Category Archives: मराठी

Don Special, Marathi Natak

‘दोन स्पेशल’ – बाजारू पत्रकारितेवर घणाणती टीका

Don Special, Marathi Natak
हल्लीच प्रदर्शित झालेल्या ‘नागरिक’ या चित्रपटात आजची पत्रकारिता कुठल्या थरापर्यंत जाउ शकते आणि त्यामध्ये एका कर्तव्यनिष्ठ पत्रकाराची काय अवस्था होते, हे पाहिले. पण खूप वर्षांपूर्वी लेखक ह.मो. मराठे यांनी त्यांच्या ‘न्यूज स्टोरी’ या कथेत त्याचे प्रात्यक्षिक दाखविले होते.

संतोष काणेकर आणि जितेंद्र जोशी निर्मित आणि क्षितीज पटवर्धन लिखित व दिग्दर्शित नवीन मराठी नाटक ‘दोन स्पेशल’ याच कथेवर आधारित आहे. पंचवीस वर्षापूर्वीची पुणे शहरातील पत्रकारिता, नाट्यरूपात त्यांनी प्रेक्षकांसमोर प्रभावीपणे उभी केली आहे. एका वर्तमानपत्राच्या कर्तव्यनिष्ठ उपसंपादकाच्या आयुष्यात एका रात्रीत घडणाऱ्या दोन घटनांवर हे नाटक आधारित आहे. त्यातून, लेखकाने रात्रपाळीला असणाऱ्या मिलिंद भागवत( जितेंद्र जोशी) या उप संपादकावर, एका विशेष अपघाताच्या बातमीत एका बड्या बांधकाम कंपनीचे व कंपनीच्या मालकाचे नाव छापून न येण्याकरिता, वर्तमानपत्राच्या विश्वस्तांकडून आणि राजकारण्यांकडून येत असलेला दबाव दाखवून दिला आहे. मात्र, नायक खंबीरपणे आपल्या तत्वांना जपून, या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तिघांना न्याय मिळवून देण्यासाठी, कोसळलेल्या इमारतीच्या खराब बांधकामाबाबत पुरावे गोळा करण्यासाठी प्रयत्न करतो.

एवढेच नव्हे तर, मिलिंदची पूर्वीची प्रेयसी स्वाती( गिरीजा ओक ), जी आठ वर्षांपूर्वी त्याच ऑफिसात काम करत होती, तिचे त्याच रात्री तिथे अचानक येणे आणि तिचा त्या व्यावसायिकाशी सध्या असलेला संबंध, हे सर्व चांगल्या रीतीने जुळवून आणले आहे. त्याच रात्री, मिलिंदकडे आदर्श पत्रकार म्हणून पाहणारा आणि पत्रकारितेचा अभ्यास पूर्ण करून, त्याच्या वर्तमानपत्रात नोकरी साठी आलेला तरुण (रोहित हळदीकर ) याचा वापर मिलिंद कसा करून घेतो, हा प्रसंगही चांगला खुलविला आहे. एकंदरीत, रात्री ९ ते १२.१५ या वेळामध्ये एका वर्तमानपत्राच्या कचेरीत काय घडले, याचे हुबेहूब चित्र या नाटकात उभे केले आहे. नाटक जरी सव्वा तीन तासांपेक्षा कमी वेळेचे असले तरी, काहीप्रसंग घड्याळाच्या काट्यासोबतच पुढे सरकतात आणि त्या भयाण रात्रीची जाणीव करून देतात.

