‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक चित्रपटाचा मुहूर्त संपन्न
लेखक, दिग्दर्शक, अभिनेते प्रविण विठ्ठल तरडे यांनी आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या भव्यदिव्य ऐतिहासिक चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी एक आदर्श पायंडा निर्माण केला, कोणत्याही चित्रपटाचा मुहूर्त म्हटलं की तो एखाद्या नावाजलेल्या व्यक्तीच्या हस्ते करणे ही एक परंपरा आहे. मात्र आपल्या आगामी चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप देण्याचा मान राज्याच्या विविध शहरातील चित्रपटगृहांच्या डोअर किपर्स, व्यवस्थापक आणि कर्मचारी यांना देण्यात आला.
यावेळी चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे, संदीप रघुनाथराव मोहिते पाटील, धर्मेंद्र सुभाष बोरा व सौजन्य सुर्यकांत निकम हे तीन निर्माते तसेच माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते पाटील, डीओपी महेश लिमये, ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे निर्माते अभिजीत भोसले, सिटी प्राइड चित्रपटगृह समूहाचे व्यवस्थापक सुगत थोरात, क्रिएटिव्ह प्रोड्युसर रमेश परदेशी यांच्यासह औरंगाबाद, नाशिक, पुणे या शहरातील चित्रपटगृहांचे व्यवस्थापक, डोअर किपर्स, बुकिंग क्लार्क, प्रोजेक्टर ऑपरेटर्स आणि चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ उपस्थित होते.
शेतकर्यांच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणार्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाच्या यशानंतर प्रविण तरडे घेऊन येत असलेल्या या भव्य चित्रपटाची निर्मिती उर्विता प्रॉडक्शन्स यांची आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या स्वराज्याच्या दोन्ही छत्रपतींचे सरसेनापती होण्याचा बहुमान हंबीरराव मोहिते यांनी मिळवला. अंदाजे ह्या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे .
पूर्वा गोखले दिसणार ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमात
पूर्वा गोखले हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रीनं मराठी रसिकांसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हिच पूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून, ‘भयभीत’ या आगामी सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे.
पूर्वा गोखलेची ‘कुलवधू’ हि मालिकेतील खूप गाजली होती. तसेच पूर्वाने ‘कहानी घर घर की’, ‘कोई दिल में है’ या हिंदी मालिकांद्वारे रसिकांचं लक्ष वेधून घेतलं. सध्या तिची ‘तुझसे है राबता’ ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करीत आहे. ‘कुलवधू’ या मालिकेतील नायक सुबोध भावे आगामी ‘भयभीत’ या सिनेमातही पूर्वा सोबत काम करीत आहे. रहस्यमय घटना आणि मानवी नातेसंबंध याद्वारे कथानकात निर्माण करण्यात आलेली या सिनेमातील गुंतागुंत प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी आहे.
‘भयभीत’ या सिनेमात पूर्वा गोखले आणि सुबोध भावे बरोबर मधू शर्मा, गिरीजा जोशी, मृणाल जाधव आणि यतीन कार्येकर हे कलाकार विविध भूमिकांमध्ये दिसणार आहेत. निर्मिती शंकर रोहरा, दिपक नारायणी यांची असून अविनाश रोहरा, पवन कटारिया, समीर आफताब, प्रभाकर गणगे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.
‘अक्च्युअल मुव्हीज प्रोडक्शन्स‘ ब्राऊन सॅक फिल्म्स प्रा. लि’ प्रस्तुती असलेल्या ‘भयभीत’ या आगामी मराठी सिनेमाचं दिग्दर्शन दीपक नायडू केलं आहे. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘अल्बम काढाल काय’ गाण्यात अमृता खानविलकरचा हॉट आणि ग्लॅमर्स लूक
एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे निर्मित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटातलं ‘अल्बम काढाल काय’ हे गाणं नुकतच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये आपल्याला अमृता खानविलकर अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये ठुमके लावताना दिसते.
तरुणाईमध्ये प्रसिद्द असलेली मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडेनं “अल्बम काढाल काय” हे गाणं गायलं आहे. जितेंद्र जोशीनं लिहिलेलं हे गाणं संगीतकार चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलं आहे. या गाण्याला सोशल मीडियात चांगली लोकप्रियता मिळत असल्याचे पाहायला मिळतेय.
दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी ‘वाजवूया बँड बाजा’चे पहिले पोस्टर
प्रेक्षकांना मनमुराद हसवायला भाग पडणारा ‘वाजवूया बँड बाजा’ हा चित्रपट येत्या २० मार्च २०२० ला महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होत असून राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक शिवाजी लोटन पाटील यांच्या ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे .
अमोल लक्ष्मण कागणे प्रस्तुत लक्ष्मण एकनाथराव कागणे,अमोल कागणे निर्मित ह्या चित्रपटाची खास झलक नुकतीच पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी वाहिली. निर्माते आणि दिग्दर्शक यांच्यासमवेत चित्रपटातील मुख्य कलाकार मंगेश देसाई ,प्रकाश गायकवाड डी.सी.पी पुणे, चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री प्रीतम कागणे यांनी देखील या प्रसंगी उपस्थिती लावली.
