रहस्यमय ‘मिरांडा हाऊस’ १७ एप्रिलला प्रदर्शित
राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त दिग्दर्शक राजेंद्र तालक, आयरिस प्रॉडक्शन निर्मित,’मिरांडा हाऊस’ हा रहस्यमय चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. मिलिंद गुणाजी, साईंकित कामत आणि पल्लवी सुभाष यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट मराठी आणि कोकणी भाषेत सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरवरून यात काहीतरी मोठी गुंतागुंत असणार हे नक्की. त्यामुळे अनेक तर्कवितर्कही काढले जात आहेत.
अखेर, ‘मिरांडा हाऊस’चे हे रहस्य येत्या १७ एप्रिल रोजी उलगडणार आहे. इंग्रजी सबटायटलसह हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून मोठ्या विकेंडचे औचित्य साधून हा चित्रपट दोन दिवस आधीच प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले आहे.
या आधी राजेंद्र तालक यांनी ‘सावली’, ‘सावरिया.कॉम’, ‘अ रेनी डे’ यांसारखे पठडीबाहेरचे चित्रपट मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत. त्यामुळे या चित्रपटातही प्रेक्षकांना काहीतरी नाविन्यपूर्ण पाहायला मिळेल.
गुढीपाडवाच्या मुहूर्तावर ‘जजमेंट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर
गुढीपाडवाच्या शुभ मुहूर्ताचे औचित्य साधून ज्योत्स्ना फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित ‘जजमेंट‘ या मराठी चित्रपटाच्या टीम ने प्रदर्शनाची तारीख जाहीर केली. हा थरारक चित्रपट २४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. मंगेश देसाई, तेजश्री प्रधान आणि माधव अभ्यंकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट एक वेगळा विषय आणि वेगळा अनुभव देणारा असणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मंगेश देसाई आणि तेजश्री प्रधान प्रथमच एकत्र झळकणार आहे. एका वेगळ्याच भूमिकेतून हे दोघे प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘जजमेंट‘ या चित्रपटात ‘श्री पार्टनर’ फेम श्वेता पगार हिचीसुद्धा महत्वाची भूमिका आहे. सोबत सतीश सलागरे, किशोरी अंबिये, महेंद्र तेरेदेसाई, शलाका आपटे, विजय भानू, शिल्पा गांधी, प्रतीक देशमुख, निलेश देशपांडे, बाल कलाकार चैत्रा भुजबळ आणि नुमायारा खान आदी कलाकार सुद्धा आहेत.
निवृत्त सनदी अधिकारी आणि पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांच्या ‘ऋण‘ कादंबरीवर आधारित हा चित्रपट समीर रमेश सुर्वे यांनी दिग्दर्शित केला असून डॉ. प्रल्हाद खंदारे आणि हर्षमोहन कृष्णात्रेय यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा सांभाळली आहे.
विजय पाटकरांची मराठी रंगभूमीवर सेकंड इंनिंग !
विनोदाचे बादशहा ओळखले जाणारे विजय पाटकर रंगभूमीवरून प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत. अनेक सुप्रसिद्ध हिंदी मराठी मालिका आणि चित्रपटांतील विनोदी भूमिकांचा दीर्घ प्रवास केल्यानंतर, पाटकर आपल्याला ‘दहा बाय दहा’ या विनोदी नाटकामधून मनोरंजन करताना दिसून येणार आहेत. अनिकेत पाटील दिग्दर्शित ‘दहा बाय दहा‘ या धम्माल विनोदी नाटकांत त्यांच्याबरोबर प्रथमेश परब, सुप्रिया पाठारे हे मराठीतील सुप्रसिद्ध कलाकारदेखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसेच विदिशा म्हसकर हा नवा चेहरादेखील या चौकडीत आपल्याला दिसून येईल.
स्वरूप रिक्रिएशन अँड मीडिया प्रा.लि. निर्मित व अष्टविनायक प्रकाशित ह्या नाटकाचा दौरा संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे. या नाटकाचं लेखन संजय जामखंडी आणि वैभव सानप यांनी केलं आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाची गोष्ट घेऊन येत असलेलं हे नाटक, सामान्य माणसांना चौकटीबाहेर जाऊन विचार करण्यास प्रेरित करेल. ‘दहा बाय दहा‘ च्या घरात हसत खेळत जगणाऱ्या या कुटुंबाला एका अनपेक्षित घटनेला सामोरे जावं लागतं, त्यानंतर त्यांच्यासोबत काय होतं? त्यातून ते कसा गोंधळ घालतात? हे सारं काही अगदी विनोदी ढंगात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे.
झी युवा वरील ‘वर्तुळ’ मालिकेचे शंभर भाग पूर्ण
झी युवा या वाहिनी वरील प्रसिद्ध असलेली ‘वर्तुळ‘ या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले. ‘वर्तुळ‘ या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत. मालिकेच्या या यशात या तिघा कलाकारांचा महत्वाचा वाटा आहे. ‘वर्तुळ‘ मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असताना, सगळ्याच टीमला त्यात सहभागी करून घेण्यात आलं. ‘वर्तूळ‘ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळते.
मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना, मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणते; “मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. कथानक वेगळ्या प्रकारचे असल्याने, सुरुवातीला मनात काहीशी धास्ती/भीती होती. पण, प्रेक्षकांना मालिका आवडते आहे. त्यांचे प्रेम असेच कायम राहील याची खात्री वाटते. केक कापण्यासाठी, संपूर्ण टीम उपस्थित असणं हा त्याचाच एक भाग होता.”
‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही संगीत ध्वनिफीत भक्तांसाठी प्रकाशित
श्री स्वामी समर्थांचा महिमा गीतमय सोहळ्यातून अनुभवण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीची निर्मिती करण्यात आली आहे. श्री स्वामी समर्थांची ही लीला आपणास साधी सोपी सरळ वाटेल वरवर ती तशी दिसेल पण त्यातील मथितार्थ गूढ अर्थ जाणला तर ती निश्चितच आपणा सर्वांस बोधप्रद ठरणारी अशीच असते. स्वामी समर्थांचा महिमा, त्यांचे कार्य, त्यांची कीर्ती भक्तिगीतांच्या माध्यमातून भक्तांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘स्वामी त्रैलोक्याचा’ ही नवीन संगीत ध्वनिफीत स्वामींच्या भक्तांसाठी उपलब्ध झाली असून या ध्वनिफीतीचा दिमाखदार प्रकाशन अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला.
‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीची निर्मिती वैजयंती परब यांनी केली आहे. या ध्वनिफीतीच्या निमित्ताने स्वामींची सेवा करण्याची संधी मिळाल्याचे समाधान संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी व्यक्त केले. वैजयंती परब लिखित ‘स्वामी त्रैलोक्याचा‘ या ध्वनिफीतीमधील गाण्यांना अनेक नामवंत गायकांनी स्वरसाज चढवला आहे. पद्मश्री अनुप जलोटा, पद्मश्री अनुराधा पौडवाल, अजित कडकडे, रविंद्र साठे, वैशाली सामंत आणि आर्या आंबेकर या प्रसिद्ध गायकांचा यात समावेश आहे. संगीतकार स्वरूप नंदू होनप यांनी यातील गीते संगीतबद्ध केली आहेत. ‘माता पिता बंधू सखा’,’अंतरंग रंगले माझे’, ‘स्वामीमय झाले मन‘,’स्वामी के दरबार में‘, ‘तेरी क्रिपा होगी‘, ‘तुझे रूप चित्ती‘, ‘स्वामी पाके तेरे दरसन‘,’जय देव जय देव अक्कलकोट स्वामी‘ अशा हिंदी–मराठी गाण्यांचा नजराणा या ध्वनिफीतीत असणार आहे.
‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात माधुरी पवार ठरली अप्सरा
‘अप्सरा आली‘ या झी युवा वरील कार्यक्रमात एकूण १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरांची निवड करण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी, या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महा अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पारंपरिक लावणीचा साज, आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी या सगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले.
महागुरू सचिन पिळगांवकर यांनी महाअप्सरांबरोबर ‘अप्सरा आली‘ कार्यक्रमाचे परीक्षण केले आणि अप्सरा आली या कार्यक्रमातून महाराष्ट्राची पहिली अप्सरा दिली . या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी कि एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्या असतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे होता. महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांची जुगलबंदी होतंच पण त्याच बरोबर महाअप्सरांनी म्हणजेच सोनाली कुलकर्णी , दीपाली सय्यद आणि सुरेख पुणेकर यांनीही स्पेशल नृत्य परफॉर्म देत प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला.
ऍक्शनपट ‘रॉकी’ ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस
मराठी मध्ये आतापर्यंत अनेक ऍक्शनपट प्रेक्षकांच्या भेटीस आले. असाच ऍक्शनचे कॉम्बिनेशन असलेला ‘रॉकी’ हा मल्टीस्टारर चित्रपट ८ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. रॉकी आणि संजना यांच्यात प्रेमाचं नातं फुलत असताना अचानक काही अकल्पित घटनांना या दोघांना सामोर जावं लागतं. नैतिकतेचा बुरखा चढवून काही समाजकंटक या चुकीच्या गोष्टी घडवून आणत असतात. त्यांच्या या कृत्याविरोधात लढा देण्याचा प्रयत्न करणाऱ्या रॉकीचा आवाज दडपण्याचा प्रयत्न होत राहतो. त्याविरोधात लढण्याची धमक ‘रॉकी’ कशाप्रकारे आणतो याची चित्तथरारक कहाणी ‘रॉकी’ मध्ये पहायला मिळणार आहे
‘रॉकी’ या सिनेमातून संदीप साळवे व अक्षया हिंदळकर हे फ्रेश चेहरे रुपेरी पडद्यावर पदार्पण करतायेत या नव्या जोडीसोबत अशोक शिंदे, प्रदीप वेलणकर, यतीन कार्येकर, क्रांती रेडकर, गणेश यादव, विनीत शर्मा, स्वप्नील राजशेखर, दीप्ती भागवत या कलाकारांच्या भूमिका आहेत. हिंदीतील अभिनेते राहुल देव ही या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच मराठीत काम करणार आहेत.