नाटकाचा पूर्वार्ध थोडा रखडला आहे, पण उत्तरार्धात मात्र नाटकाने चांगलाच जोर पकडला आहे. आपले वडील हॉस्पिटलमध्ये असून सुद्धा, रात्री ड्युटीवर येऊन, आपले कर्तव्य पार पाडणारा हाडाचा पत्रकार जितेंद्र जोशी याने उत्तमरीत्या साकारला आहे. त्याला उत्तम साथ लाभली आहे ती गिरीजा ओक गोडबोले हिची. द्विधा मनस्थितीत सापडलेल्या, एका स्त्रीची व्यक्तिरेखा तिने उत्कृष्टरीत्या साकारली आहे. लेखक दिग्दर्शक क्षितीज पटवर्धन यांनी नेपथ्यकार प्रदीप मुळे याच्या सहाय्याने २५ वर्षांपूर्वीचे वर्तमानपत्राचे ऑफिस हुबेहूब उभे केले आहे. त्यात टेलीप्रिंटर चा वापर, त्याचा होणारा आवाज, जुन्या प्रकारच्या टेलिफोनचा वापर आणि अनमोल भावे याच्या सहाय्याने केलेले ध्वनी संयोजन विशेष आहे. नाटकाचा क्लायम्याक्स ही उत्तमरीत्या सादर केला आहे.

नाटकामधील एक प्रसंग मात्र खटकतो. तो म्हणजे, रात्रपाळीला आलेल्या कर्तव्यानिष्ठ मिलिंदचे, वर्तमानपत्राची पहिली कोपी निघण्याआधी, ड्युटीवर असताना, आपल्या पूर्व प्रेयसी सोबत बाहेर होटेलमध्ये जावून बेजबाबदारपणे सिगारेट व बियर पिणे व तेथे तिच्यासमोर जगातील सर्व बहिणींना उद्धेशून शिवी हासडणे. त्यापेक्षा, दोघांनी मधल्या ब्रेक मध्ये होटेल मध्ये जावून दोन स्पेशल चहा मागवणे, जास्त योग्य वाटले असते. वास्तविक, बियर आणि सिगरेट पिऊन असा अपशब्द उच्चारणे, पंचवीस वर्षांपूर्वीच्या पुण्यातील एका सुसंकृत पत्रकाराच्या तोंडी शोभत नाही. याचा प्रत्यय प्रबोधनकार ठाकरे सभागृहात प्रयोगाच्या वेळी पाठच्या रांगेत झालेल्या चूक.. चूक.. आणि कुजबूजीवरून आला . तसेही आजकालचे मराठी नाटककार( उदा. ‘मि आणि मिसेस’) , प्रेक्षकांना गृहीत धरून चालले आहेत, असे वाटते. हाच अपशब्द मराठी किंवा हिंदी चित्रपटात सेन्सोर च्या कात्रीत सापडतो, मग नाटकांच्या संवादांना सेन्सोर नाही का? खर म्हणजे, असा शब्द एवढ्या चांगल्या विषयाच्या नाटकात वापरण्याची गरजच नव्हती. पुढील प्रयोगात हा शब्दप्रयोग आवर्जून टाळावा. त्यामुळे नाटकाचा दर्जाही उंचावेल.

नाटकातील याच प्रसंगानंतर घडणाऱ्या सीन मध्ये दिग्दर्शकाने जरूर लक्ष्य घालावे. मिलिंद आणि स्वाती हॉटेलात जातात तेंव्हा स्वाती च्या हातात पर्स असते. पण बाहेर आल्यावर जेंव्हा मिलिंद स्वातीला रिक्षा मिळेपर्यंत त्याच्या कचेरीखाली रिक्षा मिळेपर्यंत थांबतो, तेंव्हा ती त्याचे ज्याकेट परत करते आणि रिक्षात बसून घरी जाते. मात्र त्यावेळेस तिच्याकडे पर्स नसते. उलट ती परत येते, तेंव्हा घराची चावी विसरल्याचे सांगते.

असो, हे दोन प्रसंग सोडले तर, नाटकाचे धारदार संवाद विषयाला धरून आहेत आणि सादरीकरणही अति उत्तम झाले आहे. सर्व नाट्यरसिकांनी आणि खास करून सर्व पत्रकारांनी आवर्जून पाहावे असे हे नाटक.

