस्नान घातले याची. रायगड पट्ट्यात जवळ जवळ ६००० पोलीस ,२२ वर्षे त्यांचा शोध घेत होते आणि दुसरी गोष्ट आहे पोलीस अधिकारी भोसले यांच्या जिद्दीची कर्तव्यदक्षतेची, त्यांनी कश्या प्रकारे त्यांना मिळालेल्या एका छोट्याशा माहितीवरून, मुंबईतील प्रसिद्ध व्यवसायिक दवे यांच्या मुलाच्या अपहरणकर्त्यांना हुशारीने पकडले याची. ह्या दोन्ही कथा आपल्याला झी युवावर शुक्रवारी आणि शनिवारी रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येतील.
या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे शिवाजी पदमजा, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.
ओंकार इंगवले ‘ढोलकी झाली बोलकी’चा विजेता
दूरदर्शन सह्याद्री चॅनेल प्रस्तुत “ढोलकी झाली बोलकी” या कार्यक्रमाचा अंतिम सोहळा 8 डिसेंबर रोजी पार पडला. ह्यात ओंकार चंद्रकांत इंगवले हा अंतिम विजेता ठरला असून ढोलकी सम्राट या पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. या स्पर्धेमध्ये एकूण 48 जण सहभागी झाले होते. अंतिम फेरीसाठी 4 जणांची निवड करण्यात आली होती . अंतिम फेरी पार करत पुण्याचा ओंकार चंद्रकांत इंगवले यांनी ‘ढोलकी सम्राट ‘हा पुरस्कार मिळविला.
तालसम्राट पं मुंकूंद पाटील यांचे शिष्य ओंकार इंगवले यांनी अरे वा शाब्बास (मी मराठी) ,मराठी पाऊल पडते पुढे अशा विविध कार्यक्रमामध्ये आपली कला सादर करून विजितेपद मिळविले आहे. कुटूंबातून चालत आलेला हा वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडून (चंद्रकांत इंगवले) याच्यांकडून मिळालेला आहे .
झी युवा वाहिनीवर ‘शौर्य’ – गाथा अभिमानाची
शौर्य म्हणजे असाधारण वीरता, शौर्य म्हणजे जाज्वल्य अभिमान, शौर्य म्हणजे अफाट शूरता, आणि म्हणूनच शौर्य म्हणजे महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलिसांची महिती खूप मोठी आहे आणि ती एवढ्या मोजक्या शब्दात वर्णन करता येणार नाही.
झी युवा ‘शौर्य – गाथा अभिमानाची‘ या मालिकेद्वारे, सर्वच प्रेक्षकांच्या मनातला, निधड्या छातीचा पोलीस, पुन्हा एकदा अत्यंत गर्वाने उभा करीत आहे. महाराष्ट्र पोलिसांचे अकल्पनीय शौर्य, पोलिसांच्याच दृष्टीने आणि त्यांच्याच मदतीने सांगितले जाणार आहे.
विसरायचं जरी म्हंटल तरीही आपल्या मनावर आघात करणाऱ्या अनेक महत्वपूर्ण गुन्ह्यांच्या केसेस आहेत – केस २६ नोव्हेंबर आणि मन्या सुर्वे एन्काऊंटर, यावेळी पोलीस अधिकारी इसाक बागवान यांचे दाखवलेले शौर्य, पहिल्या महिला डिटेक्शन अधिकारी हिरेमठ मॅडम यांची गुन्हेगारी विरोधातील कारकीर्द हे शौर्य खरंच उल्लेखनीय आहे. या आणि अशा अनेक शौर्य गाथा झी युवावर प्रेक्षकांना, पोलिसांच्या नजरेतून पुन्हा जगायला मिळतील.
‘शौर्य – गाथा अभिमानाची‘ या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे. ‘शौर्य – गाथा अभिमानाची‘ ही मालिका शुक्रवार आणि शनिवार रात्री ९:०० वाजता ‘झी युवा‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे.
अजय देवगण म्हणतोय ‘चला हवा येऊ द्या’
बॉलिवुडचा अॅक्शन हिरो आणि संवेदनशील अभिनेता अजय देवगण आपल्या ‘शिवाय‘ या चित्रपटाच्या प्रमोशन साठी ‘चला हवा येऊ द्या‘च्या मंचावर आला होता. अजय देवगण या कार्यक्रमात काजोलसह सहभागी झाला होता. त्यांच्यासोबतीने संगीतकार मिथुनसुद्धा उपस्थित होते.‘चला हवा येऊ द्या’च्या मंचाद्वारे आजवर अनेक मराठी नाटक चित्रपटांना प्रसिद्धीचं हक्काचं व्यासपीठ मिळालं आहे. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहून बॉलीवूड मधील अनेक सुपरस्टार्सनी ह्या कार्यक्रमात हजेरी लावली आहे.
‘चला हवा येऊ द्या’ च्या या भागात थुकरटवाडीच्या मंडळीनी या दोघांसोबत भरपूर धम्माल करत विविध हास्यरंग उधळले. अजय देवगण यांच्या तुफान लोकप्रिय झालेल्या ‘सिंघम‘ चित्रपटाला आपल्या स्टाईलमध्ये सादर करत या मंडळीनी एकच धम्माल उडवून दिली. यावेळी कलाकारांचा अतरंगीपणा बघून अजय आणि काजोल दोघांचीही हसून हसून पुरेवाट लागली. या भागाचं वैशिष्ट्य म्हणजे यात काजोलने मराठी भाषेत संवाद साधला. अजयनेही मराठी बोलण्याचा प्रयत्न केला ज्याला उपस्थित प्रेक्षकांनी दाद दिली.
येत्या २४ आणि २५ ऑक्टोबरला रात्री ९.३० वा. झी मराठीवरुन प्रसारित होणार आहे.