‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांचा सहभाग
‘सूर नवा ध्यास नवा–छोटे सुरवीर‘ कलर्स मराठी वरील या कार्यक्रमाच्या ऑडीशन्स संपूर्ण महाराष्ट्रात पार पडत आहेत. रत्नागिरी, कोल्हापूर नंतर पुण्यामध्ये या ऑडिशन्स नुकत्याच पार पडल्या. पुणेकरांनी कार्यक्रमाच्या ऑडिशन्सला उदंड प्रतिसाद दिला. मुलांचा उत्साह आणि त्यांची तयारी वाखाणण्याजोगी होती. सगळीच मुलं प्रचंड तयारीने आली होती. कार्यक्रमाच्या ऑडिशन्समध्ये ५०० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. पुणे येथील इ. एस. सेकंडरी स्कूल, ४८६ सदाशिव पेठ, न्यू इंग्लिश स्कूल कॅम्पस, टिळक रोड येथे या ऑडिशन्स पार पडल्या. या कार्यक्रमाचा शुभारंभ ऑगस्ट महिन्यामध्ये होणार आहे.
कार्यक्रमाचे परीक्षक असणार आहेत आपल्या सगळ्यांचा लाडका अवधूत दादा, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे. कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकाच्या भूमिकेत कोण असेल हे सध्या गुलदसत्यात आहे. ‘सूर नवा ध्यास नवा‘ छोटे सूरवीरच्या पुणे केंद्रावर पार पडलेल्या निवड चाचणीतून मुंबईतील मेगा ऑडीशन्ससाठी आठ स्पर्धक निवडण्यात आले. श्रीनिधी देशपांडे, नंदिनी गायकवाड, ईशिता मोडक, अक्षय चारभाई, धिरज शेगर, चैतन्य देवडे, आदी भारतीया आणि अभिषेक कांबळे यांची निवड झाली आहे. पुणे ऑडिशन्सला आलेल्या बऱ्याच स्पर्धकांनी त्यांच्या उत्तम सादरीकरणामुळे मने जिंकली परंतु या आठ स्पर्धकांना मुंबईला येऊन मेगा ऑडिशन्स मध्ये त्यांचे गाणे सादर करण्याची संधी मिळाली. आता ऑडीशन्स नागपूर मध्ये रंगणार आहे.
‘आम्ही दोघी’ मालिकेत विवेक सांगळे ची प्रमुख भूमिका
‘आम्ही दोघी‘ ही नवीन मालिका झी युवा वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली आहे. आम्ही दोघी मालिकेचं कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मालिकेत विवेक सांगळे प्रमुख भूमिका साकारत आहेत. या दोन बहिणींचे जीवन बदलून टाकणाऱ्या आदित्य गायकवाडची भूमिका विवेक साकारणार आहे. ‘लव्ह लग्न लोचा‘ या मालिकेनंतर नवीन व्यक्तिरेखा साकारताना पूर्वी साकारलेल्या ‘राघव‘ इतकंच प्रेक्षकांनी ‘आदित्य‘ ला देखील भरभरून प्रेम द्यावं यासाठी विवेक खूप मेहनत करत आहे.
दोन बहिणी आणि त्यांच्या नात्याभोवती फिरणारे कथानक असलेल्या ‘आम्ही दोघी‘ या मालिकेतील विवेकची भूमिका देखील तितकीच सक्षम असणार आहे. मराठी टेलिव्हिजनवर चॉकलेट बॉय म्हणून प्रसिध्द असलेला विवेक साकारत असलेला आदित्यचं पात्र नखरेबाज आहे आणि तो त्याच्या खऱ्या भावना कधीही व्यक्त करत नाही. पेइंग गेस्ट म्हणून त्यांच्या घरात राहायला आलेला हा आदित्य या दोन्ही बहिणींच्या जीवनात काय बदल करेल हे पाहणे मनोरंजक असेल.
सशक्त भारतीय महिलांच्या व्हिडीयोमध्ये सई, अमृता, मिथिला!