‘कॅरी ऑन मराठा’मध्ये अरुण नलावडे यांची ग्रे शेड भूमिका

Carry on Maratha, Arun Nalawade
अरुण नलावडे हे  नाव घेतलं  की डोळ्यासमोर उभं राहत ते साध सुध व्यक्तिमत्व. त्यांनी भूमिकाही आपल्या व्यक्तिमत्वाला साजेशा अशाच केल्या. ‘श्वास’ चित्रपटात त्यांनी नातवासाठी तळमळणाऱ्या आजोबांची भूमिका केली तर त्यांच्या गंमत जंमत नाटकाने धमाल उडवली होती. आपल्या अभिनयाने त्यांनी अगदी साध्या भूमिकाही जिवंत केल्या.  कॅरी ऑन मराठामध्ये अरुण नलावडे यांनी ग्रे शेड असलेली भूमिका साकारली आहे. पहिल्यांदा अशा वेगळ्या भूमिकेत  आणि लूकमध्ये  पाहायला मिळणार आहेत. सिनेमातला त्यांचा लूक त्यांच्या भूमिकेला साजेसा असा आहे. त्यांचे चाहते त्यांच्या या भूमिकेवरही प्रेम करतील यात शंकाच नाही.

तरुणांची बाजु मांडणारा ‘युथ’

Neha Mahajan, Meera Joshi, Youth, Movie, Pictureव्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुतसुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साहउत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो. 

एन चंद्रा, गिरीष घाणेकर या सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव, नामांकित कंपन्याच्या जाहिरातींचं दिग्दर्शन, संकलन अशी मुशाफिरी करणाऱ्या राकेश कुडाळकर यांचासिनेमा दिग्दर्शनाचा हा पहिला प्रयत्न आहे.

या सिनेमाचे संवाद विशाल चव्हाण व युग यांनी लिहिले आहेत. सिनेमातील गीतांनाही तरुणाईचा स्वर लाभला असून आजचे आघाडीचे गायक जावेद अली व गायिका शाल्मली खोलगडे यांनी यातील गीते गायली आहेत. विशाल-जगदीश यांनी सिनेमाला साजेसं संगीत दिलं आहे. कोरिओग्राफी फुलवा खामकर यांची आहे. चेतन शिंदे यांनी छायाचित्रणाची जबाबदारी सांभाळली आहे.

विक्रम गोखले, नेहा महाजन, अक्षय वाघमारे,मीरा जोशी, अक्षय म्हात्रे, केतकी कुलकर्णी, शशांक जाधव या कलाकारांच्या  मुख्य भूमिका आहेत. लवकरच ‘युथ’ च्या चित्रीकरणाला कोल्हापूरात सुरूवात होणार आहे.

‘सिलसिला अमिताभ का’ ने केला विक्रम

Chil Actor, Parth Bhalerao, Amitabh
‘बिग बी’ म्हणजेच सर्वांचे आवडते महानायक अमिताभ बच्चन ह्यांच्या चाहत्यांसाठी खास पर्वणी असलेला ‘सिलसिला अमिताभ का’ हा कार्यक्रम नुकताच पुण्यात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन बाल कलाकार पार्थ भालेराव ह्याच्या हस्ते झाले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे, सकाळी ६ ते रात्री १२ अशा १८ तासात १५१ गाण्यांचे सादरीकरण ह्या कार्यक्रमात करण्यात आले. ‘ऑटीझम’ या दुर्मिळ आजाराच्या जागरुकतेसाठी हा विशेष सामाजिक उपक्रमाचे आयोजन संदीप पाटील ह्यांनी केले होते. कार्यक्रमाचे सादरीकरण सुरु असताना लाईव्ह पेंटिंग काढण्यात आली होती ;  त्यास १५,५१५ रुपये किमत मिळाली . ती संपूर्ण रक्कम ऑटिझमच्या मुलांसाठी काम करणाऱ्या ‘प्रसन्न ऑटिझम’ शाळेला देण्यात आली.

सदर कार्यक्रमा दरम्यान आमदार गिरीश बापट यांनी सदिच्छा भेट दिली. ह्याच बरोबर अनेक मान्यवर आणि सेलीब्रीटीजने देखील आपली हजेरी लावली ; त्यात अभिनेत्री दिपाली सय्यद ह्यांच्या आपल्या नृत्याचे विशेष सादरीकरण केले. सुमारे ४० पेक्षा अधिक गायक, वादक आणि कलाकार सहभागी असलेल्या, १५ तासात १५१ गाण्यांचे सादरीकरणाच्या ह्या कार्यक्रमाची नोंद ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये करण्यात येणार आहे.

‘प्रेम रंगी रंगुनी’ लवकरच रंगभुमीवर

Prem Rangi Ranguni, Dipti Bhagwat

‘प्रेम’ हा विषय प्रत्येकाच्या जवळचा आणि आवडता असतो; ज्या प्रमाणे मोठ्या पडद्यावर ‘प्रेम’ ह्या विषयाला घेऊन त्याचे वेगवेगळे पैलू असलेले अनेक सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळताय; तसच काहीस चित्र रंगभूमीवर दिसताये; येत्या काळात विविध रूपांतील प्रेमाचे पैलु मराठी नाट्य प्रेमींना पाहायला मिळणार आहे . आनंद म्हसवेकर लिखित – दिग्दर्शित ‘प्रेम रंगी रंगुनी’ हे नवीन मराठी नाटक रंगभूमीवर येणार आहे. संगीत आणि नाट्याचा सुरेल संगम असलेले हे नाटक येत्या २ मे पासून प्रेक्षेकांच्या भेटीस येणार आहे.

श्रीमती संध्या रोठे ह्याची निर्मिती असलेले ह्या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर ह्यांनी केले असून; सुभाष मालेगावकर ह्यांनी संगीत संयोजन केले आहे. अभिनेता अमोल बावडेकर आणि अभिनेत्री दीप्ती भागवत ह्यांच्या ह्यात मुख्य भूमिका आहेत.

‘मराठी बॉक्स क्रिकेट लीग’ मध्ये ‘रत्नागिरी टायगर्स’ ने मारली बाजी

Ratnagiri Tigers, mbcl, Celebrity

गेले तीन दिवस पाचगणीत सुरू असलेल्या या मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना रविवारी पार पडला.  ह्या सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजी मारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला. ‘रत्नागिरी टायगर्स‘ संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ धावा काढल्या. त्याचा पाठलाग करताना ‘शिलेदार ठाणे’ संघाचा डाव ३५धावांत आटोपला.

पारितोषिक समारंभाला श्री. नितेश राणे व अभिनेता सचिन पिळगावकर यांची उपस्थिती लाभली. त्याआधी झालेल्या अंतिम सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजी मारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला. सिध्दार्थ जाधव यांना ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आले. ‘मॅन ऑफ द सीरिज’ पुरस्कार नुपूर दुधवडकर यांना देण्यात आला. या लीगमध्ये सहभागी झालेल्या महिला खेळाडूंचा देखील सत्कार ही यावेळी करण्यात आला.

लवकरच या रंगतदार सामन्यांचे प्रक्षेपण वाहिनीवर पहायला मिळणार आहे. ‘मराठी ‘बॉक्स क्रिकेट लीग’ चे आगामी तिसरं पर्व कोल्हापूर मध्ये रंगणार असल्याची घोषणा ही याप्रसंगी करण्यात आली.

मराठी चित्रपट ‘नागरिक’ १२ जून पासून सर्वत्र प्रदर्शित

Nagrik, Film, Sachin Khedekar, Dilip Prabhavalkar, Dr. Shriram Lagu

आजच्या समाजाची मानसिकता, सर्वसामान्य नागरिक, राजकारण आणि क्षुल्लक क्षुल्लक घटनांमधील द्वंद्व, त्यातून दिसणारा, ‘घडणारा आणि बिघडणारा’ समाज;  याचे वास्तव चित्रण ‘साची एण्टरटेन्मेंट’ निर्मित आणि जयप्रद देसाई दिग्दर्शित ‘नागरिक’ ह्या चित्रपटात प्रेक्षेकांना पाहायला मिळणार आहे.  ह्या चित्रपटात आपल्याला अनेक मोठ्या कलाकारांची फौज एकत्र  पाहायला मिळणार आहे. त्यात श्रीराम लागू,  दिलीप प्रभावळकर,  नीना कुलकर्णी, मिलिंद सोमण, सचिन खेडेकर, देविका दफ्तरदार हे मुख्य भूमिकेत असून सोबतीला सुलभा देशपांडे, माधव अभ्यंकर, राजेश शर्मा, राजकुमार तांगडे हि कलाकार मंडळी आहेत.

राज्य चित्रपट पुरस्कारात ‘नागरिक’ ह्या चित्रपटास ‘सर्वोत्कृष्ट सामाजिक चित्रपटा’सह इतर पाच पुरस्कार मिळाले आहेत . चित्रपटाचे संवाद पत्रकार- कवी महेश केळूस्करांचे असून पटकथा विस्तार केळूस्करांसोबत दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी केला आहे.  येत्या १२ जूनला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

 

‘युद्ध’ मध्ये दिसणार समाजात घडणाऱ्या कलंकित घटनांचं प्रतिबिंब

Tejaswini Pandit, Rajesh Shringarpure

 

‘माय फ्रेंड गणेशा’ ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रुईया ह्यांचे ‘युद्ध’ ह्या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण होत आहे.  चित्रपटाच्या शीर्षकावरूनच आपल्याला कळालेच असेल कि,  हा एक अॅक्शन चित्रपट आहे म्हणून.  समाजातील प्रतिष्ठीत लोकांचे बुरखे फाडून त्यांना समाजासमोर आणण्याची धाडस करणारी ही कथा आहे. पत्रकार रागिणी, या तरुणीची अन्यायामुळे झालेली होरपळ व तिला भोगाव्या लागलेल्या यातनाया व तिने दिलेला त्या अन्यायाविरुद्धचा  लढा हा चित्रपटात दाखवण्यात आला आहे.

शेखर गिजरे निर्मित राजीव रुईया दिग्दर्शित ‘युद्धएक अस्तित्वाची लढाई’ या चित्रपटातून स्त्रीच्या आत्मसन्मानाची गोष्ट मांडण्यात आली आहे. चित्रपटाची कथा शेखर गिजरे यांची आहे. अभिजीत गाडगीळ यांनी या सिनेमाचे लेखन केलं आहे, तर छायांकन सुरेश बिसावेनी व कला दिग्दर्शन सुरेश पिल्लई याचं आहे.

राजेश शृंगारपुरे, तेजस्विनी पंडित, क्रांती रेडकर ह्यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका असून सोबतीला पंकज विष्णू, वर्षा उसगांवकर, स्मिता ओक, संजय कुलकर्णी, सोमनाथ तडवलकर, शीतल मंत्री हि कलाकार मंडळी आहेत. श्रद्धा एंटरटेण्मेंटची निर्मिती, राजीव रुईया दिग्दर्शित हा सिनेमा १५ मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होतोय.

‘लोच्या ऑनलाईन’ चित्रपटाचा मुहूर्त संपन्न

Urmila Dhangar

आपल्या कथेमधून वेगवेगळे नाविन्य दाखवत मराठी सिनेमाने नेहमीच आपले स्थान उंचावत ठेवलेय, चित्रपटांचे शीर्षक (टाईटल) सुद्धा नेहमीच हटके असल्याचे पाहायला मिळते. शुबीर मुखर्जी प्रस्तुत क्षितीज मोशन पिक्चर्स निर्मित ‘लोच्या ऑनलाईन’ ह्या असाच एक हटके शीर्षक असलेल्या सिनेमाचा मुहूर्त नुकताच अंधेरीच्या एल.एम स्टुडियोत एका भन्नाट गाण्याच्या ध्वनिमुद्रनाने झाला. रुपेश सोनार निर्मित ‘लोच्या ऑनलाईन’ ची कथा-पटकथा-दिग्दर्शन रमेश चव्हाण यांचे असून सवांद शरद जोशी यांचे आहेत तर छायाचित्रणा अरविंद पुवार ह्यांचे असणार आहे.

तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले तरी त्याच्या अतिरेकामुळे हानी सुद्धा होऊ शकते. तरुण पिढी या सतत ऑनलाईनच्या जंजाळात अनेक मोहांना बळी पडते, या आभासी दुनियेत स्वत:ला हरवून बसते.  नव्या पिढीच्यारोजच्या जगण्यात माहिती तंत्रज्ञानाच्या चुकीच्या वापरामुळे निर्माण होणार्या समस्यांची जाणींव एका उत्कंठावर्धक कथेच्या माध्यमातून या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

नुकत्याच ध्वनिमुद्रित झालेल्या गाण्या चे गीतकार मंगेश कांगणे हे असून ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी ते संगीतबद्ध केले आहे. ‘सा रे ग म प’ फेम महागायिका उर्मिला धनगरचा वेगळ्या धाटणीचा ठसकेदार आवाजात ते प्रेक्षेकांना ऐकायला मिळणार आहे.

स्टार प्रवाहवर ‘तू जीवाला गुंतवावे’

Ajinkya Nanaware, Shivani Surve
मराठी चित्रपटांप्रमाणेच मराठी मालिकांचा स्वतः चा एक वेगळा असा प्रेक्षक वर्ग आहे. आपल्या मालिकांकडे जास्तीत जास्त प्रेक्षक वळवावा, आपल्या मालिकेस जास्तीत जास्त लोकप्रियता मिळावी ह्या साठी वाहिन्यांमध्ये नेहमीच स्पर्धा चालू असते. त्यासाठी नव-नवीन प्रयोगही केले जातात. गेल्या काही महिन्यात आपणास अनेक वाहिन्यांवर नवीन मालिका पाहायला मिळाल्यात.  अर्थात त्यातील सर्वच मालिकांना प्रेक्षकांची पसंती मिळतेय असे नाही.

सध्या प्रेक्षेकांमध्ये विशेष चर्चा आहे ती स्टार प्रवाह वरील, सचिन दरेकर लिखित ‘तू जीवाला गुंतवावे’ ह्या मालिकेबद्दल. हि मालिका सध्या चांगलीच लोकप्रियता मिळवतेय. शिवाय सोशल मिडिया वरही ह्या मालिकेची विशेष  चर्चा आहे.  ह्या मालिकेचे दिग्दर्शन दीपक नलावडे हे करत असून त्यांनी ह्या पूर्वी  ‘लक्ष’, ‘दुर्वा’ ह्या मालिकांचे दिग्दर्शन केले आहे.

अनन्या आणि निनाद ह्यांची फ्रेश प्रेमकथा हा ह्या मालिकेचा मुख्य गाभा, मालिकेत अधून मधून जरा ‘फिल्मी’ टच  सुद्धा पाहायला मिळतो. अनन्याच्या प्रमुख भूमिकेत शिवानी सुर्वे तर निनाद ची भूमिका अजिंक्य ननावरे ह्या नवोदित कलाकाराने साकारली आहे.  ह्यांच्या सोबत अपूर्वा नेमलेकर, विक्रम गायकवाड , अक्षया भिंगार्डे  हे कलाकार आहेत. शिवाय अभिनेत्री प्रिया बेर्डे सुद्धा बऱ्याच काळानंतर आपणास एका विशेष भूमिकेत दिसते .

स्टार प्रवाहवर सोमवार ते शनिवार रात्री ९ वाजता प्रसारित होणारी  हि मालिका आगामी काळात आपली लोकप्रियता टिकून ठेवण्यात यशस्वी ठरणार कि नाही?  ते मात्र येत्या काही भागात कळेल.