तीन भावांच्या आयुष्यातल्या गमती-जमतींवर आधारलेली ‘वाजवुया बँड बाजा’ची मजेशीर कथा संदीप नाईक यांनी लिहिली आहे तर प्रसंगानुरूप हास्याची कारंजे उडवणारी पटकथा तसेच संवाद निशांत नाथराम धापसे यांनी लिहिली आहेत. निसर्गरम्य असा कॅनव्हास चितारला आहे छायाचित्रकार नागराज दिवाकर यांनी. शिवाय या प्रेमकथेला खरा साज चढवलाय तो ‘वाजवूया बँड बाजा’या चित्रपटातील गाण्यांनी. विजय गटलेवार आणि राहुल मिश्रा यांच्या संगीत लहरींवर गायक-आदर्श शिंदे यांच्या स्वरांनी तर चारचाँदच लावलेत.
‘वेगळी वाट’ चित्रपटात दिसणार वडील-मुलीच्या नात्याची मनःस्पर्शी कथा
चित्रपट हे एक प्रभावी माध्यम असून विशेषतः मराठी चित्रपट बऱ्याचदा मनोरंजनातून समाजप्रबोधनही घडवतात असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही . मराठी चित्रपटांचे आशय-विषय हे नेहमीच प्रेक्षकांना विचार करण्यास भाग पाडतात. जयश्री शाह आणि तुषार शाह प्रस्तुत ‘वेगळी वाट’ या चित्रपटकाचे लेखन-दिग्दर्शन अच्युत नारायण यांनी केले आहे तर अलीकडेच त्यांनी आपल्या या महत्त्वाकांक्षी चित्रपटाची पहिली झलक सोशल मीडियावर प्रदर्शित केली आहे.
अच्युत नारायण आणि आशिष राखुंडे यांनी लिहिलेली ‘वेगळी वाट’ची मनःस्पर्शी पटकथा वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारलेली आहे. एका सुखी चौकोनी कुटुंबाचा जीवनप्रवास रेखाटणारा हा चित्रपट प्रेक्षकांना अंतर्मुख करेल यात काहीच शंका नाही. या चित्रपटातील कलाकारांची नावे सध्या गुलदस्त्यात असून ‘वेगळी वाट’च्या पहिल्या-वाहिल्या झलकेमुळे प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणून धरली आहे. या चित्रपटाचे छायांकन शकील खान यांचे आहे तर मंसूर आजमी यांचे संकलन, विजया शंकर, डॉ. दिनेश अर्जुना यांचे संगीत आणि सुनील सिंह यांचे पार्श्वसंगीत असून ‘वेगळी वाट’ हा चित्रपट ७ फेब्रुवारी २०२० ला आपल्या भेटीस येणार आहे.
‘इभ्रत’ मध्ये दिसणार ‘मल्हार-मायडी’ची तरल प्रेमकथा
या जगातली सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे ‘प्रेम’. आजवर इतिहासात ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल. अशीच जगावेगळी जीव हेलावून टाकणारी मल्हार-मायडी ची प्रेमकथा आगामी ‘इभ्रत’ (Ibhrat) ह्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
तिकीटबारीवर गाजलेल्या रेडू आणि टकाटक या चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी ‘इभ्रत‘ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद लिहिले आहेत. डॉल्फिन सिनेक्राफ्ट या बॅनरखाली श्रुती वसंत दांडेकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर प्रवीण रमेश क्षीरसागर यांनी इभ्रतच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या चित्रपटात संजय शेजवळ, शिल्पा ठाकरे, सुरेश विश्वकर्मा असे प्रमुख कलाकार दिसणार आहेत.
तरल आणि नितळ प्रेमाची गोष्ट सांगणारा ‘इभ्रत’ २१ फेब्रुवारी २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘शिकारी’ नंतर नेहा खान आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर
बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी ‘शिकारी’ फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता . मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ ‘शिकारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.
झी युवावर वरील ‘युवा डान्सिंग क्वीन‘ या सेलेब्रिटी डान्सिंग रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी ती शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी. तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवर आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे ह्याचं ही दर्शन देणार आहे .
झी युवा वाहिनीवर, बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होतो.
‘पेठ’ – आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा आगामी चित्रपट
अनेक वेगळ्या धाटणीचे सिनेमे मराठीत येत आहेत. प्रेमासाठी सगळी बंधने झुगारत, आजच्या समाजव्यवस्थेवर भाष्य करणारा असाच एक वेगळा ‘पेठ’ या आगामी चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. ‘शारदा फिल्म प्रोडक्शन’ ची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते श्री. विरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजीत साठे आहेत.
वेगवेगळ्या जॉनरची पाच गाणी या चित्रपटात आहेत. या गाण्यांना पी.शंकरम यांच्या संगीताची साथ लाभली आहे. समाजातील दोन भिन्न वर्गातल्या प्रेमवीरांची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला नक्कीच भावेल असे मत दिग्दर्शक अभिजीत साठे यांनी व्यक्त केले.
वृषभ शहा आणि नम्रता रणपिसे ही नवी जोडी ‘पेठ’ या चित्रपटाचा निमित्ताने मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. यासोबत निशिगंधा वाड, महेशदादा देवकाते, सायली शिंदे, अभिषेक शिंदे, विशाल टेके, सुरज देसाई, विकास कोकरे, महेश पांडे, प्रियांका उबाळे, रुक्सार परवीन, अस्मिता पन्हाळे या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे लेखन, पटकथा, संवाद तसेच कलादिग्दर्शन अभिजीत साठे यांचे आहे. नेत्रसुखद आणि सुश्राव्य संगीताने नटलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या संगीत अनावरण सोहळ्यात विशेष उपस्थिती ठरली ती सुरेल गायिका कार्तिकी गायकवाड हिची. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिग्दर्शक प्रकाश धींडले यांनी केले.
सुबोध भावे आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज
अभिनेता आता पर्यन्त सुबोध भावेने मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी अशा सर्वच माध्यमात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. अभिनयासोबतच चित्रपट दिग्दर्शक, निर्माता म्हणूनही त्याने प्रेक्षकांच्या मनावर आपला ठसा उमटविला आहे. सुबोध आता पुन्हा एकदा नव्या इनिंग साठी सज्ज झाला असून तो ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रस्तुतकर्ता म्हणून आपल्या चाहत्यांच्या भेटीला येत आहे.
मायदेश मिडिया निर्मित, नितीन सिंधुविजय सुपेकर दिग्दर्शन ‘आटपाडी नाईट्स’ या चित्रपटात ‘काहे दिया परदेस’ फेम अभिनेत्री सायली संजीव या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबाभोवती गुंफण्यात आलेल्या ‘आटपाडी नाईट्स’ची कथा एका संवेदनशील विषयावर अतिशय वेगळ्या अंदाजात, खुमासदार शैलीत भाष्य करणारी असल्याचे समजते. ‘आटपाडी नाईट्स’ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
अभिनेता म्हणून दमदार वाटचाल सुरु असताना त्याने चित्रपट दिग्दर्शनात पाउल टाकले आणि ‘कट्यार काळजात घुसली’ या अजरामर संगीत नाटकाला चित्रपटरुपात प्रेक्षकांसमोर आणण्याची कामगिरी उत्तम निभावली. तर ‘पुष्पक विमान’ या चित्रपटातून निर्माता म्हणून पदार्पण करत एक वेगळा विषय प्रेक्षकांपुढे आणला. यानंतर आता चित्रपट क्षेत्रातील अजून एक शिखर सर करण्यास सुबोध भावे सज्ज झाला असून प्रस्तुतकर्ता म्हणून ‘आटपाडी नाईट्स’ हा त्याचा पहिला चित्रपट असणार आहे.
‘जवानी झिंदाबाद’ चित्रपटाचा टीजर सोशल मिडीयावर प्रदर्शित
प्रेक्षकांमध्ये चित्रपटांबद्दल उत्सुकता निर्माण करण्यासाठी कधी गाणी तर हटके स्टारकास्ट, कधी वेगळा विषय तर कधी मार्केटिंग स्टेटर्जी कारणीभूत ठरते. ह्याच बरोबर चित्रपटाचे टाइटल सुद्धा कधी कधी खूप महत्वाचे ठरते. आता पर्यंत अनेक इंग्लिश, इंग्लिश-मराठी, हिंदी-मराठी असे टाइटल असलेले चित्रपट आपल्याला पहायला मिळाले. असेच एक हटके टाइटल असलेला ‘जवानी झिंदाबाद’ हा मराठी चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.
‘जवानी झिंदाबाद’ म्हटलं की आपल्या नजरेसमोर तरुणाईचा जल्लोष, उत्साह येतो. नव्या दमाचे कथानक असलेल्या ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाचा टीजर नुकताच सोशल मिडीयावर प्रदर्शित करण्यात आला आहे. शिव कदम दिग्दर्शित, महाराष्ट्र मोशन पिक्चर्स व एम के एंटरटेनमेंट प्रस्तूत ‘जवानी झिंदाबाद’ या चित्रपटाची निर्मिती नितीन उत्तमराव साठे यांनी केली असून सहनिर्माता नरेंद्र चंद्रकांत यादव (पाटील) आहेत. एका सत्य घटनेवर आधारित या चित्रपटात हृदयस्पर्शी प्रेमकथा बघायला मिळणार आहे. आजपर्यंत मोठ्या पडद्यावर न आलेल्या संवेदनशील विषयाभोवती गुंफण्यातआलेला आहे.
या चित्रपटातून अभिषेक साठे हा नवा चेहरा चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे, तर अभिनेत्री केतकी नारायण नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. याशिवाय यतीन कार्येकर, आसावरी जोशी, मधू कांबीकर, पूर्वा शिंदे, सचीन गवळी, अभ्यंग कुवळेकर यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा नितीन उत्तमराव साठे यांची असून पटकथा लेखन आणि दिग्दर्शन शिव कदम यांनी केले आहे. येत्या १३ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.