फिल्म इंडस्ट्रीतल्या सूत्रांनूसार, युएन वुमन्स ही आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्था आहे. संस्थेच्या भारतीय शाखेतून भारतीय महिलांना आणि मुलींना प्रेरीत करणा-या व्हिडीयोमध्ये समाजातील वेगवेगळ्या स्तरातल्या नक्की कोणत्या महिलांना स्थान मिळावे, ह्यावर रिसर्च करण्यात आला. आणि त्यात सई ताम्हणकर, अमृता खानविलकर, मिथिला पालकर यांची निवड करण्यात आली. ही नक्कीच एक महत्वाची गोष्ट आहे.
स्त्री-पुरूष समानतेसाठी कार्यरत असलेल्या ‘युएन वुमन इंडिया’ व्दारे मुली आणि महिलांना प्रेरणा देण्यासाठी मुझे हक है हा म्युझिक व्हिडीयो लाँच झाला आहे. ह्या व्हिडीयोमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातल्या सशक्त महिलांना चित्रीत करण्यात आले आहे. ऐश्वर्या राय बच्चन, मिताली राज, सानिया मिर्झा, आशा भोसले, गौरी सावंत, डॉ. सईदा हमिद ह्या सशक्त महिलांसोबतच ह्या व्हिडीयोमध्ये अभिनेत्री सई ताम्हणकरलाही स्थान मिळालंय.
‘मामला चोरीचा’ हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात.
लेखक वसंत सबनीस यांनी लिहीलेले स्वतंत्र सामाजिक विनोदी नाटक पुन्हा एकदा रंगमंचावर नव्या रुपात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. तब्बल ३२ वर्षानंतर “मामला चोरीचा” हे नाटक पुन्हा एकदा नव्या रुपात रंगभूमीवर येत आहे. श्री साई प्रोडक्शन व स्पंदन निर्मीत केलेल्या या नाटकाचे दिग्दर्शन मंगलदास माने यांनी केले आहे. येत्या रविवारी, दिनांक 24 जून रोजी सातारा रोडवरील आण्णाभाऊ साठे नाट्यगृहात हा प्रयोग रंगणार आहे.
“मामला चोरीचा” या नाटकाचा पहिला प्रयोग दिनांक ६ मे १९८५ रोजी बालगंधर्व नाट्यमंदिर, पुणे येथे झाला होता. दामू केंकरे दिग्दर्शित या नाटकामध्ये शरद तळवळकर, आश्विनी देसाई यांनी भुमिका साकारल्या होत्या. तर यावेळी आदर्श गायकवाड, सागर पवार, संजय देवळे, केतकी लांडे, ऐश्वर्या कुलकर्णी, संजय चव्हाण आणि विद्या भागवत हे कलाकार असणार आहेत.
दिग्दर्शक मंगलदास माने म्हणाले, “पिढ्यानपिढ्या बदलल्या तरी कुटुंबातील आई ही आईच असते. आजच्या पिढीमध्ये आईची भूमिका बदलत चालली आहे. आईने आपल्या मुलांना किती सवलत द्यावी की धाकात ठेवावे हा विचार समाज करीत आहे.”
‘काय झालं कळंना’ चा टीझर रिलीज.
प्रेमात पडलेल्या अशाच प्रेमवीरांची मानसिकता नेमकी हेरत श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनद्वारा, निर्माते पंकज गुप्ता ‘काय झालं कळंना‘ हा फ्रेश रोमँटिक चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन आले आहेत. येत्या २० जुलै ला ‘काय झालं कळंना‘ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा टीझर सोशल मिडियावर रिलीज करण्यात आला आहे.
‘काय झालं कळंना‘ आपल्या मातीतली प्रेमकथा असून प्रेमाद्वारे सामाजिक संदेश मांडणाऱ्या या चित्रपटाचं दिग्दर्शन सुचिता शब्बीर यांनी केलं आहे. या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत आहे तर अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर, श्रीकांत कांबळे आदी कलाकारांच्या ही मुख्य भूमिका आपल्याला यात पहायला मिळतील.