या चित्रपटाचे निर्माते प्रशांत त्रिपाठी, मनेश देसाई, नितीन शिलकर, हिमांशू अशर आहेत. सुनिता त्रिपाठी या कार्यकारी निर्मात्या आहेत.
असंभवनीय गूढ असणारी अशी नवीन मालिका ‘एक घर मंतरलेलं’
अनपेक्षित आणि रहस्यमय असणारी अशी नवीन मालिका झी युवावर येत आहे . उत्कृष्ट कथा, उत्तम दिग्दर्शक, लोकप्रिय कलाकार हे सर्व नीटपणे सांभाळणारा निर्माता घेऊन झी युवा एका नव्या पर्वाची सुरुवात ‘एक घर मंतरलेलं‘ या मालिकेच्या स्वरूपात करत आहे. प्रेक्षकांना काय आवडते आणि काय नाही आवडणार, कथा कशाप्रकारे प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणार, कोणत्या वेळेला ही मालिका प्रेक्षकांना पाहायला आवडेल या अश्या असंख्य गोष्टींचा विचार करून ‘एक घर मंतरलेलं‘ ही मालिका झी युवावर मार्च च्या पहिल्या आठवड्यात ४ मार्च पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता प्रदर्शित होणार आहे.
‘एक घर मंतरलेलं‘ या मालिकेबद्दल बोलताना झी युवा चे बिझिनेस हेड बवेश जानवलेकर म्हणाले, ” झी युवाने आजवर अनेक उत्कृष्ट मालिका प्रेक्षकांना दिल्या , पण ही मालिका नक्कीच वेगळी असणार आहे . प्रेक्षकांच्या मनात भास आभासांच वादळ निर्माण करण्यास ही मालिका सफल होईल असा मला विश्वास आहे. प्रेक्षकांना उत्तम विषय आणि त्या विषयाची योग्य हाताळणी करत एक चांगली मालिका देण्याचा झी युवा वाहिनीचा मानस आहे.”
आनंद शिंदे आपल्या हटके अंदाजात म्हणताहेत ‘आली फुलवाली’
चेतन गरुड प्रॉडक्शन्स निर्मित ‘खंडेराया झाली माझी दैना’ आणि ‘सुरमई’ ह्या गाण्यांना मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर चेतन गरुड आणखी एक हटके गाणं रसिक-प्रेक्षकांसाठी घेऊन आले आहेत. सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदें ह्यांनी आपल्या हटके अंदाजात गायलेल्या ‘आली फुलवाली’ गाणे. एव्हरेस्ट एन्टरटेनमेन्ट यांच्या संयुक्तविद्यमाने ‘आली फुलवाली’ हा सिंगल अल्बम युट्युब चॅनलवर झळकणार असून लवकरच हे गाणं इतर सोशल पोर्टल्सवर आणि म्युझिक चॅनेल्सवर तुम्हाला पाहता येईल.
राहुल झेंडे दि दिग्दर्शित ‘आली फुलवाली’ या अल्बमच्या टायटलवरूनच आपल्या लक्षात येईल हे गाणं एका फुलवालीला उद्देशून लिहिले गेलेले असून त्यातली कलरफुल फुलवाली सगळ्यांची मनं जिंकेल यात शंका नाही. चेतन मोहतुरे आणि अस्मिता सुर्वे या नवोदित जोडीवर चित्रित केलेलं हे गाणं शप्पिद शेख यांनी लिहिले व संगीतबद्ध केले आहे. अल्बमला साजेशी वेशभूषा रश्मी मोखळकर यांची आहे तर या अल्बमचे संकलन राहुल झेंडे यांनी केले आहे शिवाय रवी उच्चे यांचे छायांकन ‘आली फुलवाली’ला लाभले आहे.
‘इयर डाऊन’ मालिकेचे दुसरे पर्व सोनी मराठीवर
सोनी मराठी वाहिनीने नवीन एक वेगळी मालिका म्हणजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार ‘इयर डाऊन’ आहे. समीर पाटील दिग्दर्शित या मालिकेत संतोष जुवेकर आणि प्रणाली घोगरे यांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. या मालिकेच्या निमित्ताने ही जोडी पहिल्यांदाच एकत्र दिसली होती. संतोष जुवेकरने यामध्ये जन्मेजयची भूमिका साकारली होती जो एका संपन्न कुटुंबातला होता.
‘इयर डाऊन’चे पहिले पर्व संपले असून या मालिकेचे दुसरे पर्व आहे. संतोष जुवेकरने आतापर्यंत अनेक भूमिका साकारल्या आहेत. तसेच त्याने केलेल्या रफ अँड टफ भूमिका प्रेक्षकांना जास्त आवडल्या आहेत. ‘इयर डाऊन’ या मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना संतोष नेहमी पेक्षा वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळाला.