प्रेमाचा प्रवास घडवणारा चित्रपट ‘प्रेमवारी’ फेब्रुवारीत प्रदर्शित
‘प्रेमवारी‘ या चित्रपटाचा अतिशय सुंदर ट्रेलर चित्रपटातील कलाकारांच्या उपस्थितीत नुकताच रिलीज करण्यात आला. राहुल आणि पूजा यांची कॉलेज मध्ये होणारी भेट, त्यातून फुलत जाणारं प्रेम पण, याच प्रेमात काही गोष्टी अडसर ठरायला लागतात आणि काही कारणामुळे परिवाराकडून होणारा विरोध या सर्व अडथळ्यामुळे पुढे ह्या प्रेमाचा प्रवास कसा होतो ते आपल्याला चित्रपटातच पाहावे लागेल.
‘प्रेमवारी‘ या सिनेमात चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे मुख्य भूमिकेत दिसणार आहे. चिन्मय बऱ्याच दिवसांनी चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर मयुरी कापडणे च्या रूपाने मराठी चित्रपट सृष्टीला एक नवीन चेहरा मिळणार आहे. यांच्यासोबतच भारत गणेशपुरे, अभिजित चव्हाण, नम्रता पावसकर, राजेश नन्नावरे, निशा माने, प्रियांका उबाळे, विशाल खिरे हे कलाकार देखील चित्रपटामध्ये दिसणार आहे. ‘प्रेमवारी‘ हा सिनेमा ८ फेब्रुवारी ला रिलीज होणार आहे. या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले असून वैशाली सामंत, श्रेया घोषाल, आदर्श शिंदे आणि सोनू निगम यांनी आपल्या मधुर आवाजाने गाण्यांना स्वरसाज चढवला आहे. या चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.
गायिका सावनी रविंद्रचा नवा लूक
मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019 मध्ये आपल्या लूकमध्ये एक्सिपिरीमेंट केलेला दिसतोय.
बॉलीवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे त्यांचे चाहते अशा कॅज्युअल लुक्समध्ये पाहत असतात. मात्र मराठीतल्या गायिकांना आपल्या लुक्सबाबत खूप एक्सपिरीमेन्ट करताना कमीच पाहिलं जातं. ह्याविषयी सावनी म्हणते, “मला माझे बरेच चाहते सोशल मीडियावरून माझ्या स्टाइल स्टेटमेंटविषयी विचारत असतात. म्हणून मी स्वत: ज्या कपड्यांमध्ये कम्फर्टेबल आहे. त्याच कपड्यांमध्ये हे नवे फोटोशूट केले. कारण आपण ज्यात जास्त कम्फर्टेबल आहोत, तीच फॅशन आणि स्टाइल आपण उत्तम कॅरी करू शकतो, असे मी मानते.”
सावनी पूढे सांगते, “माझी मैत्रीण सची पटवर्धनच्या ‘एबनी बाय आयवरी’चे कपडे मी नेहमी घालते. म्हणूनच हे फोटोशूट करण्याची कल्पना मला तिने दिली. मी जर वैयक्तिक जीवनात कॅज्युअल वेअर घालते. तर एकदा त्यामध्ये फोटोशूटही करावे, असे तिला वाटत होते.”
राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ चा ट्रेलर प्रदर्शित
निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा‘ मराठी चित्रपट काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते.
‘धप्पा‘ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली‘ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू ख्रिस्त या पात्राचा पण समावेश आहे. ज्या वयाच्या मुलांना ‘राजकारण म्हणजे काय?’ असा प्रश्न पडतो ती मुले या नाटकाचा प्रयोग करण्यासाठी ‘मिशन झॅप झॅप‘ आखतात त्याचा रंजक प्रवास चित्रपटात बघायला मिळणार आहे.
‘धप्पा‘ या चित्रपटात अनेक लहान मुलांसह इरावती हर्षे, सुनिल बर्वे, गिरीश कुलकर्णी, श्रीकांत यादव, उमेश जगताप यांची चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. ‘धप्पा‘ या चित्रपटाचे निर्माते सुमितलाल शाह, सहनिर्माते गिरीश पांडुरंग कुलकर्णी आणि उमेश विनायक कुलकर्णी आहेत. हा चित्रपट येत्या १ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये गावावर येणार नवं संकट
कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं‘ मालिकेमध्ये अनेक दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवाच्या रुपात देवीचे दर्शन झाले आहे … आता बाळू सत्यवला देवप्पापासून कसे वाचवेल ? कसे दूर ठेवेल ? हे बघणे रंजक असणार आहे? गावात अनेक रंजक घडामोडी घडत असून प्रेक्षकांना बाळूची गोष्ट सगळ्याचं भावतेय.. पिंगळा येऊन गावात काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत देतो.. आता हे संकट काय आहे ? ही देवप्पाचीच कुठली चाल तर नाही ? अशा अनेक प्रश्नांची उत्तर लवकरच प्रेक्षकांना मिळणार आहेत…
गावामध्ये पंचाच्या बायकोला म्हणजेच अक्काला वेगवेगळे आवाज ऐकू येत आहेत… आता हे आवाज कसले आहेत ? पंचाच्या बायकोला का ऐकू येत आहेत ? हे कुणालाच माहिती नाही.. पंच आणि पंचाच्या बायकोला कुठल्या गोष्टीचा लोभ सुटला आहे ? बाळू या दोघांना कुठल्याही गोष्टीचा लोभ ठेऊ नका अये का निक्षून म्हणणार आहे… आणि बाळू या अघटितावर कशी मात करणार ? हे बघणे ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं‘ या मालिकेमध्ये रंजक असणार आहे…याआधीही देवाप्पाने पंचाला थेट आव्हान दिला होत त्यामुळे हि देवापाची खेळी आहे कि पिंगळाचं भाकीत खर ठरणार हे लवकरच कळेल…
नवनाथांवरची भक्ती दर्शवणारा चित्रपट ‘बोला अलखनिरंजन’
महाराष्ट्रात उगम होऊनही केवळ महाराष्ट्रापुरता सीमित न रहाता संपूर्ण भारतभर ज्या संप्रदायाचे उपासक आपल्याला आढळतात तो संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय. नाथ संप्रदायाचा हा महिमा आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. २८ डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘बोला अलखनिरंजन‘ या चित्रपटाच्या माध्यमातून नाथसंप्रदायाचा महिमा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. मातृपितृ फिल्म्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाची निर्मिती, लेखन, दिग्दर्शन अशी तिहेरी जबाबदारी घन:श्याम येडे यांनी सांभाळली आहे.
नाथ संप्रदायाचे आद्य गुरु मच्छिंद्रनाथ आणि नवनाथांच्या आयुष्यातल्या चमत्कृतीपूर्ण घटना आणि एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चैतन्यची नवनाथांवरची भक्ती यांची अध्यात्मिक सांगड ‘बोला अलखनिरंजन‘ या चित्रपटात घालण्यात आली आहे. अमोल कोल्हे, सिया पाटील, नागेश भोसले, दिपक शिर्के, दिपाली सय्यद, गायत्री सोहम, मिलिंद दास्ताने, प्रफुल्ल सामंत, रोहित चव्हाण, भक्ति बर्वे आणि घन:श्याम येडे यांच्या चित्रपटात भूमिका आहेत.
‘बोला अलखनिरंजन‘ या चित्रपटाचे सहनिर्माते सतु कृष्णा केणी (बिजांकुर ग्रुप ऑफ कंपनी), शिवाजी घमाजी दडस (अनमोल निर्मिती सहकार्य) आहेत. अमोल येवले, विष्णुपंत नेवाळे प्रसिद्धी निर्मिती सहाय्यक आहेत. कथा, पटकथा व संवाद घन:श्याम येडे यांनी लिहिले आहेत. संगीत विशाल बोरूळकर तर पार्श्वसंगीत सुरज यांचे आहे. छायांकन सरफराज खान तर संकलन दिपक विरगुट आणि विलास रानडे यांचे आहे. सुरेश वाडकर, रविंद्र साठे, नेहा राजपाल, बेला शेंडे यांनी भक्तीमय गीतांना स्वरसाज दिला आहे.
१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे आयोजन
१७ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव हा भारतातील एकमेव आशियाई चित्रपट महोत्सव आहे. शुक्रवार दिनांक १४ डिसेंबर ला सिटीलाईट सिनेमा मुंबई येथे अनेक मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये १७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवाचे भव्य उदघाटन झाले. या उदघाटनाला प्रमुख पाहुण्या म्हणून मराठी चित्रपट अभिनेत्री आणि दिग्दर्शिका मृणाल कुलकर्णी, आशियाई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष श्री. किरण शांताराम, आशियाई चित्रपट महोत्सवाचे डायरेक्टर श्री.सुधीर नांदगावकर, प्रभात चे सचिव श्री संतोष पाठारे , दिग्दर्शक सुनील सुखथनकर आणि फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी इंडियाचे उपाध्यक्ष श्री. प्रेमेंद्र मुझुमदार ही मंडळी उपस्थित होती. ‘वेलकम होम‘ या मराठी चित्रपटाने महोत्सवाचे उद्घाटन झाले. डॉ. सुमित्रा भावे आणि सुनील सुखथनकर या चित्रपटाचे दिग्दर्शक असून त्यात मृणाल कुलकर्णी, सुमित राघवन, सुबोध भावे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
राष्ट्रीय पुरस्कार विजेता सिनेमा ‘कासव‘ आणि ‘वेलकम होम‘ चित्रपटाचे दिग्दर्शक सुनील सुखथनकर यांनी सांगितले की, ” २००४ मध्ये आशियाई चित्रपट महोत्सवात दाखवलेल्या ‘देवराई‘ चित्रपटासाठी अतुल कुलकर्णी यांना मिळालेला अवॉर्ड हा आमच्यासाठी आजही खास आहे . एक दिग्दर्शक म्हणून मला दडपण आले आहे आणि आशा करतो तुम्हा चित्रपट प्रेमींना आमचा चित्रपट आवडेल . ”
१७ व्या थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सवात मुंबईकर येथे प्रेक्षकांना आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाद मिळालेले चित्रपट व लघुपटांचा आस्वाद घेता येणार आहे. अर्जुन दत्ता या बंगाली दिग्दर्शकाचा ‘अव्यकतो‘ हा चित्रपट व शेखर बापू रानखांबेचा ‘पॅम्पलेट‘ हा तीस मिनिटांचा लघुपट आशियाई महोत्सवात प्रदर्शित होणार आहेत.
मोबाईलच्या आसक्ती मुळे संपर्क तुटलेल्या नायक (नंदू माधव) आपल्याला ‘द ड्रेनेज‘ मध्ये आपल्याला पाहता येईल. ‘परसेप्टिव्ह‘ मधून आदिनाथ कोठारे ने धार्मिक सोहळ्यांकडे पाहण्याचा आगळा वेगळा दृष्टिकोन चित्रित केला आहे.
“प्रेमवारी” चित्रपटाचे पोस्टर लाँच
‘प्रेम‘ या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित ‘प्रेमवारी‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. हे पोस्टर पाहून हा नक्कीच एक रोमँटिक सिनेमा वाटत आहे. या पोस्टर वर सिनेमातील मुख्य कलाकार चिन्मय उदगीरकर आणि मयुरी कापडणे दिसत आहे. व्हॅलेंटाइन डे च्या आठवड्यात म्हणजेच ८ फेब्रुवारी ला हा सिनेमा रिलीज होणार आहे. रोमँटिक सिनेमा आणि व्हॅलेंटाइन डे चा आठवडा हा एक चांगला योगायोग जुळून आला आहे. या चित्रपटातून मयुरीच्या रूपाने मराठी सिनेसृष्टीत एक नवीन चेहरा येत आहे. साईममित प्रोडक्शन निर्मित ‘प्रेमवारी’ या आगामी सिनेमाद्वारे प्रेमाची नवी परिभाषा लोकांसमोर येणार आहे, या सिनेमाला मराठी चित्रपटसृष्टीतला प्रसिद्ध संगीतदिग्दर्शक अमितराज याने संगीत दिले.
या सुंदर चित्रपटाचे लेखन,निर्मिती आणि दिग्दर्शन राजेंद्र कचरू गायकवाड यांनी केले असून, प्रस्तुतकर्त्याची धुरादेखील त्यांनीच सांभाळली आहे.
नशीबवान चित्रपटामधील ‘ब्लडी फुल जिया रे’ हे गाणं नुकतेच रिलीज झाले
सुप्रसिद्ध मराठी कलाकार भाऊ कदम यांचा आगामी चित्रपट नशीबवान हा प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल हा सिनेमा प्रस्तुत करत आहे. फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने, आणि अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटामधील ‘ब्लडी फुल जिया रे‘ हे गाणं नुकतेच रिलीज झाले. उडत्या चालीचं असणार हे गाणं आनंद शिंदे यांनी स्वरबद्ध केले असून सोहम पाठक यांनी या गाण्याला संगीत दिले तर शिवकुमार ढाले यांनी हे गाणं लिहिले आहे. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन विठ्ठल पाटील यांनी केले आहे.
गाणं दिसताना जितके रंजक, ऐकताना जितके मजेदार वाटत आहे तितकीच मेहनत गाणं चित्रित करताना झाली. कारण या गाण्याचे चित्रीकरण हे एका खऱ्याखुऱ्या डान्स बार मध्ये करण्यात आले, सोबतच या गाण्यामध्ये आनंद शिंदे याची एक खास झलक सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे.
उदय प्रकाश लिखित ‘दिल्ली की दीवार‘ या कथेवर आधारीत असलेला ‘नशीबवान‘ हा सिनेमा नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ११ जानेवारी २०१९ रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या सिनेमाचे अमित नरेश पाटील, विनोद मनोहर गायकवाड आणि महेंद्र गंगाधर पाटील हे निर्माते असून, प्रशांत विजय मयेकर आणि अभिषेक अशोक रेणुसे यांनी या सिनेमाच्या सहनिर्मात्याची धुरा सांभाळली आहे.
सोनाली कुलकर्णी ची प्रमुख भूमिका असलेला ‘माधुरी’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच
मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, उर्मिला मातोंडकर प्रस्तुत, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी‘ या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.
ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की सोनाली कुलकर्णी एका तरुणीची भूमिका साकारत असून सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करू शकतो ह्याचे प्रदर्शन ट्रेलर मध्ये होत आहे. सोनालीसोबत शरद केळकर, संहिता जोशी, अक्षय केळकर आणि विराजस कुलकर्णी यांनी साकारलेल्या पात्रांची झलक देखील ट्रेलरमध्ये पाहू शकतो.
मुंबापुरी प्रॉडक्शन आणि मोहसिन अख्तर यांचा पहिला मराठी चित्रपट ‘माधुरी‘, सोनाली कुलकर्णीचा हटके लूक, संपूर्ण स्टारकास्टचा तगडा अभिनय या सगळ्या गोष्टीने परिपूर्ण असा ‘माधुरी‘ चित्रपट ३० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे.
‘वाजे पाऊल आपुले’ आणि ‘टिळक आणि आगरकर’ नाटकांचे पुन्हा रंगमंचावर आगमन
१९६७ मध्ये रंगमंचावर सादर झालेले प्रख्यात साहित्यिक विश्राम बेडेकर लिखित आणि दिग्दर्शित, दाजी भाटवडेकर, अरविंद देशपांडे, सतीश दुभाषी, दामू केंकरे, जयंत सावरकर व मंगला संझगिरी यांच्या अभिनयाने पावन झालेल्या ‘वाजे पाऊल आपुले’ तसेच लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं ‘टिळक आणि आगरकर‘ या नाटकांच्या पुनरुज्जीवन होत असल्याचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह डॉ. बाळ भालेराव, नाट्यशाखा कार्यवाह प्रमोद पवार, व उपाध्यक्ष जयंत सावरकर यांनी जाहीर केले.
अष्टपैलू साहित्यिक, नाटककार विश्राम बेडेकर यांनी लिहिलेल्या विनोदी ‘वाजे पाऊल आपुले‘ या तुफान गाजलेल्या लोकप्रिय नाटकाचे प्रयोग येत्या २४ नोव्हेंबर पासून सर्वत्र सुरु होत असून ते संपूर्ण नव्या संचात येत आहे. जयंत सावरकर हेच या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून त्यात त्यांनी तेव्हा केलेलीच भूमिका ते आताही या नाटकात करीत आहेत. लोकप्रिय अष्टपैलू अभिनेते अभिजित चव्हाण या नाटकातली भगवंत ही मध्यवर्ती भूमिका करीत असून त्यांच्या जोडीला पूर्णिमा तळवलकर सुशिलाची व्यक्तिरेखा साकारत आहेत. सोबत अंशुमन म्हसकर, अमेय बोरकर आणि दिपकार पारकर हे गुणी कलावंत आहेत.
‘टिळक आणि आगरकर‘ हे नाटक आज २०१८ मध्ये पुनश्च रंगभूमीवर येत आहे मात्र थोडं वेगळ्या स्वरुपात. त्याचे अभिवाचनाचे प्रयोग प्रथम होणार आहेत, त्यानंतर हे नाटक नव्या संचात संघातर्फे सादर केले जाणार आहे. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्या मैत्रीच्या मर्मबंधावर आधारलेलं हे नाटक दिग्दर्शित करण्याचे शिवधनुष्य पेललं आहे ‘लोकमान्य एक युगपुरुष‘ या चित्रपटाचे संवादकार कौस्तुभ सावरकर यांनी. ‘टिळक आणि आगरकर’ नाटकाच्या अभिवाचनात सहभाग घेणाऱ्या कलावंतामध्ये गोपाळराव जोशी(उन्मन बाणकर), गोपाळराव आगरकर(अंगद म्हसकर), यशोदा आगरकर(मिथिला मुरकुटे), बळवंतराव टिळक(कौस्तुभ सावरकर) तसेच ‘श्री. नाट्यरंग कर्जत’च्या नवोदित गुणी कलावंतांचाही सहभाग आहे.