‘काय झालं कळंना‘ चित्रपटाची कथा सुचिता शब्बीर यांची असून पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे यांचे आहेत. चित्रपटाची गीते माधुरी अशिरघडे, वलय मुलगुंद यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, उर्मिला धनगर, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे हे गायक यातील गीते स्वरबद्ध करणार आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. ‘काय झालं कळंना’ चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.
लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेच्या सेटवर लक्ष्मी आणि बाब्याची धम्माल !
कलर्स मराठीवरील नुकतीच सुरु झालेली ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ ही मालिका सध्या बरीच चर्चेमध्ये आहे. विशेषकरून प्रेक्षकांन प्रत्येक भागामध्ये दिसणारे गावाचं सौंदर्य आणि मालिकेमधील कलाकार यामुळे. त्या गावामध्ये वाढलेली अवखळ, लाघवी प्रेमळ अशी लक्ष्मी म्हणजे समृद्धी केळकर प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरत आहे. सध्या या मालिकेमध्ये मल्हार म्हणजेच ओमप्रकाश, आर्वी म्हणजेच सुरभी हांडे प्रेक्षकांना मुख्य भूमिकेत दिसत आहेत यांना देखील प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. प्रेक्षकांना या व्यतिरिक्त मालिकेमधील अजून एक पात्र आवडत आहे आणि ते म्हणजे बाब्या. बाब्या म्हणजे मालिकेमधील लक्ष्मीचा जीवाभावाचा मित्र.
‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेमधील बाब्या… बाब्या म्हणजे वेद आंब्रे. वेद ठाण्याला रहातो आणि सेटवर जमलेल्या गट्टीमुळे तो लक्ष्मी बरोबरच सेटवर येण जाणं करतो. अभ्यास देखील सेटवरच पार पडतो. पण सेटवरील सगळेच याला “चपडचपड” असे बोलावतात. कारण वेदची सेटवर प्रचंड बडबड सुरु असते आणि सगळी बडबड झाल्यानंतर त्याचे असे म्हणणे असते कि, “मी काही बोलतच नाही” अशा या मिश्कील आणि लाघवी स्वभावाच्या वेदने ‘लक्ष्मी सदैव मंगलम्‘ मालिकेच्या सेटवर सगळ्यांचेच मनं जिंकले आहे. लक्ष्मी आणि बाब्याचे पडद्यावर आणि पडद्यामागे खूपच छान जमते जे प्रेक्षकांना मालिकेमध्ये देखील दिसून येते. अजून एक गमतीशीर गोष्ट म्हणजेच मालिकेमध्ये त्याचा लुक खूपच साधा आहे त्यामुळे पडद्यामागे तो वेगवेगळे लुक्स स्वत:हूनच ट्राय करत असतो जसे स्पाईक्स करणे, चष्मे घालणे.
‘फर्जंद’ १ जूनला रुपेरी पडद्यावर.
‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी‘ ची प्रस्तुती असलेल्या ‘फर्जंद‘ चित्रपटाचे निर्माते अनिरबान सरकार असून सहनिर्माते संदीप जाधव, महेश जाऊरकर, स्वप्नील पोतदार आहेत. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे.‘फर्जंद‘ या चित्रपटातून शिवाजी महाराजांच्या ६० पराक्रमी वीरांनी केलेल्या अद्वितीय पराक्रमाची गोष्ट उलगडण्यात येणार आहे.
मराठीतील अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात असून शिवाजी महाराजांच्या भूमिकेत अभिनेता चिन्मय मांडलेकर, तर अंकित मोहन या कलाकाराने कोंडाजी फर्जंद साकारला आहे. या व्यतिरिक्त गणेश यादव, प्रसाद ओक, अजय पुरकर, मृणाल कुलकर्णी, मृण्मयी देशपांडे, प्रवीण तरडे, अस्ताद काळे, हरिश दुधाडे, नेहा जोशी, राहुल मेहेंदळे, निखील राऊत, राजन भिसे, अंशुमन विचारे, रोहन मंकणी, सचिन देशपांडे, समीर धर्माधिकारी तसेच ‘तेरे बिन लादेन‘ या चित्रपटात लादेनची भूमिका करणारा प्रद्युमन सिंग या सर्व कलाकारांच्या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.कथेला पूरक चार श्रवणीय गाणी या चित्रपटात आहेत. गीते दिग्पाल लांजेकर व क्षितीज पटवर्धन यानी लिहिली आहेत. संगीत अमितराज तर पार्श्वसंगीत केदार दिवेकर यांचे आहे. आदर्श शिंदे व वैशाली सामंत यांनी यातील गीते स्वरबद्ध केली आहेत.
‘फर्जंद‘ चित्रपटाचे छायांकन केदार गायकवाड यांनी केले असून संकलन प्रमोद कहार यांचे आहे. साहस दृश्ये प्रशांत नाईक यांची आहेत. कलादिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांचे तर ध्वनीलेखन निखील लांजेकर यांनी केले आहे. वेशभूषा पौर्णिमा ओक तर रंगभूषा सचिन देठे यांची आहे. अक्षता तिखे यांचे नृत्यदिग्दर्शन आहे. कार्यकारी निर्माते उत्कर्ष जाधव आहेत.
बिग बॉस मराठी मध्ये हर्षदा खानविलकर यांनी घरातील सदस्यांना दाखवली प्रतिबिंब.
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल सगळ्या रहिवाश्यांना सरप्राईझ मिळाले कारण महाराष्ट्राची लाडकी हर्षदा खानविलकर यांची घरामध्ये एन्ट्री झाली. बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सर्व रहिवाश्यांनी त्यांचे आनंदाने स्वागत केले. तसेच काल आस्ताद काळेला देखील सरप्राईझ मिळाले. आस्ताद याचा काल वाढदिवस होता आणि त्यानिमित्त त्याच्या आईने त्याच्यासाठी केक बनवून पाठवला होता. हर्षदा खानविलकर या घरामध्ये आल्यानंतर बिग बॉस यांनी त्यांना लगेचच एक कार्य दिले ज्याचे नाव होते ‘बिंब – प्रतिबिंब‘ ज्यामध्ये हर्षदा आरश्याचे प्रतिनिधित्व करणार होत्या. तसेच ज्यामध्ये हर्षदा यांना त्यांची रोखठोक मत सदस्यांना सांगायची होती.
हर्षदा यांनी राजेश आणि रेशम यांना कठोर शब्दांमध्ये त्यांचे घरामध्ये जे काही सुरु आहे त्याची जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला. परंतु, या दोघांना देखील त्यामध्ये काही गैर वाटत नाही असे त्यांनी दिलेल्या कार्या दरम्यान बोलून दाखविले. आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे कॅप्टनसीचा टास्क. ज्याप्रमाणे पुढे कुठलाही भेद न बाळगता सर्वांना एक सारखा सुगंध देतात, अगदी त्याचप्रमाणे बिग बॉस मराठीच्या घरातील कॅप्टनने सर्वांना एक समान न्याय देणे. पुष्कर आणि सुशांत हे दोघेही कॅप्टनसीसाठी या आठवड्यामधील उमेदवार असून ते ही बाग आज सजवणार आहेत.
माधुरीच्या वाढदिवसानिमित्त ‘तू परी’ गाण्याची रोमँटिक ट्रीट
येत्या 25 मे ला संपुर्ण जगभरात प्रदर्शित होणाऱ्या ‘बकेट लिस्ट‘ या चित्रपटातील ‘होऊन जाऊ द्या!‘ या गाण्याच्या तुफानी हवेनंतर माधुरी दीक्षितच्या वाढदिवसा निमित्य चित्रपटातील रोमँटिक असं ‘तू परी‘ हे दुसरं गाणं आज सोशल मीडियाद्वारे प्रसारित झालं
आता ‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील ‘तू परी‘ या गाण्यामुळे प्रेमाची नाती नव्याने खुलताना आपणांस बघायला मिळणार आहेत. माधुरीच्या वाढदिवसानिमित्त ‘बकेट लिस्ट‘ चित्रपटातील प्रसारित करण्यात येणार ‘तू परी‘ हे गाणं म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच म्हणावं लागेल. ‘तू परी‘ या गाण्याचं संपूर्ण शूटिंग मलेशिया येथे करण्यात आलेले आहे. ‘तू परी‘ गाण्यादरम्यान आपणांस लंकावी येथील अप्रतिम लोकेशन्स व त्याच बरोबर सौंदर्यवती माधुरीच्या मोहक अदा, सुमित राघवन चा रोमँटिक अंदाज पाहायला मिळणार आहे.
लंकावी सारखे नयनरम्य लोकेशन, माधुरी दीक्षित आणि सुमित राघवन ह्या अत्यंत गोड अशा जोडीचे नृत्य आणि श्रेया घोषाल आणि रोहन प्रधान यांच्या मधुर स्वरांनी सजलेलं ‘तू परी‘ हे सूर मधुर गाणं म्हणजे आपल्यासाठी खरी-खुरी रोमँटिक ट्रीट आहे असं म्हणायला हरकत नाही.धर्मा प्रॉडक्शन, करण जोहर आणि ए ए फिल्म्स प्रस्तुत, दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर दिग्दर्शित, लेखिका देवश्री शिवडेकर आणि दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊस्कर लिखित, डार्क हॉर्स सिनेमाज्, दार मोशन पिक्चर्स आणि ब्लू मस्टँग क्रिएशन्स निर्मित चित्रपट ‘बकेट लिस्ट‘, रोहन-रोहन या संगीतकार जोडीने संगीतबद्ध केलेलं, मंदार चोळकर यांच्या लेखणीतून अवतरलेलं आणि माधुरी दीक्षित व सुमित राघवन यांच्या रोमॅन्सने भरलेलं ‘तू परी‘ हे गाणं आपल्याला पुन्हा आपल्या आवडत्या व्यक्तीच्या प्रेमात पडायला भाग पाडेल यात काही शंकाच नाही.
‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ १४ मेपासून कलर्स मराठीवर
पहिल्याच मालिकेमधून अवघ्या महाराष्ट्राचे मनं जिंकलेली सुरभी हांडे मालिकेमध्ये आरवीची भूमिका साकारणार आहे. तर ओमप्रकाश शिंदे मल्हार आणि निवोदित समृद्धी केळकर ही लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहेत. आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना राकेश सारंग म्हणाले, “‘लक्ष्मी सदैव मंगलम्’ ही मालिका शहर आणि गावं ह्यांचातला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवणार आहोत“.
मालिकेबद्दल तसेच भूमिकेविषयी बोलताना सुरभी हांडे म्हणाली, “मी या मालिकेमध्ये आरवी नावाची भूमिका साकारणार आहे जी डॉक्टर आहे. कलर्स मराठीवरील या मालिकेद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भुमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानचं आहे. “.
पुढे बोलताना ओमप्रकाश म्हणाला, “मी मालिकेमध्ये मल्हार नावाची भूमिका साकारणार असून मी आधी साकारलेल्या भूमिकेहून ही खूपच वेगळी आहे. मल्हार कोल्हापूर मधील असून त्याच्यासाठी त्याचे कुटुंब आणि आरवी जिच्यावर तो प्रेम करतो हे सर्वकाही आहे. मल्हार अत्यंत प्रेमळ, संवेदनशील, भावूक, मनमिळाऊ असा मुलगा आहे. ज्याप्रमाणे ही मालिका करताना आम्ही सगळे जण आनंद घेतो आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देखील ही मालिका बघताना मजा येईल याची मला खात्री आहे. मी खूपच उत्सुक आहे आणि आतुरतेने १४ मेची वाट बघतो आहे“.